राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या हस्ते डोंगरगणमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या हस्ते डोंगरगणमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण

 राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या हस्ते डोंगरगणमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण

डोंगरगण, पिंपळगाव माळवीसह इतर गावांसाठी आता नवीन 33/11 केव्ही सबस्टेशन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जेऊर येथील सबस्टेशन वरुन डोंगरगण आणि आसपासच्या गावांना वीजपुरवठा होतो. मात्र, त्यामुळे अतिरिक्त भार या सबस्टेशनवर येत असल्यामुळे पिंपळगाव माळवी अथवा डोंगरगण येथे नवीन 33/11 केव्ही सबस्टेशन लवकरच होईल. त्यासाठीच्या तांत्रिक बाबी लवकरच पूर्ण होतील आणि या भागातील वीजेचा प्रश्न मार्गी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. याशिवाय, पिंपळगाव माळवी तलावातून डोंगरगण सह विविध गावांना होणार्या पाणीपुरवठ्याच्या योजना सौर उर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली.  
डोंगरगण येथे आमदार स्थानिक विकास निधी आणि इतर विकास योजनांतील पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण समारंभ आज राज्यमंत्री श्री. तनपुरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव दुसुंगे, गोविंद कोकाटे, रघुनाथ झिने सर आदी पदाधिकारी, सरपंच वैशाली मते, उपसरपंच संतोष पठारे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. तनपुरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी जनता दरबार घेतला होता. त्यावेळी गावकर्यांनी पाण्याची समस्या सांगितली होती. याशिवाय, वीज, रस्ते आदींच्या अडचणीही  मांडल्या होत्या, शुद्ध पाण्यासाठी आर.ओ. प्लान्ट, तसेच गावातील पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून दहा लाख,जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून पाच लाख आणि पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून 2 लाख असे एकूण 17 लाख रुपये निधी देऊन हे काम मार्गी लावण्यात आले. तसेच पं.दीनदयाळ उपा्ध्याय योजनेंतर्गत गावठाण भागातील दोन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले असून त्यातील एक आज कार्यान्वित करण्यात आला आहे. कृषी उर्जा धोरण अंतर्गत वीज बिलाची थकबाकी वसूल झाल्यानंतर त्यातील 33 टक्के रक्कम त्याच गावासाठी वापरण्याचा निर्णय आपण घेतला होता. त्यातूनही आपल्या गावाला आणखी दोन ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे सगळे कामकाज ठप्प झाले होते. नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. सर्व यंत्रणा दिवसरात्र कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत होती.  मात्र, दरम्यानच्या काळात आपण मांडलेल्या समस्यांबाबत त्यावेळीच कार्यवाही सुरु केली होती. त्यामुळे आपल्या गावातील कामे मार्गी लागली असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले, गावाच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व केले जाईल. पिंपळगाव माळवी तलावाच्या नाल्याचा प्रश्न महानगरपालिकेच्या अखत्यारित आहे. याबाबत आयुक्तांशी बोलणे झाले असून त्यांना आवश्यक निधि नगरविकास विभागामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना वीज थकबाकी अभावी बंद पडल्या आहेत. राज्य शासनाने नवीन कृषी ऊर्जा धोरण आणल्यानंतर त्यात गावांनी वीज थकबाकी भरल्यानंतर आलेली 33 टक्के रक्कम त्याच गावासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. तसेच उर्वरित 33 टक्के रक्कम जिल्हयासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या जिल्हा निधीतून पिंपळगाव माळवीतून पाणीपुरवठा होत असलेल्या डोंगरगण व इतर आसपासच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जेवरील पॅनेल बसवून त्याद्वारे ही योजना कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणास (मेडा) सांगितले आहे. त्यामुळे या गावांचा वीजबिल भरण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. पाणी वेळेवर उपलब्ध होईल आणि या प्रकल्पातून निर्माण होणारी अतिरिक्त सौर ऊर्जा पुन्हा महावितरणला देता येईल, असे श्री. तनपुरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते कृषी विभागाच्या खरीप हंगामाचा शुभारंभ म्हणून प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शुद्ध पाणी प्रकल्पाचे उद्धाटनही त्यांनी करुन ग्रामस्थांनी तो चांगल्या पद्धतीने चालवावा, असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment