विषेश संपादकीय- ‘कोरोना’ यमाच्या रेड्याला रोखणारे पोलीस व जिल्हाधिकारी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 8, 2020

विषेश संपादकीय- ‘कोरोना’ यमाच्या रेड्याला रोखणारे पोलीस व जिल्हाधिकारी!

                                    ‘कोरोना’ यमाच्या रेड्याला रोखणारे पोलीस व जिल्हाधिकारी!




आजचे नरवीर हे अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस आहेत. ज्या पोलिसांना हप्तेखोर म्हणून हिनवण्यात येतं, ज्या पोलिसांना चिपाड म्हणून खिजवण्यात येतं, तेच पोलिस जेंव्हा स्वत:चा जीव तळहातावर ठेवून उभ्या संसारावर आणि घरावर तुळशीपत्र ठेवून तुमचं-आमचं संरक्षण करण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर खडा पहारा देतात तेव्हा होय, तेच खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, होय तेच खरे या महाराष्ट्राचे रखवालदार, होय तेच खरे तुमच्या-आमच्या जान आणि मालचे पहारेदार. आज आम्ही अहमदनगर जिल्हा पोलिसांचे जाहीर अभिनंदन करतोत. गेल्या 20 दिवसांच्या कालखंडात ना घर पाहिलं ना दार पाहिलं ना बाया-मुले पाहिले, कोरोनासारख्या महामारीत स्वत:ला कर्तव्यात झोकून देत अहमदनगर पोलिस जे काम करतय ते कौतुकास्पदच नव्हे तर अभिनंदनीयच.
दुबईवरून परत आलेल्या नागरिकास कोरोना झाल्याचे समजल्यावर जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलिसांनी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत जी यंत्रणा राबवली त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 26 पर्यंतच झाली. पोलिसांनी व जिल्हाधिकार्‍यांनी कडक पावले उचलली नसती तर कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या शंभरच्या पुढे गेली असती यात शंका नाही.नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनीही याच प्रमाणे कोरोना जिल्ह्यात आणखी पसरू नये यासाठी धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 

कोरोनारुपी यमाच्या रेड्याला रोखण्यास पोलीस व जिल्हाधिकारी प्रशासन यशस्वी झाले आहे.धैर्य ठेवून जो संघर्ष करतो तोच यशाची पताका फडकवतो. तोच आलेल्या संकटावर मात करतो. शत्रू सदृश्य असो अथवा अदृश्य असो त्याचा जो पराभव करतो तोच खरा नरवीर असतो. म्हणूनच साक्षात काळालाही अहमदनगर पोलिसांची भीती वाटते. कोरोना यमाच्या रेड्यावर बसून अहमदनगर जिल्ह्याच्या सीमांवर शेपूट वर करून उधळतोय, मात्र आमचा पोलिस मामा हातात दंडुका घेऊन सिमेवर खडा पहारा देत त्या रेड्याच्या पार्श्वभागावर काठी मारतो आणि त्याला प्रत्येक सिमेवरून हुसकावून लावतो. कोरोनास्वार असलेला हा रेडा एकदा का जिल्ह्याच्या सिमेत घुसला तर तो इतका धुमाकूळ घालीन की ते शब्दात मांडणेही कठीण असेल.
मोदींनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यू आधीच काही दिवस नगर शहरात कोरोनाच्या यमाच्या रेड्याने आधी संथ पावलाने व नंतर जोराने शहरात धडकी मारण्यास सुरुवात केल्याने पोलीस व जिल्हाधिकारी प्रशासनाने या यमाच्या रेड्याला रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या. हा कोरोना यमाचा रेडा प्रत्येक प्रभागात येण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर त्याच्यावर 144 संचारबंदी चा कलम प्रशासनाने लावल्यावर तो माणसांपासून दूर पळू लागला. त्याला रोखण्यात प्रशासनात मोठे यश आले आहे. पण माणसाचं जर यमाच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले तर मग या कोरोना रुपी यमास रोखणे मात्र अवघड जाईल याचा नगरवासीयांनी विचार करावा. 
आम्ही गेल्या 20 दिवसांच्या कालखंडात जिल्ह्याची,राज्याची, देशाची प्रत्येक अपडेट जिल्हावासियांसाठी आणि ऑनलाईनद्वारे देशवासियांसाठी देत राहिलो आहोत. त्यामुळे पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने स्वत:ला झोकून देऊन काम करते हे आम्ही याची देही याची डोळा पाहितला आहे. पोलिस जेव्हा संध्याकाळी घरी जातो तेव्हा घरातलं लहान लेकरू पळत बाप आला म्हणून त्याच्या जवळ जातं, मात्र दुर्दैवाने पोलिसांना त्या लेकरांना जवळ करता येत नाही कारण कोरोनाचं भूत केव्हा, कुठून अंगावर बसला असेल अन् ते लेकराकडे जाईल हे सांगता येत नाही. किती हा त्याग, काय वाटत असेल या वेळी त्या पोलिसातल्या बापाला. काय वाटत असेल त्या पोलिसाच्या लेकराला. रडत असेल, पडत असेल, आईकडे तक्रार करत असेल, आजी-आजोबाकडे तक्रार करत असेल, बाबा मला जवळ घेत नाहीत, पप्पा मला चॉकलेट आणत नाहीत, याचा विचार तुम्ही-आम्ही कधी केलाय का? ज्या वेळेस पोलिसांकडून काही चूक होते त्या वेळेस त्यांचा आम्ही उद्धार करायला मागे-पुढे पहात नाहीत, परंतु पोलिसातल्या माणसाचं कर्तृत्व पाहितल्यानंतरही त्याचे कौतुक करणे आम्हाला जेव्हा जमत नाही तेव्हा आपल्यासारखे अप्पलपोटी कोणीच नाही, असं आम्हाला तरी वाटतं. 
गेल्या 20 दिवसांच्या कालखंडामध्ये पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियाचा आपण जर विचार केला तर नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहण्यात आला, पप्पा बाहेर जाऊ नका ना, कोरोना बाहेर आहे असं म्हणत लेक बापाला अडवते, परंतु बाप तिला खोटं सांगून वर्दी घालत घराबाहेर पडतो. किती हे हृदयद्रावी. सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रिद घेऊन बाहेर पडलेला पोलिस तुम्हाला दहा-पाच रुपये घेताना दिसतो. परंतु संकटकाळी मग ते नैसर्गिक असो, सामाजिक असो, नत्द्रष्ट पैसादींकडून आणलं गेलेला असतो त्या संकटाकाळी छातीचा कोट करणारा आमचा पोलिसच असतो. आम्ही मात्र संकट, संघर्ष यापासून कोसो दूर रहात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा आव मात्र दाखवतो. कोरोनाच्या या संकटसमयी पोलिसांनी दाखवलेली कर्तबगारी  ही धन मिळवण्यासाठी नक्कीच नव्हती हे त्यांचं कर्तव्य इमाने इतबारे पाळत आले. तुम्ही-आम्ही मात्र आपलं कर्तव्य इमाने इतबारे पाळले काय? हा प्रश्नच म्हणावा लागेल. 
रामाची व्याख्या काय, ईश्वराची व्याख्या काय, अल्लाहची व्याख्या काय? गीता कहेती है त्याग करो, कुरआन कहेता है यकीन करो, बायबल कहेता प्यार करो. त्याग-विश्वास आणि प्रेमाच्या जोरावर जशी विश्वशांतीची मोहर असते तसे कर्तव्य-कर्म आणि श्रमावर विजयाची पताका असते. परंतु या विजयाच्या पताकासाठी कुणाला मैदानात युद्ध करावं लागतं तर कुणाला घरात बसून युद्ध करावं लागतं. आज घरात बसून युद्ध करण्याची वेळ परंतु तीही आम्हाला काही प्रमाणा जमली नाही. आमच्या बुडाला कधी वळवळी सुटते आणि कधी संचारबंदी मोडून बाहेर पडतोत, असं होत राहिलं. परंतु पोलिस ज्या पद्धतीने कर्तव्यावर जीव ओवाळून टाकत काम करत राहिले. त्या पोलिसांच्या कर्तव्य-कर्माला सलाम करावा तेवढा थोडाच. मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती त्याचे शील आणि चारित्र्य आणि हे श्रमातून, कर्मातूनच मिळते. धन मिळवुनी कोटी, सवे न ये रे लंगोटी.। तुम्ही धन कितीही मिळवलं तर ते तुमच्या सोबत येत नाही येती ती तुमची लंगोटी. याचा जेव्हा विचार होतो तोच व्यक्ती कर्तव्य-कर्माला, सदाचाराला, सकारात्मकतेला महत्व देत असतो. परंतु हे महत्व काही प्रमाणात अहमदनगर जिल्हावासियांनी या लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये दिला नाही. पोलिसांनी मात्र ते पदोपदी दिल्याचे दिसून आले. अहमदनगर जिल्ह्याचं प्रशासन सजग आणि सतर्क आहे हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज नाही अथवा त्यांना ते सतर्क आहेत हे प्रमाणपत्र देण्याची गरज नही. अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेवर कोरोनाचा उच्छाद्, मुंबई-पुण्यात कोरोनाचा थयथयाट, अहमदनगरमध्ये मात्र आजही कोरोनाला  आळा घालण्याचा चमत्कार नव्हे तर कर्तबगारपणा तो केवळ आणि केवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांचा. रुग्णालयात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचा आणि या सर्वांचे नेतृत्व करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांचा. म्हणून आज नगरी दवंडी या सर्वांना सलाम करतो.

No comments:

Post a Comment