नगर मधील आमचे पंचमहाभूते श्रावणात कैलासवासी झाले ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 19, 2020

नगर मधील आमचे पंचमहाभूते श्रावणात कैलासवासी झाले !

 नगर मधील आमचे पंचमहाभूते श्रावणात कैलासवासी झाले !

नगरअहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील एक नामांकीत शहर आहे. हजरत सरकार शाह शरीफजी पासून अहमद शाह, शहाजी राजे भोसले, शिवाजीराजे भोसले माणकेश्वर अंतोजी गंधे सरदार, सलाबतखान, आलमगीर बादशाह औरंगजेब, युवराज मुराद, सुलताना चाँदबीबी पासून अपाचे रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन बंध ह.भ.प.बाळासाहेब भारदे, जानकीबाई आपटे, डॉ.श्रीराम रानडे, श्रीमती कमलाबाई रानडे, नवनीत दास नारायण दास बार्शीकर, विजयाबाई नवनीत दास बार्शीकर, हिंदू महासभेचे तत्कालीन नेते गो.रा.गायकैवारी, प्रा.अंबादास बेडेकर, पोट्यान्ना बत्तीन, शंकर महाराज, नाना महाराज, खाकीदास बुवा, बाळाजी बुवा आणि संस्थापक चक्रधरस्वामी, विद्याधर चन्ना, कै.बाबुराव लांडगे, जगन्नाथ आगरकर, महानुभाव पंथाचे प्रा.आगरकर, ड.दारुणकर, सावळेराम दारुणकर, मंगलसिंह ठाकोर, नगराध्यक्ष इंगळे, वडझीरकर मामा, दादासाहेब मिसाळ सावकार, काकासाहेब व तात्यासाहेब चिंचोरकर, रावसाहेब चितळे, तांबोळी सावकार, नारायणराव पेंट्टा इंजिनिअर व देशभक्त दादा चौधरी आणि न.ना.सथ्या, बापुसाहेब भापकर, हिराबाई भापकर, पटवेकर वस्ताद, रेव्हरंड ना.वा.टिळक, चितळेरोडवरील मोडक घराळे (कोकराची मंडळी चर्चचे संस्थापक), शाहू मोडक, मामा तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, राखी गुरुजी (मालेगाव) व गुजरगल्लीतील अक्कलकोट स्वामी मठाचे राखी गुरुजी, आदी थोरा-मोठ्यांचा राहण्याने, वागण्याने आणि नेतृत्वाने नगर शहर पुण्यनगरी झाली आहे. वरील सर्व लांबलेला परंतु केवळ नांवाने सांगितलेला इतिहास पाहता नगरमधील या महिन्यातील 5 मृत्यू मनाला चटका लावणारे आहेत.  नगर जिल्हा परिषदेतील निवृत्त अधिकारी चांगदेव बहिरनाथ पालवे यांच्या वय वर्ष 96 च्या श्रीमती चंद्रभागाबाई बहिरनाथ पालवे यांचे राखी पौर्णिमा सोमवारी निधन झाले. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण सर्वांना लागु आहे पण चंद्रभागाबाई व त्यांचे पुत्र चांगदेव बहिरनाथ पालवे यांची मायलेकराची जोडी आता निखळली आहे. श्रावण बाळासारखा आईवर आणि आईच्या सेवेकर नितांत प्रेम करणारा चांगदेव हा मातृभक्त शेवटपर्यंत पत्नी, मुले,मुलगी, नातवंडे यांच्यापासून केवळ मातृसेवेसाठी नगरला हलवाई गल्लीत 50 वर्षे राहत आहेत. आई चंद्रभागाबाई आव्हाडवाडी, ता.नगर येथील रहिवासी तर वडील बहिरनाथ पालवे कोल्हुबाई कोल्हार ता.पाथर्डी येथील रहिवासी होते. वडील लवकरच वारले. त्यामुळे चंद्रभागाबाईंनीच संसार चालवून चांगदेव पालवेंना मोठे केले. त्यामुळे आज चंद्रभागाबाई मागे एक विवाहीत मुलगा, सुनबाई, नातवंडे व पतवंडे असा गोतावळा आहे. चांगदेव पालवे आमच्या भुईकोट किल्ला, सुगंधी कट्टा, हास्य क्लबचे जुन सभासद आहेत आमचे स्नेही व नगरला सर्वांना गोड गुलाब जामुन व पेढे देणार्‍या बन्सी महाराज मिठाईवाले जोशी यांचे थोरले पुत्र नंदलाल हिरालाल जोशी यांचे निधनही मनाला चटका लावुन गेले. राजस्थानी छन्त्री विप्र ब्राह्मण समाजाचे बन्सी महाराज व जोशी कुटूंबीय

मुळचे राजस्थानातील जयपूर या राजधानीच्या शहराजवळील सुरमलिकपुरचे रहिवासी आहेत. भारताचे माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत व बन्सी महाराज - जोशी कुटूंबीय हे सुरमलिकपुरचे बांधभाऊ शेतकरी गांवकरी दुष्काळामुळे ही मंडळी नगरला 1924-25 साली आली आणि त्यांनी रामचंद्र खुंटावरील बन्सी महाराज मिठाईवाले हे दुकान सुरु केले पण घरातील मुला-मुलींत नंदलाल हिरालाल जोशी हे अष्टपैलू निघाले. हलवाई असून दुसर्‍याच्या घरावर किंवा स्वतःच्या घरावर तुळशीपत्र न ठेवून घेता त्यांनी शहाजीरोड घासगल्लीत बन्सी महाराज स्विट कॉर्नर - सेंटर सुरु केले आणि नगरमधील सारडा कोहीनूर - आणि भांडे गल्लीतील भांडी दुकानदारांकडे व सराफ बाजारातील लग्नाचे बस्ते, भांडी घेणारे व नवरा-नवरीसाठी कपडे व सुवर्ण अंलकार घेणार्‍यांना गुलाब जामुन, लाडू, पेढे आणि जिलेबी व चिवडा याचा बस्त्याचा नाश्ता नंदलालजी देत गेले. एवढ्या धावपळीतून त्यांनी बी. ए., बी. कॉम., एल. एल. बी. चे शिक्षण पुरणे केले. समाज, महाराष्ट्र राज्य हॉटेल आणि उपहारगृह संघटनेचे उपाध्यक्ष, गुरुप्रसाद ज्योतिष कार्यालय, गुरुप्रसाद भक्ती मंडळ व भजनी मंडळ स्थापन करुन त्यांनी ज्ञान व भक्तीचा प्रसार केला. भिंगार कॅन्टोन्मेंटमधील डिफेन्स लँड ओनर्स व बंगलो ओनर्स संघटनेचे काम करुन जानकी बल्लभ पटनाईक या तत्कालीन संरक्षण राज्यमंत्र्याकडे नगरचे खासदार अण्णासाहेब शिंदे व कोपरगांव, नगर आणि शिर्डीचे खासदार बाळासाहेब विखे यांच्या मदतीने कॅन्टोन्मेंट मधील प्रश्नास वाचा फोडली. नगर अर्बन बँकेचे ते संचालक होते. बार्शीकर मित्र मंडळाचे सदस्य म्हणून नंदलालजी जोशी पत्रकार, प्रकाश भंडारे, खटोड, पोपट गणेशमल बोरा, बापुसाहेब दातरंगे, मधुकर कचकल, सिध्दनाथ औटी गुरुजी, मधुकर देवतरसे, आचार्य गुंदेचा, सुधीर मेहता ही मंडळी बार्शीकर मित्रमंडळाचे कामकाज करीत होते व आहेत.  नगरचे लाडके हिंदुत्ववादी व शिवसेनेचे 5 वेळा आमदार राहिलेले अनिल रामकिसन राठोड (बी.ए.) हे राठोड समाजासारख्या नगर मधील अल्पसंख्यांक समाजाचे असूनही साळी, माळी, कोळी, तेली, पद्मसाळी, कोष्टी या अल्पसंख्यांकांमुळे हिंदू रक्षक आमदार झाले आणि मनोहर जोशींच्या मंत्रीमंडळात अन्न पुरवठा राज्यमंत्रीही झाले. बाळासाहेब व मिनाताई तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक होती. परवेज दमानिया हे नगरचे शिवसेना लोकसभा उमेदवार असतांना नगरमध्ये ठाकरे परिवार, मनोहर जोशी, सुधीर जोशी, छगन भुजबळ आणि अ‍ॅड. लिलाधर डाके यांच्या संपर्कात अनिलभैय्याचे नेतृत्व उजळून गेले. ज्येष्ठ भगिनीनंतर अनिल आजारी पडले आणि अचानक आपल्यातून निघून गेले.
नगरचे खटोड व बोरा या भागीदारी फर्ममधील प्रगत शेतकरी केंद्र चालविणारे अशोक खटोड व पोपट गणेशमल बोरा या जोडीतील बि-बियाणे व खत विक्रेते संघटनेतील राज्य पातळीवरील प्रभावी कार्यकर्ते पोपट बोरा (पी.जी.बी.) यांनीही श्रावणात अचानक वयाच्या सत्तरीत एक्झीट घेतली. बार्शीकरांच्या दै.लोकयुगमधून नवनीतभाई, गोवर्धन भाई व अ‍ॅड.गोपाळभाई यांच्या तालमीत मी पत्रकारीता सुरु केली. मी प्रकाश गोविंदराव भंडारे व
