ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे कारखानदारांना खुलं आव्हान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे कारखानदारांना खुलं आव्हान

 कारखाना सुरू होण्याआधी कोणी ऊस बिल जाहीर करणार का?

ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे कारखानदारांना खुलं आव्हाननगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा (योगेश चंदन) ः तोंड वर करून लाखोंची उड्डाणे घेणार्‍या चेअरमन लोकहो ज्यांच्या जीवावर आपण थोर तोंड करून सांगत आहात की इतक्या लाखाचे आपलं गाळप उद्दिष्ट आहे, इतकी लाख साखर आपण उत्पादित करणार आहोत, अमुक अमुक लाख पोती आपल्या कारखान्यातून बाहेर येतील ! धुराडी पेटवताना बड्या बड्या बाता मारणारे तुम्ही, असा एक तरी माय का लाल आहे का; की जो म्हणेल या वर्षी पहिला हप्ता मी अमुक अमुक रु एव्हढा देणार आहे, आणि तोही काटा पेमेंट करणार आहे; कारखाना बंद झाला की एव्हढी एव्हढी रक्कम देणार आहे, पुन्हा लगेच पोळ्याच्या सणाला इतके इतके रुपये देणार आहे, दिवाळ सणाला माझ्या ऊस उत्पादक बंधूंच्या लेकी बाळींची दिवाळी जोरात करण्यासाठी अमुक अमुक बिल आणि ठेवींवर एव्हढे टक्के व्याज देणार आहे, संक्रांतीला अजून इतके इतके देणार आहे आणि सर्व मिळून मी तुम्हाला एकूण एव्हढी एव्हढी रक्कम ऊस बिलापोटी देणार आहे. बड्या बड्या बाता आणि ढुंगण खातं लाथा, ज्यांच्या जीवावर तुमच्या उड्या आहेत, त्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कधीतरी ब्रॉयलर प्रतिपादना च्या सोहळ्याला खुश करा कधीतरी, मढ्याच्या टाळूवरील लोणी किती दिवस खाणार, कधीतरी त्या शेतकर्‍यांना पण संधी द्या लोणी खाण्याची, असं तुम्ही कधीच करू शकणार नाही, कारण तुम्हाला जो भसम्या रोग झालाय त्यातून तुमची मुक्तता थोडीच होणार आहे. आनुवंशिक रोग आहे हा तुमचा, विरासात मध्ये लेकरा बाळांना पण देऊन जाणार तुम्ही, दोन वर्ष त्या बिचार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचे दाम न देणारे तुम्ही,त्या बिचार्‍या कामगारांचे पगार न देणारे तुम्ही; झालं काम की हो लांब म्हणणारे तुम्ही ;
   आपला नफा मिळवून, कारखाना धुवून,घासून पुसून खाणारे तुम्ही शेतकर्‍यांच्या भल्याचा विचार करतीलच कसे, दोन दोन तीन तीन कारखान्याचे मालक,त्यात वरून आमदारकी,पक्षाने दिलेली पदे, आठ दहा पैसे देणार्‍या संस्थांचे मालक तुम्ही, कारखाना दिवाळखोरीत निघाला तर काय फरक पडणार तुम्हाला?
फरक तर त्या ऊस उत्पादक सभासदांना पडणार, फरक त्या घरदार सोडून कारखान्यात मर मर मरणार्‍या बिनपगारी कामगारांना पडणार, रात्रंदिवस जागून, व्याजाने पैसे काढून ट्रॅक्टर टोळी करणार्‍या त्या वाहन चालकांना पडणार ! चेअरमन साहेब ज्या वेळेस तुम्ही निवांत झोपलेले असतात, त्यावेळेस शेतकरी रात्रभर जागून उसाला पाणी देत असतो, ते ऊस तोडणी कामगार भर रात्री ट्रेलर मध्ये उसाच्या मोळ्या टाकत असतात, तो ड्रायव्हर थंडी वार्‍याचे तो ऊस कारखान्याकडे घेऊन येत असतो आणि ट्रॅक्टर कारखान्यावर पोहचेपर्यंत तो ट्रॅक्टर मालक जागा असतो, तिथून पुढं काम चालू होतं कारखान्यातील कामगारांचे, इतक्या सगळ्यांच्या कष्ठावर मजा मारणारे तुम्ही! तुम्हाला ही टेन्शन ताण असतो आम्ही नाही म्हणत नाही, पण तो तेव्हाच जेंव्हा इलेक्शन असते, तुम्हाला झोपा येत नसतील चेअरमन साहेब,पाच पन्नास लाख खर्चून आपण  निवडून येता, आणि पाच सहाशे कोटी वसूल होईपर्यंत आपण शेतकर्‍यांच्या बोकांडी बसता, एका सिजन ला एकूण एक गोळाबेरीज केली तर शंभर कोटी सहज मिळत असतील ना हो साहेब? किती कष्ट घ्यावे लागत असतील बरं आपणास इतकं कमावण्यासाठी!!
   मग धुराडी पेटवताना निदान पहिला हफ्ता तरी जाहीर करायला काय हरकत आहे आपणास? मी तर म्हणेन आपण एकूण किती दर देणार हे जाहीर करायला पण हरकत नाही ! आणि जो काटा न मारता काटा पेमेंट देईल,कोणत्याही काट्यावरून वजन करून आना म्हणून सांगेल, त्यांचा तर फुल्ल पोशाख देऊन सत्कार करेल बळीराजा! पण तुमचं गणित जुळलं पाहिजे ना? जुळवा तुमचं पण, तरीही शेतकर्‍यांना पण जपा जरा त्यांना जास्तीची अपेक्षा नसते हो चेरमन साहेब,त्याला अपेक्षित आणि वेळेवर दिलं की तो खुश होतो, चेअरमन साहेब, भैय्यासाहेब, दादा साहेब, आमदारसाहेब, म्हणत आयुष्यभर तुमचा झेंडा मिरवायला मोकळा होतो,म्हणून त्यांना खुश ठेवणं आपलं आद्य कर्तव्य आहे, पण तरीही आपला लालची आणि भसम्या स्वभाव काही केल्या सोडवत नाही, आणि मग शेतकरी उद्विग्न होतो, तुमच्याबद्दल त्याच्या मनात राग निर्माण होतो आणि तोच मग तुमच्या अब्रू ची लक्तरे वेशीवर टांगतो! म्हणून म्हणतोय थोडं द्यायला शिका, शेतकरी, कष्टकरी कामगार लोकांना जपायला शिका, दादांनो इथं घेतलेला श्वास सुद्धा इथेच सोडायचा आहे, मग काय घेऊन जाणार आहात तुम्ही ? वाटल्याने वाढते कारखानदारांनो जितकं वाटचाल त्याच्या दुपटीने तुम्हाला माघारी मिळेल, मग ते पद-प्रतिष्ठा किंवा धन संपत्ती च्या स्वरूपात असेल!बघा जमलं तर,मोळी पूजन च्या दिवशी ऊस बिल जाहीर करायचे धारिष्ट्य दाखवा.
 त्या बिचार्‍या शेतकर्‍यांना कधीतरी आनंदाचा सुखद धक्का द्या, अन्यथा तो आसूड घेऊन तयारच आहे तुम्हाला धक्के मारून बाहेर काढायला.!!
एक ऊस उत्पादक शेतकरी...!
भाऊसाहेब मांडे
तालुकाध्यक्ष रयत क्रांती संघटना श्रीगोंदा


No comments:

Post a Comment