विखेंनी श्रीरामपूरात लक्ष घातले ... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 4, 2020

विखेंनी श्रीरामपूरात लक्ष घातले ...

 विखेंनी श्रीरामपूरात लक्ष घातले ...
 नवीन नेतृत्वाला मिळणार संधी?

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः शहराच्या राजकारणात आजवर माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निर्णायक मतांची शिदोरी ज्या गटाच्या पारड्यात पडायची त्या गटाला शहराची सत्ता मिळायची. विधानसभेनंतर बदललेल्या परिस्थितीत स्वतः विखे यांनी 22 नगरसेवकांना स्वबळाचा नारा दिल्याने शहराला नवीन नेतृत्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
श्रीरामपूरच्या राजकारणात विखे पाटलांनी आजवर गेल्या 25 वर्षात ससाणे गटाला बळकटी देण्याचे काम केले. ग्रामीण भागातही विखे गटाच्या मदतीने ससाणे गट बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुळा प्रवरात सत्तेत दिसला. इतकेच काय तर जिल्हा बँकेतही विखे यांच्या जोडीने स्व.ससाणे हे दोनदा संचालक म्हणून विजयी झाले. स्व.ससाणे हे असेपर्यंत त्यांनी विखे यांची साथ दिली. मात्र त्यांच्या जाण्यानंतर ससाणे गटाने ऐन विधानसभेला विखे यांची साथ सोडत महसूलमंत्री थोरातांना हॅट दिला. एवढेच काय तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे प्रतोदपद थोरात समर्थक अजय फटांगरे यांना देत माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळू नये म्हणून खेळी खेळण्यात महत्वाची भूमिका बजावली.पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत विखेंनी ससाणे गटाला बाजूला सारत शत प्रतिशत स्वबळाचा नारा दिल्याने प्रस्थापित गटांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले.

नुकतीच विखे यांनी शहरात स्वतःच्या समर्थक नगरसेवकांची बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी दीपक पटारे, नानासाहेब पवार, केतन खोरे,प्रकाश चित्ते यांच्यासह नगरसेवक अंजुम शेख, जितेंद्र छाजेड, दीपक बाळासाहेब चव्हाण, किरण लुणिया, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, बाळासाहेब गांगड, दीपक चरणदादा चव्हाण, ताराचंद रणदिवे, कलिम कुरेशी, मुख्तार शाह, शामलिंग शिंदे, भाऊसाहेब डोळस, विजय शेळके उपस्थित होते. श्रीरामपूरच्या विकासासाठी आजवर अनेकांना ताकद देणार्‍या विखे पाटलांनी यापुढील काळात नगरपरिषद निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरून नवीन नेतृत्वाला उभे करण्याचे संकेत दिल्याचे समजते. येत्या 15 दिवसात नगरसेवकांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. जे सोबत येतील त्यांना घेऊन व जे येणार नाही त्यांच्या प्रभागात वर्षभरात सक्षम पर्याय उभा करण्याचे विखे गटाने ठरविल्याने वर्षभरावर येऊन ठेपलेल्या नगरपरिषद निवडणुकीत नवीन नेतृत्व निर्माण होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment