कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा दिवस पारनेरमध्ये साजरा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा दिवस पारनेरमध्ये साजरा !

 कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा दिवस पारनेरमध्ये साजरा !


पारनेर -
मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.  27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन.  मराठी भाषेविषयी कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यातील शिळा.. हे तितकेच खरे आहे. अनेक वर्षानंतर मात्र मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची वेळ अपना वर आली आहे. ह्याचा विचार करण्याची गरज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे.
आजही आपणास भाषा-आग्रही असंही सांगतात की, मराठी ही केवळ बोली स्वरूपात उरू नये. शिक्षणाचं माध्यम म्हणून तिचा आग्रह असावा. मराठीला ज्ञानभाषेचं वैभव प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर मराठी भाषकांनी वैश्विक नागरिक अवश्य व्हावं, पण आपली मुळं, आपली स्थानिक ओळख विसरू नये. त्यांनी आपापले ज्ञानविषय, संज्ञा-संकल्पना ह्यांचं धन मराठीत आणावं. परप्रांतीयांवर खापर फोडण्यापेक्षा, त्यांना मराठी शिकावं लागेल अशी शासकीय धोरणं आखावीत आणि त्यांना मराठी शिकावीशी वाटेल अशी व्यवस्था करावी. सर्वांसाठीच मराठीचे प्रमाणित अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापनाच्या उत्तम साधनसुविधा, नवमाध्यमांचा वापर ह्यांतून मराठीचं शिक्षण आनंददायी बनवायला हवं.
मराठी विषय घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन क्षेत्रापलीकडे प्रसारमाध्यमं, मनोरंजनमाध्यमं, प्रकाशन व्यवसाय, भाषांतर, भाषा,साहित्य-समाजविषयक संशोधन, भाषा आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांसाठीची व्यावसायिक कौशल्यं रुजवायला हवीत. त्या दृष्टीने अभ्यासक्रम मंडळं, अध्यापक, शिक्षणसंस्था आणि विद्यार्थी ह्यांनी चाकोरीच्या बाहेर पडून विचार करायला हवा. शिक्षणक्षेत्रात मराठी हा विषय टिकणं हे निव्वळ मराठीच्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याकरिता आवश्यक नाही; तर मराठीला ज्ञानभाषा बनविण्याकरिता आवश्यक ती कोश, सूची आदी साधनं निर्माण करण्यासाठीचं कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होण्यासाठीही ते आवश्यक आहे. शासकीय पातळीवर मराठी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालये व विद्यापीठं येथील मराठीचे विभाग ह्यांसाठी संरक्षक धोरणं आखली जायला हवीत आणि ह्या धोरणांना समाजाची साथ हवी.
आपणही आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना विनम्रतापूर्वक आणि अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते, संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटया छोटया कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच ‘अल्प योगदान’ दिल्याचे समाधान लाभू शकेल.  भाषा दिनाच्या निमित्ताने आपण काय करू शकतो ह्याचा विचार करु या...
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान 10 तरी ‘फोन कॉल’ हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरु वात ‘हॅलो..!’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर?  म्हणजेच ‘नमस्कार!’ या शब्दाने आपण संवादास सुरुवात केली तर? त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.
आपण आपल्या ‘मोबाइल’वरून किमान 10-15 तरी  एसएमएस दररोज पाठवतो. ते सगळेच अर्थातच इंग्रजीतून असतात किंवा इंग्रजी लिपी आणि मराठी शब्द अशा पद्धतीने असतात. ते मराठीतून पाठवले तर? पुन्हा एकदा भाषेवरील प्रेमाबरोबरच माहिती तंत्रज्ञानात मातृभाषेचा केला जाणारा वापर आपल्याबरोबरच समोरच्यालाही समाधान देऊ शकेल. शिवाय आज कित्येकदा घरकाम करणार्‍या व्यक्ती इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मोबाइलचा परिपूर्ण वापर करीत नाहीत. अशांना मराठीतील लघुसंदेश पाठविले गेल्यास त्यांना आपण मूळ प्रवाहात आल्यासारखे वाटेल. जी बाब एसएमएसची तीच ई-मेलचीसुद्धा! आपल्याला सध्या सर्वच संकेतस्थळांद्वारे ‘फोनेटिक’ (उच्चारावरून शब्द) पद्धतीने अनेक भाषांत ई-मेल पाठविण्याची सुविधा आहे. ठरवून आपण दिवसभरात किमान एक ई-मेल मराठीतून नक्कीच करू शकतो.
आज आपल्याला सणांच्या सुट्टया हव्याहव्याशा वाटतात. पण भारतीय महिने आणि दिनदर्शिका आपण विसरतो. इतकी की कित्येकदा ‘गुरुपौर्णिमे’च्या तिथीऐवजी आपल्याला ‘वट पौर्णिमे’ची तिथी आठवते. पण चैत्र, वैषाख, ज्येष्ठ.. असे महिने आणि त्या त्या महिन्यांत येणारे सण आपल्याला सांगता येतील का? नवरात्र म्हणजे आश्विन महिना हे किती जणांना माहिती असते? तेव्हा किमान ज्या सणांच्या आपल्याला राष्ट्रीय सुट्टया असतात अशा सणांच्या तरी भारतीय दिनदर्शिकेची आपल्याला माहिती हवी आणि ते त्याच तिथीनुसार बोलता यायला हवेत. आपण हल्ली सामान्यपणे महिन्याला किमान एकतरी चित्रपट पाहतोच. मग तो कितीही ‘टुक्कार’ का असेना! अशा वेळी आपण आपल्या भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर?
इंग्रजीचा आग्रह धरणार्‍या विद्वानांचे म्हणणे असते की, इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. जगात सर्वत्र व्यवहाराला उपयोगी पडते या मंडळींना सांगावेशे वाटते की, तुम्ही इंग्रजी भाषा  शिका पण त्यासाठी मराठी भाषेचा बळी देऊ नका. सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात शिकण्याची आवश्यकता नाही. जपान सारख्या प्रगत देशात सर्व शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच चालते. आज जगाच्या कानाकोपर्‍यात त्यांचे वैज्ञानिक व व्यापारी जात असतात, पण त्यांचे कोठेच अडत नाही तर उत्तरोत्तर प्रगती चालू आहे. तुम्ही इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलाला- मुलीला जरूर शिकवा. स्पर्धेच्या युगामध्ये इंग्रजी भाषा शिकणे गरजेचे आहे परंतु मातृभाषा ही सुद्धा गरजेची आहे. इंग्रजी भाषेमुळे त्याला रोजगार, मानसन्मान मिळेल, पैसा मिळेल. परंतु आपल्या मराठी मातृभाषेतून मिळालेल्या ज्ञानातून त्याला संस्कार मूल्य मिळतील. मराठी भाषेचा गोडवा त्याला समजदार, जबाबदार, सुजन नागरिक घडवण्यास मदत करीन. म्हणून भाषा दिनाच्या निमित्ताने भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठीच आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल अन्यथा प्रतिवर्षी मराठी भाषा दिन येत राहील.. आणि जात राहील.

No comments:

Post a Comment