बोरा या दोघांशी इंग्रजी अद्याशरे हे सारखीच म्हणजे पी.जी.बी. ही होती. मी व पोपट बोरा बार्शीकर यांचे राजकीय शिष्य होतो. त्यामुळे लिखाण, वकर्तृत्व व अभ्यासु मांडणी यात पोपट बोराने मला साथ दिली. बार्शीकर, खताळ पाटील व बाळासाहेब विखे या तिघांचा आम्हा दोघांना सहवास लाभला. त्यामुळे अर्बन बँकेच्या वार्षिक सभाही प्रश्न मांडून व भाषणे करुन आम्ही गाजविल्या. पोपट बोरा नावाप्रमाणे खुपच बोलका होता. नगरचे अशोक काळे व मीनल काळे हे दोघे वास्तुविशारद (आर्किटेक्ट) नगर शहरात बांधकाम व्यवसाय व नकाशे नियोजन या निमित्ताने नगरकरांना माहित झाले. अमृत मुथा व अशोक काळे ही जोडीही नगरपालिका व नगर शहरात आपल्या गुणांनी ओळखले जाऊ लागले. अशोक काळे नगर तालुक्यातीलच रहिवासी तर मीनल या मुंबईकर दोघेही प्रेमविवाहानंतर नगरला स्थायिक झाले ते आजपर्यंत. नगरचे कलेक्टर अनिलकुमार लखीना यांच्या काळातील किल्ला मैदानावर शेती, औद्योगिक प्रदर्शनामुळे काळे, मुथा, गोपाळ मिरीकर, प्रकाश भंडारे व दत्ता खोजे हे फोटोग्राफर लखीनांचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी मदत करत होते. निवासी उपजिल्हाधिकारी भालचंद्र आवढाळ, उपनिबंधक हरिदास, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नागनाथ काळे (जळकोट कर) आणि उपजिल्हाधिकारी शिरीष कार्ले आदी मंडळींचे आमचे मैत्र जमले. अशोक काळे यांनी देऊळगांव सिध्दी, ता.नगर येथील तलावात मत्स्य शेती केली. बकरे व शेळ्या पालन केले तर दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना चार पैसे मिळतील म्हणून सहकारी तत्वावर शेती बकरीचे मांस मुंबई, पुणे, दिल्ली आणि अरब अमीरातीत विकण्याची त्यांची दुरदृष्टी होती. शेतकरी कुटूंबातील अशोक काळे यांनी स्वतःला व शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी शेतीला नवीन जोड दिली. अशोक काळे हे आमचे मित्रही नगरकरांना सोडून गेले.
अग्नी, वायु, जल, पृथ्वी आणि आकाश ही पंचतत्वे व पंचमहाभूते हिंदू धर्माने व संस्कृतीने मानलेली आहेत. जन्म, मरण अटळ आहे पण मृत्युनंतर सर्वांच्या पार्थिवाची अग्नीच्या भक्ष्यस्थानी राख होते. ती आपल्या मातीत आणि पंचतत्वात मृत्यूनंतर विसर्जित होत असते. म्हणूनच नगर येथील भुईकोट किल्ल्यात राजबंदी म्हणून राहिलेले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्या मृत्यू नंतर त्यांची रक्षाही विमानाने नगरच्या भुईकोट किल्ला परिसरात टाकण्यात आली. हे संपुर्ण भारतीयांना माहिती आहे. ज्ञानेश्वर मंदीर व नेवाशाचे पैस खांब जेथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि हा जिल्हा गोदा, प्रवरा, मुळा, सिना, समंगा, काळु, कापरी, ढोरा, विंचरणा, मेहेकरी या नद्यांच्या कुशीत अहिल्याबाई होळकर, गोदड महाराज, सिध्दटेकचे सिध्दी विनायक, कोरठाण खंडोबा, अरणगाव मेहेरबाबा व बुवाजी बुवा, अकोळनेर दासगणु. शिर्डी साईबाबा, सोनई शनिशिंगणापूर, मोहटा व रेनकाईवाडी येथील रेणुका आणि बुरहाणनगर येथील भगताची तुळजाभवानी आदींबरोबरच सेंट्रल बँक रस्त्यावरील शहाजी महाराजांचे नित्य पुजनाचे ठिकाण अमृतेश्वर मंदीर, ह्युम चर्च व चाँद सुलताना हायस्कूल, सोसायटी हायस्कूल, राष्ट्रीय पाठशाला, बालिकाश्रम आणि सेंट झेवियर हायस्कूल आणि अमेरिकन मिशनरीने सुरु केलेले मराठी मिशनच्या शाळा व डॉ.बी.पी.हिवाळे यांनी महत प्रयत्नाने सुरु केलेल्या अहमदनगर कॉलेज व मराठा शिक्षण मंडळाच्या न्यू आर्ट्स कॉलेज, सारडा कॉलेज यांनी नगरची विद्यानगरी सरस्वती पूजन करुन वाढवली. त्यामुळेच नगर शहरात बाजारपेठीतील आणि सेंट्रल बँक व खिस्त गल्लीतील बालाजी मंदीर यामुळे नगर शहरात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत आहेत. सर्व जाती पंथातील लोकही गुण्या-गोविंदाने राहत आहेत. म्हणून पुन्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पंचमहाभूतांना विनंती करतो की, या कोरोना महामारीच्या काळात सर्वांना आरोग्यदायी व सुखी ठेवावे...

* शब्दांकन *  
प्रकाश भंडारे


No comments:

Post a Comment