कर्जत-जामखेडमध्ये ग्रामीण उद्योजक घडविण्याचा विडा; आमदार रोहित पवार यांचा पुढाकार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 7, 2020

कर्जत-जामखेडमध्ये ग्रामीण उद्योजक घडविण्याचा विडा; आमदार रोहित पवार यांचा पुढाकार

 कर्जत-जामखेडमध्ये ग्रामीण उद्योजक घडविण्याचा

विडा; आमदार रोहित पवार यांचा पुढाकार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः आ.रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये युवांना स्वयंरोजगार, उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फौंडेशनमार्फत काम सुरु केले आहे. या फौंडेशनने आता भारत युवा शक्ती ट्रस्टशी संयुक्त भागीदारी केली आहे. याअंतर्गत कर्जत जामखेडमधील 20 मेंटॉरची निवड करून त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. एक उद्योजक निर्माण केला तर अनेकांना नोकरीच्या संधी मिळत असतात. त्यामुळे असे उद्योजक घडविण्यावर आपण भर देणार असल्याचे आ.रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना आ.पवार यांनी सांगितले की, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशनने विकासाच्या इतर कामांसोबतच ग्रामीण उद्योजक घडवण्याचं कामही आता हाती घेतलंय. त्यासाठी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशनने भारत युवा शक्ती ट्रस्ट या प्रसिद्ध संस्थेसोबत संयुक्त भागीदारी केलीय.
ग्रामीण भागातील युवांमध्ये क्षमता, कौशल्य, धाडस आणि जिद्द असते. त्यांना मार्गदर्शनाची जोड मिळाली की ते यशाची गरुडभरारी घेऊ शकतात. हिच बाब ओळखून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशनने भारत युवा शक्ती ट्रस्टसोबत एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. युवा, नवउद्योजक आणि महिला उद्योजक यांच्यातील उद्यमशीलतेला पैलू पाडण्याचं काम या दोन संस्था करणार आहेत. त्यासाठी कर्जत-जामखेडमधील 20 मेंटॉरची कठोर चाळणीनंतर निवड करुन त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलं. ग्रामीण भागातील वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक घटकातील युवांना उद्योजकतेसाठी प्रेरीत करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यासाठी बीज भांडवल व सरकारी व खासगी वित्त संस्थांकडून अर्थसाह्य मिळवणं आणि एकूणच उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं काम हे मेंटॉर नवउद्योजकांना करणार आहेत. त्यादृष्टीने त्यांना हे ट्रेनिंग देण्यात आलं. व्यापार, मार्केटिंग, जाहिरात, बाजार सर्व्हे याबाबतच्या ट्रेनिंगचा त्यात समावेश आहे. जेणेकरुन या उद्योजकांना उद्योग सुरू झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा ग्रामीण भागातील नवउद्योजकांना मोठा फायदा होईल आणि त्यांचा उद्योग वाढीस लागण्यास मदत होईल.
  एक नोकरदार तयार केला तर त्याच्या एका कुटुंबाला फायदा होत असतो, पण एक उद्योजक निर्माण केला तर त्यातून अनेकांना नोकरीच्या संधी मिळत असतात. शिवाय नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी विशिष्ट टप्प्यांची मर्यादा असते. पण उद्योजकाला आपला उद्योग विस्तार करण्यासाठी कोणतीही मर्यादा नसते. म्हणून मी नेहमी सांगतो की युवांनी उद्योग-व्यवसायाकडं वळणं आवश्यक आहे आणि त्याला पूरक म्हणूनच कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशनने भारत युवा शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून मेंटॉर प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन एक पाऊल पुढं टाकलं. आता युवांनी पुढं यावं, असं मी आवाहन करतो.

No comments:

Post a Comment