शाळेची घंटा पुन्हा वाजावी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 22, 2021

शाळेची घंटा पुन्हा वाजावी !

शाळेची घंटा पुन्हा वाजावी !


कोरोनाने राज्याला घातलेला विळखा सैल होतो आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आता भारतीय बनावटाची लसही उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेला नुकतीच सुरुवात झाली. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. कागदोपत्री लॉकडाऊन आहे, पण सर्व क्षेत्रांत व्यवहार सुरू करायला हळूहळू परवानगी दिली जात आहे. उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्य जनतेसाठी कधी सुरू होणार हा जसा संवेदनशील मुद्दा आहे तसेच राज्यातील शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस सर्वांसाठी कधी खुले होणार व त्यांचे कामकाज पूर्ववत कधीपासून होणार हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील शाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू होतील, असे शालेय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले तेव्हा शिक्षक, पालक, विद्यार्थी व संस्थाचालक यांना निश्चितच हायसे वाटले. सारे जण शाळा कधी सुरू होणार याची गेली कित्येक दिवस अगदी चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. शाळा कधी सुरू होणार हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे, मग त्यासंबंधी महापालिका व शिक्षण मंत्रालय यांच्यात संवाद होत नाही का 27 जानेवारीला पाचवी ते आठवीचे वर्ग शाळेत सुरू करण्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाने ठरवले असले तरी स्थानिक पातळीवरील प्रशासन तेथील परिस्थिती व सुरक्षा उपाय यांचा विचार करून अंतिम निर्णय घेईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. मंत्रीमहोदय व मंत्रालयातील वरिष्ठ कसे हात वर करतात त्याचा हा नमुना आहे.  
शाळा सुरू झाल्यावर जर कोरोनाच्या संबंधात जर उद्या कमी-जास्त काही घडले, तर त्याचे खापर स्थानिक प्रशासनावर फोडायला मंत्रालयातील हेच अधिकारी तयार होतील. कोविड 19च्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना काय दक्षता घेण्याची गरज आहे, त्यासंबंधी सूचना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) स्वतंत्र जारी केल्या जातील, असे शासनाने जाहीर करून टाकले आहे. मुंबईत व मुंबई महानगर प्राधिकरण प्रदेशात कोविड 19 बाधित केसेस दिवसेंदिवस कमी होत आहेत, पण राज्यातील काही गावात अजूनही केसेस नव्याने नोंद होत आहेत. या सर्व परिस्थितीची जाणीव ठेऊन शाळा जरी सुरू झाल्या तरी शाळेत आपल्या पाल्याला पाठवताना त्याच्या पालकांनी हमीपत्र शाळेला भरून द्यावे, असे शासनाने म्हटले आहे. याचा अर्थ शाळा सुरू झाल्यावर पाल्याला शाळेत गेल्यावर काही झाले, तर त्याची जबाबदारी शाळेवर वा शासनावर राहणार नाही असाच होतो. असे हमीपत्र लिहून देण्यास अनेक पालक तयार होतील, पण अनेक पालक भीतीपोटी असे लेखी पत्र देण्यास राजी होणार नाहीत हा सुद्धा धोका आहे. शाळेतील शिक्षकांना आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे सक्तीचे आहे. अर्थात त्या चाचणीला शिक्षक नकार देणार नाहीत व त्यांच्याही ते हिताचे आहे. 

    गेल्या वर्षी नोव्हेबर 23 पासून राज्यात नववी व दहावीचे वर्ग शाळेत सुरू झाले, त्याला प्रतिसाद चांगला आहे. सर्व प्रतिबंधात्मक व दक्षतेचे उपाय काटेकोरपणे पाळले जात आहेत. जवळपास पंधरा लाख विद्यार्थी रोज शाळेत, वर्गात हजेरी लावत आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांत नववी व दहावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. शाळा सुरू करताना शालेय शिक्षण विभाग व आरोग्य मंत्रालय यांनी परस्पर सहकार्याने काम करणे आवश्यक आहे व तसे करणे जरुरीचेही आहे. शिक्षक व विद्यार्थी या दोघांचेही आरोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहे. 

    कोरोनाची दुसरी लाट विदेशात काही ठिकाणी आली. ब्रिटन व अन्य देशात त्याने कहर केला. तशी परिस्थिती मुंबई व महाराष्ट्रात उद्भवू नये म्हणून प्रशासन शाळा सुरू करण्याचा निर्णय धीमेपणाने घेत आहे, असे सांगण्यात येते. जोपर्यंत शाळा नियमित सुरू होत नाहीत, तोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करणे, प्रॅक्टिकल्स, चाचण्या, गृहपाठ, परीक्षा यांची पूर्ववत अंमलबजावणी होणे कठीण आहे. दहावी-बारावीच्या मंडळाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर शाळांचे वर्ग नियमित सुरू होणे आवश्यक आहेत. त्या दृष्टीने शिक्षण विभाग पावले उचलत आहेत. पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलांचे जवळपास ऐंशी-नव्वद टक्के पालक हमीपत्र देऊन पाल्यांना शाळेत पाठवायला तयार आहेत. ज्या मुलांना गावी पाठवले आहे, त्यांना परत कधी बोलवायचे हाच पालकांपुढे मुद्दा आहे. शहरात व गावी राहणारी मुलेही सध्या ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन क्लासेस आता सर्वत्र रूढ पद्धत झाली असली तरी त्यात आनंद व समाधान कोणाला किती मिळते हा संशोधनाचा विषय आहे. मुलांना संभाळणे, त्यांना नीट शिकवणे, त्यांना शिकवलेले आकलन झाले की नाही हे तपासणे हे ऑनलाइनवरून सहन रोज शक्य होत नाही. अनेकदा मुलांचेही ऑनलाइन शिकवण्यामागे लक्ष लागत नाही. राज्यात सुरू झालेल्या शाळांमध्ये मैदानावर कवायतीचे तास होत आहेत, पण खेळ सुरू झालेले नाहीत. मुंबई-ठाण्यातील मैदाने अजून ओस पडली आहेत. शाळेचे वर्ग लवकर सुरू व्हावेत, अशी शिक्षक, पालक व पाल्यांची इच्छा आहे. मास्क, सॅनिटायझर किंवा सोशल डिन्स्टन्सिंगसाठी शाळा तयार आहेत.    शाळेची घंटा पुन्हा वाजावी म्हणून सारे आतुर आहेत.

No comments:

Post a Comment