हिंदुत्वाचा शिवधनुष्य! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

हिंदुत्वाचा शिवधनुष्य!

 हिंदुत्वाचा शिवधनुष्य!


नेक वर्षांपासून हिंदुत्वाचा हुंकार भरत असलेली शिवसेना सध्या धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर सत्तेच्या खुर्चीवर स्थापन असताना खरा हिंदुत्ववादी शिवसैनिक सैरभैर झाला असताना शिवसेना आज आपला 55 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विराजमान आहेत. सुवर्णमहोत्सव साजरा केलेली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली भविष्याची वाटचाल करत आहे. 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रांसहित शिवसेनेची स्थापना केली. 55 वर्षांच्या वाटचालीमध्ये शिवसेनेनं अनेक चढ-उतार पाहिले. जय-पराजय, बंड, नाराजी, आंदोलन, तुरुंगवार्‍या, टीका, कौतुक हे सारं शिवसेनेनं अनुभवलं. शिवसेना ही सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे तर आता उद्धव ठाकरे यांच्या एकछत्री अंमलाखाली कार्यरत असलेली संघटना राज्याच्या सत्तेतला महत्वाचा पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या रुपात राज्यात कार्यरत आहे. या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राज्याचा गाडा हाकत आहेत. कोणत्याही संघटनेला किंवा पक्षाला आपला मुख्यमंत्री राज्यावर राज्य करत असताना अनुभवणं हा खरोखरच आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे पण हिंदुत्वाचं शिवधनुष्य पेलताना शिवसेनेला आपला हिंदुत्ववादी मतदार बाजूला होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
शिवसेना हा राजकीय पक्ष अवघ्या पाच सहा महिन्यात बंद होईल अशी खिल्ली शिवसेनेच्या पक्ष स्थापनेनंतर उडविण्यात आली होती. पण आज शिवसेनेने 55 वर्षांपर्यंत मजल मारली आहे. राष्ट्रीय राजकारणात एक महत्वाचे असे स्थान शिवसेनेने राजकीय पक्ष म्हणून मिळवले आहे. आजही शिवसेना ज्या पद्धतीने पुढे जात आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवरच मार्गक्रमण करत आहे. नुसती महाराष्ट्रापुरती शिवसेना मर्यादित राहिली नसून देशाच्या राजकारणात शिवसेनेचे एक महत्वाचे असे स्थान निर्माण झाले आहे. मराठी माणसाला आजही शिवसेनेचा आधार वाटतो. मराठीच्या मुद्द्यासोबतच देशाच्या राजकारणात शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा प्रभाव आहेच, पण राष्ट्रीय राजकारणातही चमक दाखवण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. केंद्रात सत्तेत असो वा नसो, शिवसेनेचा आवाज नेहमीच बुलंद राहिला. हिंदुत्वापासून अनेक मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका काय हे नेहमीच महत्वाचे ठरले आहे. म्हणूनच राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेना काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरत आले आहे. शिवसेनेनंतर आलेले अनेक राजकीय पक्ष हे कालांतराने नामशेष झाले. पण आज शिवसेनेला 55 वर्षे पुर्ण झाली आहेत. मराठी लोकांवर होणारा अन्याय निवारणाची भूमिका घेऊन सुरू झालेला एक छोटाशा पक्ष फार काळ टिकणार नाही असे अनेकांचे सुरूवातीला मत होते. तर अनेकांनी शिवसेना ही मुंबई महापालिकेच्या पुढे जाणार नाही, पाच सहा महिन्यातच बंद होईल अशीही टीका केली होती. आज शिवसेना 55 वर्षांची होतानाच महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेला महत्व आहे.
स्थित्यंतरं हा निसर्गाचा नियम आहे तसं सगळंच बदललं आहे. त्यामुळेच या बदललेल्या राजकीय परिस्थितीतला महाराष्ट्र सामोरा जातोय. त्याचाच परिपाक म्हणजे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आहे आणि मागच्या विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवून भाजप विरोधी पक्षांच्या बाकावर बसलेला आहे हीच लोकशाहीची खरी गंमत आहे. शिवसेनाप्रमुख ठाकरे हे संघटनेत लोकशाहीला फारसे महत्व देत नव्हते, मात्र आता त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संविधानाच्या आधाराने चालणारं आणि विचारविनिमय करूनच वाटचाल करायला भाग पाडणारं नेतृत्व म्हणून काम करावं लागत आहे. दीड वर्षाच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आता राजकीय खेळपट्टीवर स्थिरावले आहेत. या काळात मात्र त्यांचा उर्जेनं भरलेला शिवसेना पक्ष काहीसा मौनव्रत घेतल्यासारखा वाटला. कारणं पक्षप्रमुख सर्वोच्च पदावर असताना विरोध तरी कोणाला आणि कसा करायचा हा स्वाभाविक प्रश्न शिवसैनिकांना पडला असावा. त्यामुळे त्यांनी यासाठी मोदी आणि केंद्र सरकार यांची निवड केली. अर्थात कर्जबाजारी महाराष्ट्र आणि कोरोना याबरोबरच सेनानेत्यांच्या काही चुका आणि त्यावर केंद्रीय संस्थांचा तपास यामुळे फारसा प्रभाव पाडता आला नाही. नुकतीच झालेली मुख्यमंत्री ठाकरेंची दिल्लीवारी, शुक्रवारी राजभवनावर राज्यपाल कोश्यारींवर वाढदिवसाच्या निमित्ताने झालेला शुभेच्छा वर्षाव यालाही एक वेगळा अर्थ आहे. अर्थात राजकारणात काहीही घडू शकतं. तिथे काहीही घडताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षालाही चेतवत ठेवण्याची किमया साधायला हवी. नव्या जुन्याचा मेळ घालता यायलाच हवा. साठच्या दशकात मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी सुरू झालेल्या शिवसेनेने वेळोवेळी आपली दिशा बदललेली आहे.
शिवसेना हा तळागाळातला पक्ष आहे. हीरक महोत्सवाकडे वाटचाल करणार्या शिवसेनेला येणार्‍या काळात बरीच आव्हानं पेलायची आहेत. त्या राजकीय लढ्यांसाठी कष्टकरी, शेतकरी, तरुण आणि महिलांना आपल्याबरोबर सातत्याने ठेवणं ही एक कसोटीच ठरणार आहे. गेल्या काही काळात राजकारणाचं व्यापारीकरण झालं त्याचा फार मोठा फटका शिवसेनेला बसला नाही. याचं कारण शिवसैनिकांचं पक्षाभोवती असलेलं मोहोळ हेच आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘जनता दरबार’ची एक संकल्पना राबवायला सुरुवात केलीय. एका बाजूला मंत्रालयातली सत्ता आणि दुसर्या बाजूला पक्षाचं जाळं याची वीण घट्ट करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केलेत. त्याला दुसर्या फळीतील सहकार्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तसा प्रयत्न शिवसेनेत होणं गरजेचं वाटत आहे. शिवसेनेसमोर आव्हानांचे शिवधनुष्य आहे. सत्ता आणि संघटनेचा मेळ घालण्यासाठी शिवसेनेला नवी रणनीती बनवता आली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल.

No comments:

Post a Comment