मी गुरुवारी येतोय! जिल्ह्याचा आढावा घेऊ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

मी गुरुवारी येतोय! जिल्ह्याचा आढावा घेऊ!

 मी गुरुवारी येतोय! जिल्ह्याचा आढावा घेऊ!

पालकमंत्री हरवल्याचा आरोप करणार्‍यांना मुश्रीफांचे प्रत्युत्तर

‘ऑनलाईन’ सरकारचे ऑनलाईन पालकमंत्री : भाजपाचा आरोप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारतीय जनता पक्ष, मनसे पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री हरवले आहेत असा आरोप केला होता. या आरोपांना आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देऊन मी गुरुवारी येतोय असं ऑनलाईन उत्तर दिलय. तर हे ऑनलाईन सरकारचे हे ऑनलाईन पालकमंत्री असल्याचा निशाणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनी साधला आहे.
‘गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनाने चांगले काम केले आहे. तुम्ही खूप कष्ट घेतले, त्याबद्दल तुमचे आभार. आता मी गुरुवारी येतोय, तेव्हा सविस्तर आढावा घेऊ,’ असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. मुश्रीफ यांनी आज नगर जिल्ह्याचा ऑनलाइन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र 15 ऑगस्टनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले नाहीत. त्यावरून त्यांच्यावर भाजप नेत्यांसह मनसेकडून ही टीका होऊ लागली आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही नगरमध्ये बोलताना पालकमंत्र्यांवर टीका केली होती. ‘सरकारमध्ये काम करणारे सत्ताधारी पक्षातील लोकांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तर नेमकी कशाची काळजीय? त्यांचा तर सगळा वेळ ग्रामपंचायतवर मागच्या दाराने प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नात गेलाय,’ अशी टीका विखे यांनी पालकमंत्र्यांवर केली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत, त्यांना शोधून द्या, अशा आशयाचे पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नगर जिल्ह्याचा करोनाचा अनुषंगाने ऑनलाइन आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यांना जिल्ह्याची माहिती दिली.यावेळी मुश्रीफ यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. नगर जिल्ह्याचा करोना या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्याबद्दल मुश्रीफ यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच सहा महिन्यापासून प्रशासनातील अधिकार्‍यांनी जे कष्ट घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. गुरुवारी मी येतोय, कलेक्टर साहेब मी आपल्या ऑफिसमध्ये येतोय , त्यावेळेस आपण सविस्तर आढावा घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment