‘लोकपत्र’च्या कार्यकारी संपादक व प्रकाशकावर गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

‘लोकपत्र’च्या कार्यकारी संपादक व प्रकाशकावर गुन्हा दाखल

 ‘लोकपत्र’च्या कार्यकारी संपादक व प्रकाशकावर गुन्हा दाखल

अण्णा हजारेंच्या नावाने खोटी बातमी छापली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः औरंगाबाद येथील “लोकपत्र” या वर्तमानपत्रात “नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात” - अण्णा हजारे. या मथळ्या खाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. ही बातमी खोटी असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केल्यानंतर वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब उर्फ संजय रामनाथ पठाडे यांनी फिर्याद दिली आहे. पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटकेसंबंधी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीवरून मोठा वाद झाला होता. हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून ही बातमी देण्यात आली होती. त्यावरून शिक्षकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्याकडून हजारे यांच्या या कथित वक्तव्याचा निषेधही करण्यात आला. त्यानंतर हजारे यांनी आपण असे वक्तव्य केलेच नसल्याचे सांगितले. संबंधित वृत्तपत्राला नोटीसही पाठविण्यात आली. त्यानंतर काही शिक्षक संघटनांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पठाडे यांनी काल रात्री पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम 153 अ (1)(ब)(क) तसेच 504, 504 (2) नुसार गुन्हा दाखल केला. या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पठाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, तहकिक यांनी निराधार वृत्त छापून हजारे यांची बदनामी केली आहे. शिक्षक वर्गाला त्यांच्याविरुद्ध चिथावणी दिली आहे. शिक्षक वर्ग व अण्णा हजारे समर्थक अशा दोन समुदायात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले आहे. त्याद्वारे सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळप करीत आहेत. गुन्हा दाखल झाला असून त्यातील तरतुदीनुसार आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment