बोठेवर दबाव टाकण्यासाठी पोलीसांनी ठेवला हा प्रस्ताव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

बोठेवर दबाव टाकण्यासाठी पोलीसांनी ठेवला हा प्रस्ताव

 बोठेवर दबाव टाकण्यासाठी पोलीसांनी ठेवला हा प्रस्ताव



नगरी दवंडी

अहमदनगर / प्रतिनिधीः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य संशयित आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्यावर दबाव आणण्यासाठीच पोलिसांनी मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव ठेवला असला, तरी तो लगेच मंजूर होण्याची शक्यता नाही. बोठे याच्या उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीनअर्जावर काय निकाल लागतो, त्यानंतर हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.

जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली. त्याच्या दुसर्‍या दिवसापासून बोठे फरार आहे. त्याचा ठावठिकाणी पोलिसांना अजूनही लागलेला नाही. पोलिसांना गुंगारा देण्याात तो यशस्वी होतो आहे. त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज नगर येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बोठे त्यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करण्याची शक्यता आहे. त्याच्या जामीनअर्जावर काय निकाल लागतो, यानंतर पोलिसांची दिशा ठरणार आहे. पोलिस स्वस्थ बसलेले नसले, तरी त्यांना यशही येत नाही. एकीकडे उच्च न्यायाालयात बाजू मांडण्यासाठी तयारी करीत असताना दुसरीकडे त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया अजमावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी पोलिसांना न्यायालयात जावे लागणार आहे. न्यायालयाकडून एकदा बोठेला फरार घोषित केले, की नंतर 182 चा अर्ज करून त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. त्यासाठीही पोलिस तयारी करीत आहेत.

दरम्यान, विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी पोलिसांना आज पत्र दिले. त्यात बोठे याचा समाजातील वावर, त्याचे स्थान, त्याने प्रकाशित केलेल्या वृत्त मालिका, हनी ट्रॅपमधील अनेकांचा सहभाग आदींचा त्यात अ‍ॅड. लगड यांनी उल्लेख केला. बोठे याचा अशी मालिका प्रसिद्ध करण्यात काय हेतू होता, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. आता बोठेला फरार म्हणून घोषीत करून, त्याच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. लगड यांनी केली आहे. खुनाची सुपारी देऊन तो घडवून आणणारा बोठे हा कायद्याचा पदवीधर आहे. तो उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज करू शकतो, त्याठिकाणी देखील आपल्या पोलिस यंत्रणेने डोळयात तेल घालून लक्ष ठेवावे. त्याचा अटकपूर्व जामीन कसा फेटाळला जाईल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करून, सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे, अशी मागणी अ‍ॅड. लगड यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment