अहमदनगर सीमेवर पोलिसांसोबत झाली खडाजंगी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 11, 2021

अहमदनगर सीमेवर पोलिसांसोबत झाली खडाजंगी!

 अहमदनगर सीमेवर पोलिसांसोबत झाली खडाजंगी!

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमचा तिरंगी मोर्चा; औरंगाबाद-मुंबई रॅलीवरून वाद..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुंबईत मोर्चा, रॅली अन्य कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी नसताना व कलम 144 लागू असताना औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित जमीन आणि इतर काही मागण्यांसाठी रॅली काढून मुंबईला जाण्यासाठी निघाले आहेत. या रॅलीला परवानगी नसल्याचं म्हणत त्यांना अहमदनगर-औरंगाबाद सीमेजवळ अहमदनगर पोलिसांकडून अडवण्यात आलं. पोलिसांनी अडवल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केले. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं कारण पोलिसांनी दिलं. “पण कुणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, आम्ही आमचं एक मिशन घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालो आहोत. रॅलीसाठी आपण पोलिसांची परवानगी घेतली होती” अशी प्रतिक्रिया खासदार जलील यांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून आमची रॅली रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला. शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावर चालणार्‍या वाहनांना अडचणी येणार नाहीत, अशा पद्धतीने रॅली काढत पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे, असं खासदार जलील यांनी सांगितलं. पोलिसांनी अडवल्यानंतर खासदार जलील यांचा पोलिसांशी वाद झाला. तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावर गोंधळ घातला, त्यामुळे काही वेळ रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
आलेल्या तिरंगा रॅलीला सकाळी 8.45 वाजता अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच पोलिसांनी रोखलं15 मिनिटे रॅलीला अडविण्यात आल्यानंतर पोलिसांनी खा. इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करून रॅलीला पुढे जाऊ दिले.
शनिवारी सकाळी 8.30 मिनिटांनी तिरंगा रॅली औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगावच्या गोदावरी नदीच्या पुलावर पोहोचली. तेथे मराठा आरक्षणासाठी गोदावरीत बलिदान देणार्‍या काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास खा. इम्तियाज जलील यांनी अभिवादन केले. त्यानंतर रॅली पुढे निघाली. यावेळी सुमारे तीनशे वाहनांचा ताफा रॅलीत सामील झाला होता. प्रत्येक वाहनावर तिरंगा लावण्यात आलेला होता. मात्र पूल ओलांडून अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच 8.45 वाजता पोलिसांनी तिरंगा रॅलीला अडवलं. रॅली पुढे जाऊ शकत नाही असे खा. जलील यांना पोलिसांनी सांगितले. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा हजर होता. रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. हळूहळू या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. खा. जलील आणि एमआयएम कार्यकर्ते यांनी औरंगाबाद अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिला. खा. जलील यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना रॅलीच्या परवानगीबाबत माहिती दिली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने पोलिसांनी इतर वाहतुक खुली करून दिली. सुमारे 5 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर खा. जलील यांनी पोलीस आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी फोनवर चर्चा केली. रस्त्यावर इतर वाहतुकीला अडथळे येणार नाही याची काळजी घेऊन रॅलीला पुढे जाऊ देण्यास पोलिसांनी परवानगी दिली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
कोविड संक्रमणाचा धोका वाढल्याने मुंबईत आता नव्याने जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचे मुंबई पोलिसांकडून काढण्यात आलेल्या आदेशात म्हटलेले आहे. मुंबई पोलिसांनी 144 चे कलम लागू करताना नवे आदेश जारी केले आहेत. मुंबईत रात्रीपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. एमआयएमकडून काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते, त्यानिमित्याने मुंबई पोलिसांनी आदेश काढल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू केल्यानंतर वाहनांची कसून तपासणी सुरु केली आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही केली आहे.
  या मोर्चाचे स्वागत करण्यासाठी अहमदनगर येथील कोठला येथे एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते थांबले आहेत. पण पोलिसांनी या मोर्चाला नगर शहरामध्ये प्रवेश न देता शेंडी बायपास ने हा मोर्चा वळवला.

No comments:

Post a Comment