'हा' तालुका झाला कोरोनामुक्त; 14 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

'हा' तालुका झाला कोरोनामुक्त; 14 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही

 'हा' तालुका झाला कोरोनामुक्त; 14 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही 

 


नगरी दवंडी

मुंबई: गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या राज्यातील जनतेसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. औरंगाबादमधील फुलंब्री हा तालुका करोनामुक्त झाला असून गेल्या 14 दिवसांपासून फुलंब्रीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त तालुका होण्याचा मानही फुलंब्रीला मिळाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये कोरोनाची सर्वाधिक संख्या आढळून आली होती. तिन्ही ठिकाणी दिवसे न् दिवस करोनाची संख्या वाढत चालल्याने या शहरांमध्ये अनेकदा कडक लॉकडाऊनही करण्यात आला होता. अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली होती. तोंडावर मास्क लावण्यापासून ते मास्क न लावणाऱ्यांना दंड आकारण्यापासूनच्या अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून या तिन्ही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. औरंगाबाद जिल्हाही आता हळूहळू कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुका जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त झाला आहे. गेल्या 14 दिवसांत फुलंब्री तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य खात्याकडून सांगण्यात आलं.

औरंगाबादमध्ये एकूण 46, 293 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 44, 563 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 1096 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 14 जणांचा इतर कारणांनी मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 620 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

राज्यात आज 3717 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर गेल्या 24 तासात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.56 टक्के एवढा आहे. त्याशिवाय राज्यात गेल्या 24 तासांत 3083 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 17, 57,005 लोक कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या शिवाय राज्यात सध्या 5,12, 587 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर 4,403 व्यक्तिंना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment