गाव कोरोनामुक्त ठेवायचं आहे” हा संदेश गावागावात पोहोचवावा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

गाव कोरोनामुक्त ठेवायचं आहे” हा संदेश गावागावात पोहोचवावा !

 गाव कोरोनामुक्त ठेवायचं आहे” हा संदेश गावागावात पोहोचवावा !

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी साधला दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद...
नगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः “एक देश म्हणून आपण एकजुटीने काम करायला हवं. गाव कोरोणा मुक्त ठेवायचा आहे हा संदेश गावागावात पोहोचवावा” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यासह 17 जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान श्री. मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. पंतप्रधान श्री. मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे म्हणणे अतिशय मन:पूर्वक ऐकले.
केंद्र आणि राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशांची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, ब्रेक दी चेन आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत न होता बाधितांना शोधण्याची मोहिम याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.  कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर/हॉस्पिटल यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क रुग्णांना परत करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्याने कामात गती आली. त्याचा सकारात्मक परिणाम यंत्रणेवर झाला. ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणाना उद्युक्त केले. ज्या गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले, त्या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मनोबल बाढविले. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आणि हिवरेबाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव कोरोनामुक्त केले. त्यांना व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये बोलावून त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांना ऐकवले, त्याचाही सकारात्मक परिणाम गावागावात झाल्याची माहिती डॉ. भोसले यांनी यावेळी  दिली.

No comments:

Post a Comment