शेवगाव नगरपरिषदेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सामूहिक मुंडन आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

शेवगाव नगरपरिषदेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सामूहिक मुंडन आंदोलन

 शेवगाव नगरपरिषदेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सामूहिक मुंडन आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः  शेवगाव शहराला 12 दिवसानंतर पिण्याचे पाणी देणार्‍या नगरपरिषद प्रशासन व सत्तेत असणार्‍या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशमहासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव येथील बस स्टँड समोरील क्रांती चौकात सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, शहराध्यक्ष विशाल इंगळे, संघटक शेख सलीम जिलानी, वंचित बहुजन आघाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, भाऊराव सरसे, कचरू मगर यांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मुंडन केले. या आंदोलनात लखन घोडेराव, राजू भाई शेख, प्रल्हाद कडमिंचे, विष्णू गायकवाड, अनिल कांबळे, रेश्मा गायकवाड, लक्ष्मण मोरे, रतन मगर, विश्वास हिवाळे,   यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे, शेवगाव नागरिकांच्या वतीने प्रेम अंधारे यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
शेवगाव शहराला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण हे शेवगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असून शेवगावला ग्रामपंचायत अस्तित्वात होती तेव्हा 3-4 दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत होते. परंतु नगरपरिषदेची स्थापना झाल्यापासून शेवगाव मधील नागरिकांना प्रत्येक महिन्यात 10 ते 12 दिवसाला पिण्याचे पाणी मिळते. ते ही पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शेवगाव शहरातील नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. अनेक महिला व भगिनींना पाण्यासाठी दूरवर रानोमाळ भटकंती करावी लागते. वर्षातून फक्त 36 दिवस पाणी येते मात्र नगरपरिषद पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल करते. हा कुठला न्याय त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेने नागरिकांकडून वसूल केलेली पाणी पट्टीची 75 टक्के रक्कम परत करावी व नवीन वर्षांपासून तरी पुरेशा प्रमाणात वेळेवर पाणी पुरवठा करावा. अशी मागणी केली.
शेवगाव नगरपरिषदेचा गलथान कारभार व सत्तेत असलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या उदासीन धोरणामुळे धरण उषाला अन कोरड घशाला अशी शेवगावकरांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ प्रातिनिधिक स्वरूपात हे सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आलेले आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताधारी जाहीर नाम्याद्वारे खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेली आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर दिवसाआड पाणी देऊ, शहर स्वच्छ ठेवू, भूमिगत गटार योजना करू असे अनेक आश्वासने दिली होती. शेवगाव पासून 20 किमी अंतरावर असलेल्या पाथर्डी शहराला दिवसाआड पुरेशा प्रमाणात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होतो. मग शेवगावलाच पाणी पुरवठा करण्यात काय अडचण आहे ? हे भाजप राष्ट्रवादी चे पदाधिकारी, नगरसेवक व नगरपरिषद प्रशासनाने शेवगावच्या जनतेसमोर येऊन जाहीरपणे सांगावे असे आव्हान प्रा. किसन चव्हाण यांनी दिले. घन कचरा व्यवस्थापन योजनेसाठी किंवा टक्केवारी मिळत असलेल्या कामासाठी भाजप व राष्ट्रवादी चे नगरसेवक एकत्र येतात. मात्र हेच सत्ताधारी जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र येत नाहीत. शेवगाव साठी मंजूर झालेल्या 78 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी का झाली नाही याचे उत्तरही सत्ताधार्‍यांनी द्यावे.शेवगावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढच्या आठवड्यात शेवगाव चे शिष्टमंडळ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे अशी माहिती प्रा. किसन चव्हाण यांनी यावेळी दिली.
सकाळी 11 वा. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शेवगावच्या क्रांती चौकात एकत्र आले. फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांच्या जयघोष व नगरपरिषद प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देत क्रांति चौक परिसर दणाणून सोडला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सामूहिक मुंडन आंदोलन केल्यानंतर नगर परिषदेच्या दालनात जाऊन प्रशासकीय अधिकारी राठोड यांना मुंडन केलेले केस भेट देण्यात आले. आणि या आंदोलनाचा समारोप झाला.

No comments:

Post a Comment