सत्याचा विजय झाला; पापाचा घडा भरला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

सत्याचा विजय झाला; पापाचा घडा भरला!

 सत्याचा विजय झाला; पापाचा घडा भरला!

ज्योती देवरेंच्या बदलीनंतर आ.लंकेचे निकटवर्तीय राहुल झावरेची प्रतिक्रिया..


नगरी दवंडी ॥ संतोष सोबले ॥
पारनेर ः तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर पारनेरमधून बदली झाली आहे. भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत दोषी आढळल्याने देवरे यांची बदली झाली. असून, त्यांना जळगांव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार म्हणून साईड पोष्टवर टाकण्यात आले आहे. आ. निलेश लंकेशी घेतलेला पंगा त्यांचे अंगलट आला आहे. ज्योती देवरे यांनी आमदार लंके यांची द्वेषापोटी बदनामी करताना प्रस्थापित पुढाच्यांच्या हस्तक म्हणून काम केले. कोरोना काळात जगभरात नाव झालेले असताना त्यांची बदनामी करण्याचा विडाच देवरे यांनी उचलला होता. महिला आयोगाकडे तक्रार करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ज्यांच्या विरोधात विनायभंग, खंडणीचे गुन्हे दाखल केले, त्यांनाच भाऊ मानून तालुक्याचे मनोरंजन केले. मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा आहे, अशी छाती काढून फिरणार्‍या पुढार्‍यांचा मुखभंग झाला. अखेर सत्याचा विजय झाला. पापाचा घडा, भरला अशी प्रतिक्रिया लंके यांचे निकटवतीय राहुल झावरे यांनी दिली.
ऑगस्ट 2018 मध्ये देवरे या तहसीलदार म्हणून पारनेर येथे रूजू झाल्या होत्या. रुजू झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. आचारसंहितेच्या नावाखाली तत्कालीन आमदार विजय औटी यांची बाजू घेत देवरे यांनी त्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार नीलेश लंके यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, अशी त्यांच्यावर लंके समर्थकांनी टीका केली होती. पुढे लंके हे आमदार झाल्यानंतरही देवरे यांचे लोकप्रतिनिधींशी सुत जुळलेच नाही. देवरे यांच्यावर सातत्याने गैरव्यवहाराचे आरोप झाले. सामाजिक कार्यकत्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्यानंतर त्याची चौकशी होऊन त्यात त्या दोषी आढळून आल्या असल्याचे सांगितले जाते. त्याच कारणावरून त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून मुक्त करण्यासाठी देवरे या आ. लंके यांच्याकडे मागणी करत होत्या, मात्र लंके यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने देवरे यांनी आ. लंके यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लंके समर्थक करत आहेत. देवरे यांनी यापूर्वी करण्यात आलेल्याबदलीच्या विरोधात राज्य महिला अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या महिला अधिका-यांच्या समितीने विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार देवरे यांनी केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून आले नाही. विभागीय आयुक्त यांनी शासनासही तसे कळविले होते. तसेच देवरे यांच्याविरोधात श्री अरूण आंधळे व निवृत्ती कासोटे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार देवरे यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केलेल्या असल्याने अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्याचे सिध्द झाले होते. त्याच्याविरोधात जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा अहवाल शासनास सादर केलेला आहे. विभागीय आयुक्त नाशिक यांनी पाठविलेल्या अहवालाच्या शिफारशीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीची निकड विचारात घेता प्रतिबंध अधिनियम 2004-5 नुसार बदली करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश कार्यमुक्तीचा असून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याने नमूद करण्यात आले आहे. आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त पदावर तात्काळ रुजू व्हावे असेही नमूद करण्यात आले आहे. तात्काळ रूजू न झाल्यास कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा कलम 1979 मधील नियम 23 चे नियम उल्लंघन केल्यास शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे. देवरे यांच्याविरोधात यापूर्वीच लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज लाचलुचपत विभागाकडे अँड असीम सरोदे यांनी तक्रार दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment