घर घर लंगर’ सेवेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

घर घर लंगर’ सेवेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 घर घर लंगर’ सेवेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोरोना महामारीमुळे लोककलावंतांवर आली होती उपासमारीची वेळ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे जतन करणार्या लोककलावंतांसमोर कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली असताना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शहरातील 53 लोककलावंतांना या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुधीर लंके, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, जनक आहुजा, जय रंगलानी, राहुल बजाज, कैलास नवलानी, राजा नारंग, सुनिल थोरात, कमलेश गांधी, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, अनिल जग्गी, किशोर मुनोत, अनीश आहुजा, प्रशांत मुनोत, माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे आदि उपस्थित होते.
पोलीस मुख्यालय येथील सभागृहात फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन हा उपक्रम पार पडला. कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कार्यक्रम बंद आहेत. घरोघरी जाऊन जाऊन कला सादर करुन आपला उदरनिर्वाह करणार्या कलावंतांना कोरोनाच्या भीतीमुळे सध्या लोक दारात उभे करीत नाही. यामुळे या लोककलावंतांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जत्रा-यात्रा आदि कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहे. या लोककलावंतांन आधार देण्यासाठी घर घर लंगर सेवेने पुढाकार घेतला. यावेळी शाहीर, पोतराज, बहुरुपी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, गोंधळी, तमाशा कलावंत, संबळ वादक, कलगीतुरा कलावंत आदि शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले.  
सुधीर लंके म्हणाले की, टाळेबंदी काळात व सध्या लोककलावतांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. समाजाचा हा संवेदनशील घटक असून, त्यांना शासनाने भरीव मदत करण्याची गरज आहे. घर घर लंगरसेवेने कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांची भूक भागविण्याचे कार्य केले. टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेली लंगर सेवा आजही सुरु आहे. संपुर्ण राज्याला दिशा देणारा हा उपक्रम असून, याचा सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला आहे. लोककलावंतांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम लंगर सेवेने केले असल्याचे सांगितले. लोककलावंतांच्या वतीने सारिका देवकर यांनी कोरोनाच्या संकटकाळातील व्यथा मांडल्या. शाहीर दिलीप शिंदे यांनी कोरोना व्हायरसने झाला हाहाकार... जगाव कस सरकार... सांगा जगाव कस सरकार?... गीत सादर करुन लोककलावंताच्या वेदना सर्वांसमोर मांडल्या.

No comments:

Post a Comment