वाचन संस्कृती वृद्धींगत करुन भाषेचा दर्जा वाढवा- डॉ.प्रा.लक्ष्मीकांत येळवंडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

वाचन संस्कृती वृद्धींगत करुन भाषेचा दर्जा वाढवा- डॉ.प्रा.लक्ष्मीकांत येळवंडे

 वाचन संस्कृती वृद्धींगत करुन भाषेचा दर्जा वाढवा- डॉ.प्रा.लक्ष्मीकांत येळवंडे

जिल्हा वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विविध उपक्रम


नगर -
मराठी भाषेतील ग्रंथ, साहित्य व त्यामागचे महान असे लेखक यामुळे मराठी समृद्ध आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या काळात तरुण पिढीला तंत्रज्ञानाचा वापर करुन वाचन संस्कृती वृद्धींगत करणे ही काळाची गरज आहे. सद्यस्थितीत धावपळीच्या जगात बदलत चाललेेले प्रत्येकाचे जगणे, त्यामधील संघर्ष आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहून संवेदना जागृत ठेवून सर्वांपुढे मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन तरुण पिढीला प्रोत्साहन देण्याची गरज असून, जिल्हा वाचनालय हा वारसा अनेक दशके सांभाळत असल्याबद्दलचे समाधान न्यू आर्टस् महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी व्यक्त केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, लेखक सदानंद भणगे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, प्रा.मेधाताई काळे, दिलीप पांढरे, किरण आगरवाल, अनिल लोखंडे, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते.जिल्हा ग्रंथालय अधिकारी गाडेकर यांनी जिल्हा वाचनालय हे ग्रंथाच्या बाबतीत लखपती असलेले दुर्मिळ ग्रंथालय आहे. वाचनाचा व भाषा समृद्धीचे हे प्रवेशद्वार असल्याने त्याचे महत्व अमुल्य असल्याचे सांगून हा वाचन संस्कृतीचा वारसा जिल्हा वाचनालयाने सुमारे 182 वर्ष जपल्याने हा नगरकरांना अभिमानास्पद असल्याचे सांगितले.अध्यक्ष प्रा.मोडक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन वाचनालय रसिक वाचकांसाठी सातत्याने वाचन व भाषा संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी शिल्पा रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक सदानंद भणगे यांनी वाचनालयास पुस्तक भेट दिले. आभार गणेश अष्टेकर यांनी मानले.यावेळी ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, अविनाश रसाळ, कर्मचारीवृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment