घंटा वाजली! विद्यार्थ्यांमध्ये उत्साह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

घंटा वाजली! विद्यार्थ्यांमध्ये उत्साह.

 घंटा वाजली! विद्यार्थ्यांमध्ये उत्साह.

तब्बल दीड वर्षांनंतर शाळांमध्ये ‘हजर’ चा ‘गजर’; आज पासून राज्यातील शाळा सुरू.

राज्यात आजपासून शहरी विभागात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात आले असून, नगरमधील श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कुल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प देऊन, सॅनिटायझर, तापमान चेक करून प्रवेश देण्यात आला. (छाया ः राजू खरपुडे)

बेंच किती आतुरतेनं वाट पाहतायत ते बघून सगळ्याना हायसं वाटलं असेल. बेंचवर दीड वर्षापूर्वी कोरलेलं चित्र, नाव सगळं जसच्या तसं दिसलं. मन मोहरून गेलं, भूरर्कन उडून दीड वर्ष मागे गेलं. मनावरून पिसारा फिरल्यासारखं वाटलंय. कालच तर सगळी मस्ती केलेली असं वाटलं. पुन्हा मस्ती सुरु झाली. वर्ग गजबजले. सर/मॅडमला ठेवलेली नावं आठवली. गॉसिपिंग करताना थोडीशी अडचण झाली. दूरदूर बसल्यानं थोडी नाकं मुरडली. पण तरीही एकमेकांना पाहायला मिळालं हे काय कमी आहे? शाळेत यायला मिळालं हे काय कमी आहे? नाहीतर येऊन-जाऊन चार भिंतीत मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉपपुढे बसून नकोनको झालेलं. नेटवर्क शोधता शोधता सगळे स्वत:ला हरवून बसलेले. आज सगळ गवसलं. डोंगराएवढा आनंद चेह-यावर आहे. एकमेकांना चिडवताना थोडा बदल झालाय. लॉकडाऊननं कुणाला शारीरिक उंची दिली, कुणाला जाडी दिली. मग ए जाड्या ए लंबू हाका ऐकू आल्या आणि मुलांच्या आयुष्यात टवटवीतपणा आला. या आरोळ्यांनी शाळेचा व-हांडा गाढ झोपेतुन जागा झाला. कुणाला ढापण लागलं मग त्याला/तिला ढापण्या नाव पडलं. युनिफॉर्म दीड वर्षानंतर घालायला घेतल्यावर लक्षात आलं, की हा तर आता धुळवडीलाही घालता येणार नाही इतका तोकडा झालाय.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आजपासून जिल्ह्यातील शहरी भागात 8 वी ते 12 वी तर ग्रामीण भागात इ 5 वी ते 12 वीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू होत असल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरु झाली की, सगळ्यांना आनंद व्हायचा. आजही शाळा सुरु झाली आणि सगळ्यांना आनंद झाला. पण हे शाळा सुरु होणं जरा वेगळ्या अर्थी होतं. शाळा सुरु होतीच फक्त ती ऑनलाईन होती. आजच्या शाळा सुरु होण्यानं काही पालक जरा घाबरलेयत. पण मुलं प्रचंड खुश आहेत. माझे फ्रेंड्स पुन्हा भेटणार, पुन्हा बेंच वाजवायला मिळणार पुन्हा तो बोर्ड आणि सर/मॅडम त्या बोर्डवर लिहायला वळले की लगेच सगळ्यांची मस्ती हे सगळं सगळं पुन्हा गवसलं. खर्‍या अर्थानं मुलांचं हरवलेलं बालपण, टिनेजमधली धमाल त्यांना आज मिळाली. हा आनंद ते शब्दात व्यक्त करु शकत नाहीत.  
आजवर शाळा सुरु झाली की नवे युनिफॉर्म, नवी बॅग, टिफीन, नव्या नोटबुक्स ब्ला ब्ला... शाळेत आल्या आल्या सुट्टीत कुठे गेलो? काय केलं? काय खाल्लं? सगळं फ्रेंड्ससोबत शेअर करायचं. पण आज शाळा सुरु झाली तेव्हा मुलांनी हे काहीही शेअर केलं नाही. आजचं शेअरिंग वेगळंच वाटलं. आजच्या शेअरिंगला थोड्या मर्यादा होत्या. इथून पुढे त्या आणखी काही काळ राहणार आहेत. चॅटिंग करता करता अचानक आज सगळे भेटले. एकमेकांना समोरासमोर पाहिलं जाम मज्जा वाटली त्यांना. सर/मॅडमशी अभ्यासाशिवाय बोलायला मिळालं. काहींचं आयुष्य कदाचित या दीड वर्षात बदललं असेल. कुणी कुणाला गमावलं असेल. अशांना सर/मॅडमनी धीर दिला असेल. आजुबाजुच्या सगळ्यांचेच डोळे तेव्हा पाणावले असतील. मोबाईलच्या दुनियेपेक्षा ही दुनिया खरंच किती सकारात्मकता देणारी आहे हे त्या क्षणाला प्रत्येकाला जाणवलं असेल.
दोन वेण्या, लाल रिबण, स्वच्छ युनिफॉर्म, चापून चोपून बसवलेले केस, कापलेली नखं ही शिस्त आज कुणीच सांगत नव्हतं. आज सगळे मास्क नाकावर घेण्याचा इशारा करत होते. वाढलेल्या नखांपेक्षा सॅनिटायझरची आठवण करून देत होते. शाळेतल्या नियमांची प्रायोरिटी आता बदललीय. हो ना? सर/मॅडमचा थाट काही वेगळाच, मुलं आल्यानं त्यांनाही गदगदून आलं. मुलं डोळ्यापुढे दिसल्यानं शिकवायला हुरुप आला. मोबाईल कम्प्युटरच्या चौकटीत न मावणारी पूर्ण मुलं समोर दिसली आणि आपली लेकरं किती मोठी झाली याचं त्यांना आश्चर्य वाटलं. मुलांनीही आपल्याला लॉकडाऊनमध्ये मिस केलं हे ऐकुन सर/मॅडमही इमोशनल झाले. आता त्यांनाही ऑनलाईन क्लासेस नको. कोरोना जावो न जावो शाळा बंद करु नका अशीच भावना मुलांच्या आणि शिक्षकांच्या डोळ्यात दिसत होती. शाळेतल्या मावशी, दादा दिसल्यामुळे मुलं पुन्हा जुन्याचं उत्साहात त्यांच्याशी मस्करी करायला लागले.  
शाळेत ही धमाल सुरु असताना तिकडे पालक थोडे घाबरलेलेच होते. काय होईल कसं होईल अशाच विचारात ते आहेत. पण मुलांना इतक्या दिवसांत काढे पाजून जितकी इम्युनिटी तुम्ही दिली नसेल तितकी इम्युनिटी त्यांना आजच्या दिवसानं दिलीय. मुलं मनातून आनंदी आहे. याचाच अर्थ ते सकारात्मक आहे. आणि जिथे सकारात्मकता असते तिथे आरोग्य वास करतं. होऊ दे त्यांना मोकळं, ठेवा त्यांच्यावर पूर्ण विश्वास, पाळतील ते सगळे नियम आणि ठेवतील स्वत:ला इन्फेक्शनपासून दूर. ते आता इन्फेक्ट होतील सकारात्मकतेनं. ही सकारात्मकता असेल आयुष्य नव्या उमेदीनं जगण्यासाठी. सकारात्मकतेचा हा बुस्टर डोस घेऊ दे. शाळाही हे सगळं कौतुकानं बघत होती. तिलाही हमसुन हमसुन रडावसं वाटलं. किती मोठ्या आनंदाला ती पोरकी झालेली. तिची लेकरं अंगाखांद्यावर खेळायला लागली आणि तीसुद्धा एकदम फ्रेश दिसायला लागली. सॅनिटायझरच्या दर्पात तिच्या लेकरांचा सुगंध दरवळला. भिंती नव्याको-या वाटल्या. बेंच, दरवाजे, खिडक्या प्रसन्न झाले. सगळंच कसं हवहवसं. नव्याची नवलाई असते तसं पहिला लॉकडाऊन चांगला वाटला. पण नंतर कळलं आपण किती मोठा आनंदाला आजवर नाक मुरडलं. हाच तर खरा आनंद मुलांचा कल्ला, गलका, आरडाओरडा, बेंच वाजवणं, भेसुर आवाजात गाणी म्हणणं, सर/मॅडमचा ओरडा खाणं यातली मजा ऑनलाईन क्लासमध्ये नाहीच. आता कुणी पुन्हा ऑनलाईन क्लास कर म्हटलं तर मला नाही वाटत ही मुलं तयार होतील. त्यांना तर जुनं ते सोनं हे कळुन चुकलंय.

No comments:

Post a Comment