कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराजांची रथ यात्रा अखेरीस रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 10, 2020

कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराजांची रथ यात्रा अखेरीस रद्द

कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराजांची रथ यात्रा अखेरीस रद्द
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांची आषाढी वद्य एकादशीनिमित्त भरणारी कर्जत येथील रथ यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली.
कर्जत येथे प्रत्येक वर्षी आषाढ वद्य एकादशी दिवशी ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांची रथ यात्रा भरते या दिवशी श्री पांडुरंग कर्जतला येतात अशी आख्यायिका असून कौल मिळताच मूर्ती रथामध्ये ठेवून रथाची शहर प्रदक्षिणा केली जाते, यानिमित्त शहरामध्ये मोठी यात्रा भरते, यासाठी राज्यातून लाखो भाविक दरवर्षी येतात, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने अत्यंत कडक नियम करत सर्व धार्मिक उत्सवांना, कार्यक्रमांना, यात्रांना मनाई केलेली असून आषाढी एकादशीची पंढरपूर यात्रा ही होऊ शकलेली नाही त्यामुळे कर्जतची रथ यात्रा भरेल की नाही याबाबत लोकांच्या मनात साशंकता होती यामुळे या प्रश्नाबाबत दि 9 जुलै रोजी श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्टी, पंच कमिटी, पुजारी, मानकरी, मान्यवर पदाधिकारी, नगरपंचायतसह महसूल व पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक प्रांताधिकारी कार्यालयामध्ये झाली. यावेळी उपस्थितानी परंपरा कायम राखण्यासाठी विविध उपाय योजना मांडल्या, मात्र त्यास प्रशासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली नाही. अवघ्या पन्नास लोकांमध्ये रथ काढून तो रथ मार्गावर फिरवु,  सॅनीटायझर चा वापर करू, सर्वांना मास्क घालण्यास बंधन करू, कोणालाही रथाजवळ येऊन दर्शन करू देणार नाहीत, गर्दी होणार नाही, रथ मार्गावर रथा ऐवजी पालखी काढू, अशा विविध सूचना यावेळी उपस्थितांनी मांडल्या मात्र प्रशासनाने यास कोणत्याही प्रकारे मान्यता न देता.
श्री गोदड महाराज यांची रथ यात्रा रद्द करत असल्याचे जाहीर केले. या रथयात्रे काळात तीन दिवस कर्जत परिसरात जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तहसीलदार नानासाहेब आगळे उपस्थित होते. या बैठकीस पंच कमिटीचे अध्यक्ष मेघराज पाटील, श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, आबासाहेब पाटील, सुरेश खिस्ती, प्रदीप पाटील, बप्पासाहेब धांडे, अनिल काकडे, आदी सह अनेक जण उपस्थित होते. कर्जतची धार्मिक परंपरा असलेली व सर्वांना एकत्र आणणारी रथ यात्रा रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

No comments:

Post a Comment