प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज छुप्या प्रचारावर भर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 20, 2021

प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज छुप्या प्रचारावर भर.

 प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज छुप्या प्रचारावर भर.

कर्जत, अकोला नगरपंचायत; पारनेर नगरपरिषदेसाठी उद्या मतदान.
आज की रात कत्तल की रात; प्रशासनाचा वॉच.

राष्ट्रवादी जोमात. भाजप कोमात.
राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांची प्रतिष्ठा पणाला.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील दोन नगरपंचायत व एक नगर परिषदेसाठी उद्या मतदान होत असून काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आज मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी छुप्या पद्धतीने  संपर्क करण्यावर भर दिला आहे. अकोले, कर्जत नगरपंचायत व पारनेर नगरपरिषद या तीनही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जोमात असून भाजपा सध्या या निवडणुकीत बॅकफुटवर असल्याचे दिसून येत आहे. कर्जत मध्ये आमदार रोहिदास पवार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, अकोले मध्ये राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे व माजी आमदार मधुकर पिचड पिता-पुत्र, पारनेर मध्ये आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आजच्या दिवशी आता प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर राहणार आहे. पारनेर, आणि अकोले नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 पैकी 13 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे, तर कर्जतची एक जागा बिनविरोध झाली असून, 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. ओबीसी आरक्षणामुळे उर्वरित प्रत्येकी चार जागांसाठी 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांची मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.
पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्य लढत होत आहे. माजी आमदार औटी यांच्या पत्नी व माजी सभापती जयश्री औटी यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य या निवडणुकीत मतपेटीत बंद होणार आहे. कर्जत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्य लढत होत आहे. अकोले नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्य लढत होत आहे. उद्या मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकतात, याचा फैसला होणार आहे. लढती राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये होतील. पारनेर नगरपरिषदेसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांनी प्रभाग पाच वगळता उर्वरित 12 प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत तर शहर विकास आघाडीला भाजपने पुरस्कृत करून आपला केवळ एक जागेवर उमेदवार दिला आहे. अशा प्रकारे पारनेर मध्ये तिरंगी लढतीत एकूण तेरा जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत.
काँग्रेसने अकोलेत महाविकास आघाडी तून बाहेर पडतं. ऐनवेळी 7 जागांवर उमेदवार उभे केले. सुरुवातीला सात जागांवर घट्ट धरून बसलेल्या शिवसेनेने तीन जागा पदरात पाडून घेत राष्ट्रवादीशी घरोबा कायम ठेवला. येथे पिचड-लहामटे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने शेवटच्या टप्प्यात निवडणूक हातातून जाऊ नये यासाठी भेटीगाठीवर जोर दिला आहे. अकोल्यात राष्ट्रवादी-सेनेची आघाडी असून, येथे राष्ट्रवादी 10 तर शिवसेना 3 जागांवर लढत आहे. एका उमेदवाराने माघार घेतल्याने भाजप 12 जागांवर लढत आहे, तर काँग्रेस स्वबळावर 7 जागा लढत आहे. येथे राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी असली, तरी या दोन्ही पक्षातील अनेकांनी बंडखोरी केली आहे. 12 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. मनसे 3 जागांवर लढत आहे.
कर्जतला राष्ट्रवादी 10, काँग्रेसला 2 जागा देण्यात आल्या आहेत. सन्मान पूर्ण जागा न मिळाल्याने शिवसेना एका जागेवर स्वबळावर लढत आहे. ही निवडणूक सुरुवातीपासूनच वादळी ठरली राम शिंदे यांना संभाव्य धोका ओळखत आपल्या उमेदवारांना अज्ञातवासात हलवावे लागले होते तरी अर्ज माघारीच्या वेळी भाजपच्या अनेक प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवारांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध निघाली. त्यानंतर आमदार रोहित पवारांवर माजी मंत्री राम शिंदे यांनी बरेच आरोप केले. त्यानंतरही सकाळी भाजपच्या व्यासपीठावर तर सायंकाळी थेट राष्ट्रवादीच्या स्टेजवर कार्यकर्ते दिसू लागल्याने भाजपची अवस्था सैरभैर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच हार्दिक पटेल आणि धनंजय मुंडे यांच्या दणाणलेल्या तोफा राष्ट्रवादीला ऊर्जा देणार्‍या ठरल्या आहेत. त्याच्या अखेरच्या क्षणी झालेली किरीट सोमय्या यांची सभा भाजपच्या जीवात जीव आणणारी दिसली. कर्जतमध्ये भाजपा 12 जागावर, तर राष्ट्रवादी 10 व काँग्रेस 2 जागांवर आघाडी करून लढत आहे. शिवसेना स्वतंत्र एक उमेदवार असून, 12 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

No comments:

Post a Comment