अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांसोबत नैतिक शिक्षणाची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांसोबत नैतिक शिक्षणाची गरज

 अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांसोबत नैतिक शिक्षणाची गरज

32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः रस्ते सुरक्षितते संदर्भात नियमांच्या अंमलबजावणीसोबतच नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे. रस्ता हा सर्वांसाठी आहे, हे ध्यानात ठेवून अवलंब केल्यास अपघातांची संख्या कमी होईल, असे मत आज रस्ता सुरक्षा अभियान शुभारंभ प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.

32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले हे होते. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा पोलीस विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अहमदनगर विभागाचे नियंत्रक विजय गीते, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदींची उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना खा. लोखंडे म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात वाहतूक नियमांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे.  त्याठिकाणी वाहतूक नियम पाळले जातील, हे पाहिले पाहिजे. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि ग्रामीण रस्त्यावरही अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन अपघात टाळले जातील, याचा उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांनी रस्त्यावरुन जाताना अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी त्यादृष्टीने परिवहन विभागाने संबंधित साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनांना सूचना देऊन सुरक्षिततेविषयी उपाययोजना करण्यास त्यांनी सांगितले.
   जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी वारंवार होणारे अपघात आणि त्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजात या प्रश्नावर काम करणार्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी अशाप्रकारे कोणत्या ठिकाणी काय अडचणी येत आहेत आणि त्यावर काय उपाययोजना केली जाऊ शकते याबाबत त्यांचेही विचार व्यक्त करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कारण वाहतूक नियमनात नागरिकांची भूमिका सर्वाधीक महत्वाची असल्याचे ते म्हणाले. अपघात झाल्यानंतर मदतीसाठी जाण्याची लोकांची भावना असते. मात्र, त्यांच्या मनातील भीती दूर करणे आवश्यक आहे. या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून  परिवहन विभाग आणि पोलीस यांनी ती भूमिकाही पार पाडावी, असे त्यांनी नमूद केले.
   जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर विवेचन केले. व्लॅक स्पॉटसवर होणारे अपघात टाळण्यासाठी तेथील अशी ठिकाणे शोधून त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर, नागरिक आणि वाहनचालकांचे नियमांबाबतचे शिक्षण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नैतिक शिक्षणाचीही गरज आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी महत्वाचा विषय असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस विभागामार्फत दिनांक 17 फेब्रुवारीपर्यंत सुरु असणार्या या अभियानात विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती दिली. यामध्ये साखर कारखान्यांच्या सहकार्याने ऊस वाहतूक करणार्या ट्रॉलीना रिफ्लेक्टर बसविणे, अवजड वाहन चालविणार्या चालकांची आरोग्य तपासणी, पोलीसांसाठी ड्रायव्हिंग लायसेन्स शिबीर आदी उपक्रम घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
   कोविड काळात जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी हे प्रमाण त्याहून कमी येईल, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
   कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले. या कार्यक्रमास पोलीस, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या यंत्रणांच्या प्रतिनिधींसह वाहतूक चालक-मालक संघटना, डीलर्स असोसिएशन, जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशन आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment