मृत्यूनंतरही नरकयातना! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 11, 2020

मृत्यूनंतरही नरकयातना!

 मृत्यूनंतरही नरकयातना!


कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असणार्‍या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा रोजच वाढत आहे. अहमदनगर जिल्हाही त्यास अपवाद नाही. नगर जिल्ह्याने कोरोना रुग्णांचा दहा हजारांचा टप्पा कालच पार केला असताना, कोरोना रुग्णांनी जिवंतपणी भोगलेल्या मरणयातना भोगल्यानंतर मृत्युसमयी त्यांच्या मृतदेहाची किती हेळसांड होत आहे हे कालच्या एका घटनेने समोर आले आहे. दर दिवशी वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आरोग्ययंत्रणेने पुढे आव्हान निर्माण करीत असताना, एकाच शववाहिकेत 12 मृतदेह अस्ताव्यस्त ठेवून अंत्यविधीसाठी नेले जात असल्याचे विदारक चित्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी उघड केले आहे. बोराटे यांनी उघड केलेल्या घटनेनं रुग्णालयातील आरोग्यप्रशासनाच्या अब्रुची लक्तरे  वेशीवर टांगली गेली आहेत. ज्या मुलांवर, आई-वडील, चुलते, काका, बाबा, आजोबा यांचेवर आपण जीवापाड प्रेम करतो. त्या प्रिय जीवांची मृत्यूनंतरही होणारी हेळसांड पाहणे मृत्यूपेक्षाही क्लेशदायक, वेदनादायक आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने महापालिकेवर टाकली असताना, पालिकेचे बेजबाबदार आरोग्य अधिकारी कुठेही जबाबदारीने वागताना दिसले नाहीत. त्यांच्या महापालिकेच्या कामकाजाची नव्हे तर ,अन्य कारभाराची जास्त चर्चा झालेली आहे. काही दिवसांपूर्वी याच महापालिकेच्या शववाहिकेतुन मृतदेह रस्त्यावर पडल्याची घटना घडल्यानंतरही महापालिकेच्या यंत्रणेला जाग आली नाही. जुन्या फेकून देण्याच्या लायकीच्या असणार्‍या रुग्णवाहिकाचं कोरोना  रूग्णांसाठी वापरल्या जात आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कोरोना रुग्णांसाठी आलेला निधी कोणाच्या खिशात जात आहे याचा जाब विचारणे गरजेचे आहे.
नगर शहरात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून अमरधामात अंत्यविधीसाठी रुग्णांचे मृतदेह  तासनं तास प्रतीक्षेत आहेत. हे मृतदेह हॉस्पिटल ते अमरधामपर्यंत एका खिळखिळ्या शववाहिनीतून नेले जातात. एकाच वाहनात मृतदेह अस्ताव्यस्त कोंबल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अमरधामातील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. मृत्यूचा आकडा वाढता असल्याने चार ते सहा तास अंत्यविधीसाठी वाट पहावी लागते, नगरसेवक बोराटे यांनी या वाहनाचे फोटो व क्लिप रविवारी (9 ऑगस्ट) रात्री मोबाइलवर चित्रीत केली. चित्रीकरण करतानाही बोराटे यांना शुटिंग करू नका, असे एक जण सांगत असल्याचे दिसुन आले आहे. माळीवाडा भागातील एका मित्राच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे बोराटे रुग्णालयात गेले होते.त्या ठिकाणी शव वाहणार्‍या मनपाच्या वाहनात मृतदेह एकमेकांवर रचल्याचे  त्यांना दिसले. हे मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधामात नेले जाणार होते. मृतदेहांची अवहेलना सुरू असून माणसांची किंमत प्रशासनाला राहिली नसल्याचे यावरून दिसून येते. शववाहिनी जुनाट व खिळखिळी झाली असून गाडीचे दरवाजे दोरीने बांधले जातात. या वाहनाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून शव वाहतुकीसाठी स्वतंत्र अद्ययावत वाहन खरेदी करण्याची मागणी होत आहे, परंतु प्रशासन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगर पालिकेच्या एकाच रुग्णवाहिकेमध्ये एकमेकांवर कोरोना बाधितांचे मृतदेह ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोना बाधितांची अवेहलना होत असून महानगर पालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यासह शहरात देखील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे मयत होणार्‍या नागरिकांचे आकडे देखील काही कमी होताना दिसत नाहीए. अशातच अहमदनगर महानगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरोनामुळे मयत झालेल्या लोकांचे मृतदेह चक्क एकाच रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते. दरम्यान मृतदेहांना घेऊन रुग्णवाहिकेने थेट अमरधाम गाठलं. त्यावेळी नगरसेवक बोराटे यांनी या प्रकाराचा व्हिडिओ कॅमेर्‍यात कैद केला आहे. या मृतदेहामध्ये 4 महिला तर 8 पुरुषांचा समावेश आहे. कोरोनामधील जर एखादा व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला असेल तर त्याची सुद्धा जिल्हा रुग्णालय आणि महानगर पालिकेकडून अवहेलना सुरू आहे. मयत झालेल्या रुग्णांना जर अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार घडत असेल तर अत्यंत धक्कादायक आहे. या प्रकारातून माणसांची किंमत प्रशासनालाय राहिलेली नाही. त्यामुळे संबधित उपचार घेत असलेल्या रुग्णांवर बरोबर उपचार होतात की नाही? हा प्रश्न देखील शिवसेनेचे नगरसेवक बोराटे यांनी उपस्थित केला असून येत्या दोन दिवसात या व्यवस्थेतमध्ये सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिला आहे.No comments:

Post a Comment