संपादकीय...चीनच्या दादागिरीला चोख उत्तर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 29, 2020

संपादकीय...चीनच्या दादागिरीला चोख उत्तर

                                              संपादकीय...चीनच्या दादागिरीला चोख उत्तर
भारतीय सैनिक त्यांच्या जागेवरुन एक इंचही मागे हटणार नाहीत. मात्र दोन्ही देशांमध्ये ठरलेल्या नियमांप्रमाणे कोणताही वाद होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3500 कि. मी.ची असून लडाख, उत्तर सिक्कीम या भागात भारत व चीन यांनी लष्करी जवान वाढवून शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून तणावाचे वातावरण आहे. लडाख व सिक्कीम भागात भारतीय जवानांच्या नेहमीच्या गस्त कार्यक्रमात चीनचे सैन्य अडथळा आणत आहे. तरीही चीनकडून भारतच घुसखोरी करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र भारतीय सैन्याने चिनी हद्दीत घुसखोरी केल्याचा चीनचा आरोप भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. भारताने चीनच्या हद्दीत घुसखोरी केलेली नाही. भारताची भूमिका जबाबदारीची असून सुरक्षा व सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज आहे. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर चीनने मवाळ भूमिका घेतली आहे. भारताने सातत्याने स्थिरता आणि शांततेसाठी प्रयत्न केले असतानाही चीनच्या सैन्याकडून भारतीय गस्ती पथकाला अडवण्यात आले. याशिवाय चीनकडून घुसखोरीचाही प्रयत्न केला जात आहे. पण भारत एक इंचही माग हटणार नाही आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहील, अशी प्रतिक्रिया देत भारताने चीनच्या दादागिरीला चोख उत्तर दिले ते एका अर्थी बरेच झाले. नियंत्रण रेषेच्या बाबतीत भारताने नेहमीच जबाबदारीची भूमिका घेतली आहे. पण चीनने नेहमीच या क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केले आहे. चीनचे हेतू काय आहेत हेही कळत नाही. भारतीय हद्दीत पेट्रोलिंग केले जात असतानाही चीनने त्यावर आक्षेप घेतला. दोन्ही बाजूकडून यावर संवादातून मार्ग काढला जात आहे. पण प्रश्न जेव्हा सीमा संरक्षणाचा येतो, त्यात कोणतीही तडजोड करण्यास भारताचा नकार आहे. सध्याची सीमेवरील परिस्थिती गंभीर असली तरी भयावह नाही. भारतीय हद्दीत अगोदरच चीनकडून 1-3 किमीपर्यंत घुसखोरी करण्यात आली आहे. तरीही चीन सैन्याला एकतर्फी कोणताही बदल करू दिला जाणार नाही, ही भारताची भूमिका ठाम आहे. 
सीमेवर भारतासोबतची परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात असल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर चीनकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी ही प्रतिक्रिया दिली. भारत आणि चीनमध्ये संवाद आणि सल्लामसलतीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त साधने आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूची माहिती जगाला वेळेवर न दिल्यामुळे चीनविरोधात सध्या संपूर्ण जग एकवटले आहे. यातच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आता भारताविरोधात दबावतंत्राचा वापर सुरू केला. पण जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक व्यासपीठांवर भारताने असे चक्रव्यूह तयार केले आहे की, त्यातून बाहेर पडणे चीनला आता शक्य नाही. त्यामुळेच चीन सीमेवर कुरघोड्या करून भारतासोबत नवे वाद उकरुन काढत आहे. चीनविरुद्ध 1962 च्या युद्धात कळीचा मुद्दा ठरलेल्या गलवान नदी भागात चीन सैन्य तळ ठोकून आहे. स्थानिक स्तरावर झालेली चर्चा अपयशी ठरली आहे. भारताने लडाख सीमेवर पायाभूत सुविधा अत्यंत मजबूत केल्या आहेत. यामुळेच चीनचा तिळपापड झाला आहे. भारताने लडाख ते अरुणाचल प्रदेश या 3488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषा म्हणजेच ‘एलएसी’ या उंच वादग्रस्त क्षेत्रात रस्ते आणि हवाई कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत चीनला तोडीस तोड उत्तर दिले आहे. आपल्या दबदब्याला दिलेले आव्हान पाहून चीनचा संताप होणे स्वाभाविक आहे.
जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ) च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद आता भारताकडे आले आहे. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहानमधून झाली हे तर जगजाहीर आहे. सुरुवातीला चीनने या व्हायरसची माहिती लपवली असा आरोप केला जात आहे. परिणामी हा व्हायरस जगभरात पसरला आणि आता जगात तीन लाखांपेक्षा जास्त जीव या आजारामुळे गेले आहेत. चीनने यावर उत्तर द्यावे, यासाठी जगातील अनेक महत्त्वाच्या देशांनी मागणी केली आहे. चीनवर कारवाईला आता सुरुवात होत आहे. त्यातच चीनचा बचाव करणा-या ‘डब्ल्यूएचओ’च्या भूमिकेकडेही आता लक्ष असेल. भारतासह जगातील 62 देशांनी चौकशीची मागणी केली आहे. आफ्रिकन आणि युरोपियन समुहातील देश जोडल्यास या देशांचा आकडा 110 च्या पुढे जातो. त्याचप्रमाणे तैवानच्या राष्ट्रपती साय इंग वेन यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताच्या दोन खासदारांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. यामुळे चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सीमेवर कुरापती काढण्याचे काम चीनने सुरू ठेवले आहे. सैन्याकडून नियंत्रण रेषेच्या बाजूला असलेल्या मैदानात आक्रमक गस्त घातली जात असल्याने तणावपूर्ण परिस्थिती पूर्वीही निर्माण झाली होती. परंतु दोन्ही बाजूंच्या चांगुलपणामुळे, राजीव गांधी यांच्या काळात करार तयार झाला आणि पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात (1993) त्याला औपचारिक स्वरूप आले. अशा रितीने नियंत्रण रेषेच्या सान्निध्यात दोन्ही राष्ट्रांनी लक्षणीय प्रमाणात सैन्य तैनात केले असले तरीही, 25 वर्षांहून अधिक कालावधीत येथे एकही गोळी रागातून झाडण्यात आलेली नाही. गेल्या दशकात नियंत्रण रेषेवर लष्करी तणावाचे 3 प्रमुख प्रसंग घडले. देपसांग (2013), चुमर (2014) आणि डोकलाम (2017) हे तीन प्रसंग, पण प्रत्येक वेळेला राजकीय-राजनैतिक मार्गाने संवादातून प्रश्न सोडवण्यात आला. तसे पाहिले असता सीमेबाबतच्या वादामुळे अशा घटना भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अधूनमधून घडत असतात. अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर दोन्ही बाजूचे लष्कर प्रस्थापित शिष्ठाचारानुसार निर्माण झालेली समस्या सोडवतात. ही घटना ब-याच दिवसांनी घडली असल्याचे चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केल्याचे दिसते. जम्मू-काश्मीर प्रश्नावर चीन सतत वक्तव्ये करताना दिसत आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्रातील चीनच्या कायमस्वरुपी मिशनच्या प्रवक्त्याने जम्मू-काश्मीरवर काही वक्तव्ये केलेली आहेत. त्या वक्तव्यातील भूमिकेला भारताने नाकारलेले आहे. भारताची भूमिका चीनला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. जम्मू-काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. जम्मू-काश्मीरशी संबंधित मुद्दे भारताची अंतर्गत बाब आहे. असे असले तरी, चीनचे सैन्य लडाख ते अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सतत फिरत असते. भारत-चीन सीमा म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दहा ठिकाणांवर संघर्ष होण्याची शक्यता असते. सीमेवर वाद होऊ नये याकरिता स्थानिक कमांड पातळीवर मुद्दे निकालात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे जरी असले तरी चीन जाणीवपूर्वक आक्रस्ताळेपणा करत असतो. चीनचा उदय आक्रमकपणे होत असल्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे देशही बिथरले आहेत. कोरोना संकटाच्या काळात चीनविरोधी आघाडी करणे युरोपीय देशांना आवश्यक वाटत आहे. 

No comments:

Post a Comment