आयपीएस अधिकार्‍यांसह चौघांना दंडाची नोटीस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 26, 2019

आयपीएस अधिकार्‍यांसह चौघांना दंडाची नोटीस

आयपीएस अधिकार्‍यांसह चौघांना दंडाची नोटीस

नगरचे तत्कालीन आयपीएस अधिकारी अक्षय शिंदे यांचा समावेश

अहमदनगर ः पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी तथा नगरचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक (गृह) अक्षय शिंदे यांच्यासह चौघांना 3 लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी ही नोटीस बजावली आहे. पोलिस खात्यातील बडतर्फ कर्मचारी संजीव भास्कर पाटोळे यांनी माहिती अधिकाराखालील अर्ज केलेल्या 12 प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
संजीव पाटोळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती. या चौकशीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी अहवाल, कार्यालयीन टिप्पणी, चौकशी लिपिकाचे पद, नाव आदींची माहिती मिळण्यासाठी पाटोळे यांनी पोलिस मुख्यालयाकडे (गृह) यांच्याकडे नोव्हेंबर 2017 मध्ये अर्ज केला होता. मुदतीत माहिती न मिळाल्याने त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे प्रथम अपील दाखल केले. त्यानंतरही माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्तांकडे द्वितीय अपील दाखल करण्यात आले. याप्रकरणी आयुक्त बिष्णोई यांनी पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे व लिपिक गणेश होईफोडे यांना दोषी धरून 25 हजार रुपये दंड का आकारू नये, अशी नोटीस काढली आहे.
विभागीय चौकशी रद्द होण्यासाठी दिलेल्या अर्जाच्या कार्यवाहीबाबत देखील पाटोळे यांनी माहिती मागवली होती. परंतु ही माहिती वेळेत न मिळाल्याने आयुक्तांनी मुख्यालय उपअधीक्षक, अशोक परदेशी, गणेश डोईफोडे या तिघांना दोषी धरून दंडाची नोटीस काढली. पोलिस मुख्यालयातील शौचालय आणि 32 निवासस्थाने नादुरुस्त असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवलेला अहवाल, पोलिस मुख्यालय उपअधीक्षकांकडे कार्यालयीन टिप्पणी व जावक नंबरसह मागवलेली माहिती, खात्यातून बडतर्फप्रकरणी अपिलावरील अभिप्राय व जावक क्रमांकाची माहिती, खोटी माहिती देणार्‍यांवर कायदेशीर कारवाईची करण्याच्या मागणीचा अर्ज व त्याबाबतची माहिती, विभागीय चौकशीला उत्तर देण्यासाठी दिलेल्या अर्जाबाबतची माहिती अशा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

पाटोळे यांच्या माहिती अधिकारातील एकूण 12 प्रकरणांमध्ये विभागीय आयुक्तांनी प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची नोटीस काढली आहे. पोलिस उपअधीक्षक शिंदे यांना 6 प्रकरणांमध्ये लिपिकांसह संयुक्त दंडाची नोटीस काढली आहे. पोलिस मुख्यालयातील लिपिक गणेश डोईफोडेंना 9 प्रकरणांमध्ये, तर तत्कालीन कार्यालय अधीक्षक अशोक परदेशी यांना 6, तर लिपिक चन्ना यांना दोन प्रकरणांमध्ये संयुक्त दंडासाठी दोषी धरून नोटिसा काढण्यात आल्या. माहिती अधिकाराच्या अपिलामध्ये अर्जदार संजीव पाटोळे यांनी स्वतः काम पाहिले. पोलिस प्रशासनाच्या वतीने काही प्रकरणांमध्ये सहाय्यक निरीक्षक बोरसे, संजय शिरसाठ, गणेश डोईफोडे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment