अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात छिंदम बंधूंना अटक.
नगरी दवंडी/प्रिंतनिधीअहमदनगर ः दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.
या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल आहे. छिंदम बंधूंसह चारही जणांनी अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल केले होते. त्यावर न्या. सुरेंद्र पी. तावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांना प्रत्येकी 15 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत दररोज पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे बंधन घातले आहे. तर छिंदम बंधूंचे अर्ज फेटाळले होते. बुधवारी सकाळी श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना अटक करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment