अगोदर तुमच्या नवर्‍याला नितीमत्ता शिकवा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 6, 2021

अगोदर तुमच्या नवर्‍याला नितीमत्ता शिकवा!

 अगोदर तुमच्या नवर्‍याला नितीमत्ता शिकवा!

आ. लंके प्रकरणी मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो, असे सांगतानाच अगोदर तुमच्या नवर्‍याला नितीमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे.
तालुक्यातील वनकुटे येथील वनकुटे ते वडगाव सावताळ रस्ता सुधारणा करणे रक्कम रुपये.120.00 कोटी, वनकुटे ते पठारवाडी रस्ता सुधारणा करणे रक्कम रुपये.50.00 लक्ष, हनुमान नगर येथे पाणी पुरवठा लाईन करणे रक्कम रुपये.25.00 लक्ष,व्यायाम साहित्य बसवणे रक्कम रुपये.5.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण  शुभारंभ ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शेख बोलत होते. आ. नीलेश लंके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आ. निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. अहो चित्रा वाघ लाचखोर नवर्‍याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवर्‍याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली. महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा, असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.
तुमच्या-माझ्या सारख्या कार्यकर्त्याला चित्रा वाघ नीतिमत्ता शिकवायला निघाल्या आहेत. आधी तुमच्या नवर्‍याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते, असं सांगायला देखील शेख विसरले नाहीत. मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला. तुमच्या नवर्‍याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली, हे मी नाही बोलत तर एसीबीचा रिपोर्ट आहे, असं शेख म्हणाले.
आमदार निलेश लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपावर देखील त्यांनी भाष्य केलं. लंके यांच्यावर आरोप झाला मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एखादा कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं अस्तिव निर्माण करत असेल त्यावेळी ही गोष्ट कोणाच्या तरी डोळ्यात खुपत असते, त्यातून असे आरोप होत असतात, असं ते म्हणाले.
पूर्वी लोक कोणाला खल्लास करायचं असेल तर डाकूला सुपार्‍या द्यायचे. मात्र आता सुपारीची नवीन पद्धत निघाली आहे. एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायची सुपारी दिली जाते. तुमचं प्रकरण विचित्र पध्दतीने लोकांसमोर मांडल गेलं असून माझ्यावरही असेच आरोप झाले. तुमच्या वेळी मुंबईवरुन ज्या धावून आल्या, त्या सकाळ संध्याकाळ माझं नाव घेतात, असा टोला मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला. ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाला त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितले की माझी नार्को टेस्ट करा. दोषी असेल तर मला चौकात फासावर चढवा जसं मी पुढे येऊन सांगतोय तसं तुम्हीही पुढे येऊन सांगा, माझा नवरा दोषी नाही त्याची देखील नार्को टेस्ट करा, असं आव्हानचं मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांना दिलं. तसेच चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सर्व लोक ओळखतात. कुणीही त्यांना गांभीर्याने घेत नसून भाजपचे लोक सांगतात तुमचं नाव करायचं असेल तर 5 कोटी द्या, अशी मागणी त्या करतात. अशा प्रकारची अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत. योग्यवेळी पुराव्यानिशी बोलेन, असा इशारा त्यांनी जाताजाता  वाघ यांना दिला.
राहुल झावरे यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करताना कोटयावधींची विकास कामे करून आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परीषदेची उमेदवारी त्यांना  देेण्याची मागणी विविध वक्त्यांनी केली होती. त्यावर  आ. लंके यांनी आजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे, आरक्षण सोडत व्हायची आहे, अखेर ज्याच्याकडे मेरीट आहे, त्याला उमेदवारी दिली जाईल. जिंकणार्‍या घोडयावरच आम्ही पैसे लावणार असल्याचे सांगितले होते. तोच धागा पकडून मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहूल हा लंबी रेस का घोडा आहे असे सांगत तो स्पर्धेत कमी पडणार नाही अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. झावरे यांच्यावर पैसे लावा,  मित्रासाठीच्या जिल्हा परिषदेच्या माझ्या शिफराशीचा विचार करा असे तनपुरे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळया वाजवून दाद दिली. काही लोक केंद्रात मंत्री झाल्यानंतर यात्रा काढत आहेत. कोरोनाच्या काळात यात्रेऐवजी विकास कामांविषयी बोलणे अपेक्षीत होते. मात्र विकास कामे सोडून स्वतःच्या कोड कौतुक केले जात असल्याची टीका मंत्री तनपुरे यांनी भाजपावर केली. आम्हीही मंत्री झालो, आम्ही यात्रा काढल्या नाहीत. लगेच कामाला सुरूवात केली. हे मंत्री स्वतःच्या खात्याच्या कामांविषयी न बोलताना मुख्यमंत्र्यांवर टिका करीत आहेत. स्वतःचेच कोड कौतुक करीत असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment