ज्ञान व कौशल्य हीच खरी संपत्ती- अ‍ॅड. धर्मा जपकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

ज्ञान व कौशल्य हीच खरी संपत्ती- अ‍ॅड. धर्मा जपकर

 ज्ञान व कौशल्य हीच खरी संपत्ती- अ‍ॅड. धर्मा जपकर

नेप्ती विद्यालयात रंगली निबंध व चित्रकला स्पर्धा; व्याख्यानातून युवकांना प्रेरणा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ज्ञान व कौशल्य हीच खरी संपत्ती असून, युवकांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. विविध व्याख्यानातून युवकांना आपले ज्ञान वाढविता येते व स्वत:चा विकास साधता येतो. युवकांनी ध्येय समोर ठेऊन त्या दिशेने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचे प्रतिपादन श्री स्वामी अण्णा-हजारे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. धर्मा जपकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, नर्मदा फाउंडेशन व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त श्री स्वामी अण्णा-हजारे शिक्षण संस्था संचलित नगर तालुक्यातील नेप्ती विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धेसह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. जपकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, नर्मदा फाउंडेशनचे अध्यक्ष ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर, उडाण फाऊंडेशनच्या आरती शिंदे, द युनिव्हर्सलचे सागर अलचेट्टी, नयना बनकर, किरण सातपुते, प्रा. अश्विनी अनाप, रजनी ताठे, शाहीर कान्हू सुंबे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, पोपट बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जपकर पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ सर्वांसमोर आदर्श व प्रेरणादायी असून, या महान व्यक्तींचे विचार आत्मसात केल्याने बदल घडणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांसह युवकांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून युवकांमध्ये जागृती करण्यात आली. ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर यांनी स्पर्धेमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन आपली क्षमता कळते. स्पर्धा या व्यक्तिमत्त्वाला चालना देण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे आपली आकलन क्षमता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, बाबा भोर, तुळसा कदम, राधाताई वामन या शिक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निबंध व चित्रकला स्पर्धेचे परीक्षण अ‍ॅड. भानुदास होले व प्रा. अश्विनी अनाप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण दळवी यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment