सत्ते बाहेरचा रिमोट कंट्रोल ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

सत्ते बाहेरचा रिमोट कंट्रोल !

 सत्ते बाहेरचा रिमोट कंट्रोल !


ज (23 जानेवारी) हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 95वी जयंती. मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली 46 वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.
सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल 46 वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला.
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणार्‍या बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढयाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली.
त्यानंतर बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली. 1960 मध्ये ‘फ्री प्रेस’मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी ‘मार्मिक’मधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला.. प्रबोधनकारांशी आणि सहकार्‍यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्चित झाले. 19 जून 1966 या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून ओळखू लागला.
बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणांतून विरोधकांवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत असत. त्यातूनच त्यांची भाषणाची एक वेगळीच ठाकरी शैली उदयास आली. त्या काळचे काँग्रेस नेते आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही ठाकरे यांनी अनेकवेळा जोरदार प्रहार केले आहेत. शरद पवार यांच्याबाबत ठाकरे यांना नितांत आदर होता. तसेच, त्यांचे व्यक्तिगत पातळीवरचे संबंधही अत्यंत सौहार्दपूर्ण आणि उत्तम होते. असे असले तरी, जाहीर भाषणांतून मात्र ते त्यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत असत. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांचा ‘बारामतीचा म्हमद्या’, ‘मैद्याचं पोतं’ असा जाहीर भाषणांतून अनेकदा उल्लेख केला आहे. इतकी जहाल टीका करुनही त्यांच्यातील मित्रप्रेमात मात्र कधीच अंतर आले नाही.

No comments:

Post a Comment