मे. स्ट्रेसालाईट कंपनीच्या कारभाराची चौकशी करा, मग पुढच्या निविदा मागवा काँग्रेसची मागणी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 11, 2021

मे. स्ट्रेसालाईट कंपनीच्या कारभाराची चौकशी करा, मग पुढच्या निविदा मागवा काँग्रेसची मागणी !

 मे. स्ट्रेसालाईट कंपनीच्या कारभाराची चौकशी करा, मग पुढच्या निविदा मागवा काँग्रेसची मागणी !

मनपाच्या करवाढी विरोधात काँग्रेसची नागरी सह्यांची मोहीम सुरु


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपाने उद्याच्या महासभेमध्ये कोरोना संकट काळात सामान्य नागरिकांवर बोजा टाकणार्‍या तिप्पट करवाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाला शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. तसेच मनपा मालमत्ता पुनर्मूल्यांकन याच्या नावाखाली पुन्हा जीआयएस प्रणाली लागू करण्यासाठी निविदा मागवण्यापेक्षा अर्धवट काम सोडून पोबारा केलेल्या मे स्ट्रेसालाईट कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. काल काँग्रेसने जाहीर केल्याप्रमाणे आज सावेडी उपनगरातील प्रभाग क्र. एक मधून मनपाच्या या तुघलकी तिप्पट करवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने एक लाख सह्यांच्या मोहिमेला सुरुवात करीत मनपा सत्ताधार्‍यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. भिस्तबाग चौकापासून काँग्रेसच्या या मोहिमेचा आज शुभारंभ झाला. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाच्या पुढार्‍यांवर घणाघाती आरोप केला असून यावेळी बोलताना काळे म्हणाले की, सन 2012 मध्ये जीआयएस सर्वेक्षण आणि मॅपिंग प्रणाली लागू करण्यासाठी कलकत्त्याच्या मे. स्ट्रेसालाईट कंपनीची नियुक्ती महानगरपालिकेने केली होती. हा ठेका देत असताना या कंपनीने शहरातील सर्व मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन महापालिकेला करून द्यायचे होते. 2019 पर्यंत सहा-सात वर्षे उलटून देखील या कंपनीने काम न करता केवळ चालढकल केली.  कामाच्या नावाखाली महापालिकेकडून लाखो रुपयांची बिले लाटली. 2019 मध्ये कंपनीने पोबारा केला. यामध्ये मनपातील पुढार्यांचे संगनमत असून मोठा आर्थिक व्यवहार या कंपनीसोबत केला गेला असुन कंपनीने आणि मनपा पुढार्‍यांनी संगनमताने लुटलेले पैसे हे सर्वसामान्य नागरिकांच्या करातून शहरातील मनपाच्या नाकर्त्या पुढार्‍यांनी पळविले आहेत, असा आरोप यावेळी काळे यांनी केला आहे. उद्याच्या होणार्‍या महासभेमध्ये मालमत्ता पुनरमूल्यांकनाच्या नावाखाली पुन्हा एकदा जीआयएस प्रणाली लागू करण्यासाठी नवीन ठेकेदार कंपनी नेमण्यासाठी निविदा मागविण्याचा घाट घातला गेला आहे. या माध्यमातून नगरकरांवर तिप्पट करवाढ यांना लादायची आहे. काम अर्धवट सोडून नगरकरांच्या करांमधून मिळालेले पैसे लुटून पोबारा केलेल्या मे. स्ट्रेसालाईट कंपनीच्या कारभाराची आधी चौकशी करा आणि मगच पुढचे काय ते ठरवा अशी मागणी यावेळी काँग्रेसच्यावतीने काळे यांनी केली आहे. मे. स्ट्रेसालाईट कंपनी प्रकरणाच्या चौकशीसाठी लवकरच काँग्रेसचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांची भेट काँग्रेस घेणार आहे.
काळे पुढे म्हणाले की, उद्याच्या महासभेच्या माध्यमातून जीआयएस प्रणाली सर्वेक्षण लागू करण्यासाठी निविदा मागवत पुन्हा एकदा नवीन ठेकेदार नेमून त्या ठेक्यामध्ये आर्थिक लाभ मिळण्याचा मनपा पुढार्‍यांचा घाट आहे. सामान्य नगरकर कोरोनामुळे रस्त्यावर आला असताना या पुढार्‍यांना मात्र आर्थिक लूट करण्याची स्वप्न दिवसाढवळ्या पडत आहेत. काँग्रेस ही लूट होऊ देणार नाही. सर्वसामान्यांवर करवाढीचा बोजा पडू देणार नाही. यासाठी घरोघर जाऊन काँग्रेसने जनजागृती करण्याची घोषणा केली असून आज सावेडी उपनगरातून काँग्रेसच्या या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रामाणिकपणे भरलेल्या कराच्या बदल्यात लोकांना केवळ जागोजागी खड्डे, दोन दिवस आड दूषित पिण्याचे पाणी हेच मिळाले आहे. बाकी काही मिळालेले नाही, असे काळे म्हणाले.
यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, युवक काँग्रेस अध्यक्ष ड. अक्षय कुलट, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, सलीमतात्या रेडियमवाला, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखूरे, सेवादल महिला काँग्रेस अध्यक्ष कौसर खान, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, सुमनताई कालापहाड, माजी नगरसेविका जरीना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस ड. अजित वाडेकर, राहुल गांधी विचार मंचाचे शहराध्यक्ष सागर इरमल, युवक कांग्रेस उपाध्यक्ष विशाल घोलप,भगवान चव्हाण आदींसह  काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment