माझ्या मनातले आभाळमाया देणारे व्यक्तिमत्व.. शरदराव (भाऊ) मुरलीधर तोडमल पाटील. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 2, 2021

माझ्या मनातले आभाळमाया देणारे व्यक्तिमत्व.. शरदराव (भाऊ) मुरलीधर तोडमल पाटील.

 माझ्या मनातले आभाळमाया देणारे व्यक्तिमत्व.. शरदराव (भाऊ) मुरलीधर तोडमल पाटील यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रध्दांजली.


मं
गळवार दि.18/8/2020 ची रात्र अतिभयाण काळोख... काँग्रेसचे जेष्ठ नेते, आम्हा सर्व पामरांचे मार्गदर्शक, खासदार दादा पाटील शेळके यांचे अत्यंत विश्वासू, अ.नगर जिल्हा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे व मार्केट कमिटीचे माजी संचालक, वाकोडी गावचे सलग पंचवीस वर्षे सरपंच, आबासाहेब नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन, कै. दामोदर उर्फ आबासाहेब गृहनिर्माण संस्थेचे व्हाईस चेअरमन, वाकोडी बचावचे धुरंधर असे नेतृत्व, वाकोडी परिसर ग्रामिण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशी अनेक पदे भुषविणारे आमचे नेतेे शरदराव (भाऊ) मुरलीधर तोडमल पाटील यांचा आज रविवार दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी तिथीनुसार प्रथम स्मृतीदिन.

थोरांकुळी जन्म दैवाहाती..पण जन्माचे सोनेेे करणे मानवी कृती

या उक्तीप्रमाणे आदरणीय शरदराव तोडमल भाऊंचा जन्म एका सधन शेतकरी कुटुंबामध्ये आई पार्वतीबाई व वडिल मुरलीधर दामोधर तोडमल पाटील यांच्या पोटी दि.18/1/1950 रोजी वाकोडी मुक्कामी  झाला.
एका अनोख्या प्रवासाच्या जीवनायात्रेचे वर्णन करीत असताना त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंना स्पर्श करता आला. असा एक अखंड प्रवाशी आमचे भाऊ आणि त्यांच्या आयुष्यातील या आठवणी माझ्या मनाला चटका लावून जातात.
भाऊ, बाळासाहेब, संपतराव आणि अनिल अशी चार भावंडे. भाऊंच्या अल्लड, खिलाडु, अभ्यासू व्यक्तीमत्वामुळे त्यांना 1956 साली जि.प.प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी सोसायटी हायस्कूल, अ.नगर येथे मॅट्रीकपर्यंत शिक्षण घेतले.शिक्षणाचे धडे चालू असताना त्यांना राजूशेठ चोपडा, सदाशिव अमरापूरकर, यशवंतराव गडाख, लक्ष्मणराव जाधव असा मोठा मित्र परिवार लाभला आणि या मित्रपरिवारांमधूनच भाऊंनी अनेक सामाजिक, राजकीय, धामिर्र्क, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविला. शिक्षण चालू असताना शेतकर्‍याचा मुलगा व कै. दामोदर पाटील तोडमल (आजोबा) यांचा राजकीय वारसा असल्याने आमदार दादा पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे युवक काँग्रेसमध्ये पदार्पण झाले.युवक काँग्रेसचे त्या काळी तालुका अध्यक्ष यशवंतराव गडाख. परंतु भाऊंचे कुशल नेतृत्व पाहून त्यांना पक्षामध्ये मानाचे स्थान देण्यात आले.
मुलगा मोठा झाला आहे म्हणून वडिल मुरलीधर व आई पार्वतीबाई यांच्या विचारातून दादापाटील चव्हाण रा.धोत्रे ता.कोपरगाव यांची सुशिल अशी सुकन्या शकुंतला ताई यांच्यासोबत दि.6/6/1972 रोजी भाऊंचा विवाह झाला. ताईसुध्दा इयत्ता सातवी पास असून सुसंस्कारीत जीवन  जगत आहेत.त्यांनी भाऊंना कौटुंबिक आधार देत सामाजिक,धार्मीक विचारांचे वातावरण कुटुंबात राखले. त्यांना दोन मुले म्हणजेच पहिला आबासाहेब सचिन व मुलगी चारुशिला हे तीन अपत्ये भाऊंच्या व ताईच्या उदरी जन्माला आले.
मुलांचे बालपण, लहानपण, संगोपन करत असताना मुलांना शिक्षण दिले.चिरंजीव आबासाहेब यांचा राष्ट्रसंत बद्रिनाथ महाराज तनपुरे यांची सुशिल अशी सुकन्या सुवर्णाशी विवाह झाला.आणि आपले जुनेच नाते संबंध असल्यामुळे चव्हाण घराण्यातील सुकन्या तनुजा हिच्याशी सचिन यांचा विवाह झाला.फलकेवाडी ता.शेवगाव येथील घरंदाज फलके घराण्यातील प्रकाश यांच्याशी चारुशिला हिचा विवाह झाला.
सुनांच्याबाबतीत आमच्या भाऊंचा स्त्रोत राष्ट्रसंतांचा व धार्मिकतेचा असल्याने त्यांचा प्रभाव सुनांवर होता.सुना या घराच्या सुना नसून त्या मुली आहेत.सदाचार व प्रगतीशील विचारांचे वातावरण असल्याने सुवर्णा व तनुजा अत्यंत आनंदात नांदत आहेत.
शेतकरी कुटुंब, सामाजीक औदार्य तसेच राजकीय आणि धार्मिक विशेष करुन शैक्षणिक विचारधारा असल्याने भाऊंनी आपल्या नातवांना चिरंजीव कौस्तुभ,पृथ्वीराज दय ,मानसी यांना सर्व प्रकारचे धडे दिले. युवा पिढी हा राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आपल्या नातवांवर लहाणपणापासूनच चांगले संस्कार व्हावे म्हणून या कोवळया कळयांमाजी लपले, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,राष्ट्रसंत तुकडोजी,राष्ट्रसंत तनपुरे बाबा,क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले विकसता प्रकटतील असे शेकडो महापुरुष असे शिक्षण त्यांना देण्याचे काम भाऊंनी केले. कारण त्यांचा पिंडच अध्यात्माचा होता.
भाऊंनी आपल्या हयातीमध्ये आपल्या आई पार्वतीबाई व वडिल मुरलीधर तोडमल (आण्णा) यांची सेवा केली. स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी...आई हि आपली प्रथम गुरु आहे.म्हणजे तिच्यात ईश्वराचा वास आहे ती आई. प्रत्येक माणसाच्या जीवनात आईचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. भाऊंचे कर्तव्य मरावे परि, किर्तीरुपे उरावे या उक्तीप्रमाणे  दुसर्‍याांच्या दु:खात सहभागी होणारे भाऊ स्वत: चंदनासारखे झिजून आम्हांला सुगंध देत राहिले.

शेतकरी व शेतकर्‍याचा मुलगा असल्याने  शेतीमधून पिकविलेला माल,भाजीपाला विशेष करुन काळे वांगे नगर-पुणे-मुंबई मार्केटपर्यंत भाऊंनी आपला शेतीमाल पाठविला. याप्रमाणे ढगाच्या पलिकडून चंद्र बाहेर येतो आणि पृथ्वीला शितल व प्रकाशमान करतो असे शरदराव ... कारण त्यांच्या नावातच शितल व प्रकाश आहे. भाऊंच्या कार्याच्या व गुणांच्या प्रकाशाने भाऊंची ओळख आहे.त्यांचे धाडसी व कणखर नेतृत्व असल्याने गावातील ठकाजी मोढवे,कुंडलिकराव मोढवे, मारुती चंदर पवार,विश्वााथ गेणू सांगळे,ज्ञानदेव गवळी,तबासाहेब गवळी,पांडुरंग कराळे यांच्या सहकार्याने
वाकोडी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करुन एक उमदे  नेतृत्व व कार्यकुशल सरपंच गावच्या विकासासाठी निवडुन दिले.भाऊंनीपण आधीच युवक काँग्रेसचे नेतृत्व आणि सरपंच पदाची गळयात पडलेली माळ सार्थकी लावली.गावाच्या विकासाकरिता वाकोडी बचाव चा नारा देत सहकार महर्षी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्फत दिल्ली दरबारी जाउन आपले गाव मिलिटरी पासून वाचविण्यासाठी  जिद्दीने प्रयत्न केले.
स्पेशल एक्झ्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आमचे भाऊ वाकोडी गावाचा ज्वलंत असा पाणीप्रश्न या पाणीप्रश्नावर आधारीत  नळपाणीयोजनेच्या  प्रत्यक्षात कार्यवाही करण्याकरिता आपल्या सोबतचे सवंगडी कुंडलिक मोढवे, तबासाहेब गवळी, ठकाजी मोढवे, बाबासाहेब मोढवे या सहकार्‍यांबरोबर आमदार व सच्चे नेते दादा पाटील शेळके यांचेमार्फत गावाला शुध्द पाणी पिण्यासाठी प्रथम प्राधान्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लावणारे धुरंधर व कर्तव्यदक्ष नेेता म्हणजे आमचे भाऊ.
वाकोडी ग्रामपंचायतचा कारभार पहात असताना ग्रामसेवक भुजबळ यांच्या कामाची कार्यपध्दती व भाऊंचच्या आदर्श मार्गदर्शनामुळे गावामध्ये कधीही भांडण तंटा पहावयास मिळाला नाही. भाऊंना कार्यपध्दतीचा, विकासाचा व विचारांचा सुक्ष्म अभ्यास. अभिमानाची गोष्ट म्हणज नगर-सोलापूर रोड ते वाकोडी गाव अ‍ॅप्रोच रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे क्रांतीकारी कार्य भाऊंनी केले. त्यांना त्यावेळेचे सहकारी सोन्याबापू तोडमल, मारुती पवार, पांडुरंग कराळे, शिवाजी सीताराम गवळी अशा सामाजिक बांधिलकीचे सहकारी भाऊंच्या शब्दावर व कामावर फिदा होउन नेकीने काम करत असत. भाऊंचे ते क्रांतीकारी कार्य होते. नि:स्वार्थी व त्यागाचा उत्तम नमुना म्हणजे आमचे भाऊ.
समाजहितासाठी सतत झटणारे व अहोरात्र काम करुन ते कार्य पुर्ण करण्याची त्यांची सवय म्हणजेच त्यांच्या कार्याचे यश. शेतकर्‍यांच्या शेतीप्रश्नाला व पिकांना उपयुक्त असे वरदान ठरणारा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा जर सीना नदीवर बांधला तर परिसरातील शेतकर्‍यांना त्याचा फायदाच होईल.या जिद्दीने अ.नगर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बन्सीभाऊ म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी सिताराम कुंटे यांच्यामार्फत 13.6 दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असणार्‍या 12.33 लाख खर्च येणार्‍या बंधार्‍यातून शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल अशी अपेक्षा बाळगणारा नेता म्हणजेच आमचे भाऊ. त्यांचे कार्य गावासाठीच मर्यादित राहिले नाही तर तालुका जिल्हा पातळीवर कुठलीही हाव नाही किंवा मान नाही.समान्मासाठी पुढे पुढे नाही अशी भावना ठेवून लोकांचे कल्याण व्हावे या करिता आमचे भाऊ सतत झिजत राहिले.
भाऊंचे कार्य गावासाठीच मर्यादित राहिले नाही तर तालुका व जिल्हापातळीवर कुठलीही हाव नाही व समाजासाठी कधी पुढे पुढे नाही. सतत कामाची भावना ठेवून लोकांचे कल्याण व्हावे म्हणून जिल्हा दूध संघाचे संचालक व व्हाईस चेअरमन असताना प्रत्येक तालुक्यामध्ये दुध शितकरण केंद्राची निर्मिती केली.शेतकर्‍यांना शेती व्यवसायाबरोबरच दुध व्यवसायास चालना दिली.
आमच्या भाऊंनी कुटुंबाबरोबरच सामाजिक बांधिलकीमध्ये प्रत्येक माणसाने माणसासारखे वागले पाहिजे. जगा व जगू द्या या तत्वाने कोणावरही रागावले नाहीत. रागाने  बोलण्याने माणसे जोडता येत नाहीत उलट जुळलेला माणूस तुटतो.
शब्द भलंकर बोलिये ,शब्दको हात ना पाव।
एक शब्द करे भलाई, दुजा करे घाव ।

म्हणून  भाऊंची वाणी पण प्रेमळ होती.
भाऊंनी आपल्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये पैशाच्या मागे न धावता त्यांनी सतत समाजकार्य केले.ग्रामपंचायत सरपंच पदाच्या कार्यकाळात गावामध्ये शेतकर्‍यांना जोडव्यवसाय म्हणून जय भवानी दूध डेअरीची स्थापना केली तसेच दूध डेअरीला अर्थ सहाय्य म्हणून आबासाहेब  नागरी सहकारी पतसंस्थेची  स्थापना केली. शेतकर्‍यांना व माझ्या समाजबांधवांना रहायला निवारा असावा म्हणून कै.दामोदर उर्फ आबासाहेब सहकारी गृहतारण संस्थेची स्थापना केली.अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे आमचे भाऊ आपल्या कार्यकर्तृत्वाने मारुती चंदर पवार यांच्यासमवेत संजय गांधी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करुन गावामधील माझ्या समाजाला जागा व घरे नाहीत व कमी पडत आहेत म्हणून या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था, अ.नगर जिल्ह्याचे संचालक आदरणीय किसराव लोटके सर यांच्यामार्फत अल्पदरात कर्ज उपलब्ध करुन देऊन घरे बांधकाम करुन देण्याचे धडाडीचे कार्य या ध्येयवेड्या नेत्याने केले.
गणितामध्ये ज्याप्रमाणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असतात त्याप्रमाणे भाऊंच्या आयुष्यातील 70 वर्षे अनेक चढउतार झाले. परंतु त्यामुळे ते कधीच विचलीत झाले नाहीत.गेल्या 90-91 मध्ये पोटातील आजार विकाराने ते कधीच खचले नाहीत. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व थांबले नाही. त्यांना माऊली ताईची व पूर्ण परिवाराची चांगली साथ लाभली.
कसे जगायचे ?
कण्हत, कण्हत की गाणे म्हणत.
चित्त असू द्यावे समाधान
या उक्तीप्रमाणे भाऊ जीवन जगले.

वारकरी या शब्दाचा अर्थ सांगायचा झाल्यास देहू, आळंदी, पंढरपूर अशा ठिकाणी पायी वारी करणारा वारकरी. अशा भाऊंनी आनंद सांप्रदाय पायी दिंडी मंडळ वाकोडी ते पंढरपूर पायी दिंडी सुरु केली. श्री.संत तनपुरे बाबा पायी दिंडी सोहळा करुन आपल्या धार्मिकतेची व अध्यात्माची गोडी चाखली. तसेच श्रावणमासी वृध्देश्वर तीर्थयात्रा कधी पायी, तर कधी प्रवासी वाहनाने आणि नउ दिवसांच्या घटमाळामध्ये भाऊंनी साडेतीन पिठे माहूरगड, तुळजापूर, कोल्हापूर व वणी देवी असे प्रवासी वाहनाने तीर्थयात्रा करत. त्यांनी राधाकृष्ण कराळे, कुंडलिकराव भापकर,यशवंत शिंदे, नानाभाऊ शिंदे अशा सवंगड्यांसोबत तीर्थयात्रा केली. कोणाकडूनही कशाचीही किंवा आर्थिक अपेक्षा न बाळगता स्वखर्चाने तीर्थयात्रा करत.
भाऊंचे राहणीमान अत्यंत साधे असायचे. पांढरा नेहरु - पायजमा,कडक टोपी असा त्यांचा पोशाख असायचा. अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे भाऊ आपल्या क्रांतीकारक सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील आपले विचार आणि कार्य म्हणून आपल्या गावातील मुलांनी विशेष करुन मुलींनी शिक्षण प्राप्त केल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. मुले शिकली पाहिजेत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या विचारातून माझ्या गावातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिेजे म्हणून  जून 1992 मध्ये वाकोडी परिसर ग्रामिण विकास शिक्षणसंस्थेच्या अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल,वाकोडी विद्यालयाची 22 विद्यार्थ्यांच्या तुकडीने सुरुवात केली. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन देशात-परदेशात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांबरोबरच विद्यालयीन स्टाफ त्यांची कुटुंबे सुखाने आपला चरितार्थ चालवत आहेत.
परिवर्तनवादी विचारातून व नि:स्वार्थी त्यागातून गाव तालुक्यातील सामान्यजनांचे जीवन यशस्वी व उज्वल करण्याकरिता नगर तालुक्याच्या विकासाचे गंगोत्री असलेला नगर तालुका सहकारी साखर कारखाना.या सहकारी साखर कारखान्याची शेअर्स विक्री महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकासमंत्री मा.नामदार मधुकरराव पिचड यांच्या शुभहस्ते व खासदार यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली शेअर्स विक्रीचा शुभारंभ करुन क्रांतीकारक कार्य आमच्या भाऊंनी केले.
समाज हितासाठी सतत झटणार्‍या आमच्या भाऊंनी भागो नही, दुनिया बदलो या विचारसरणीतून कधी भाषण नाही, कोणताही कार्यक्रम असो, गावची निवडणूक असो कोठेही सभा अथवा संमेलने असो त्यांनी कधीच हातात माईक घेतला नाही. सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्यामध्येही ते कधीही हपापले नाही.भाषण न करता प्रत्यक्ष्य कृतीतून समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य भाऊंनी केले.
भाऊ, तुमचे असणे आमच्यासाठी सर्वकाही होते.
 तेच आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होते.
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे
पण तुम्ही आमच्यात असणं हिच मोठी उणीव आहे.

भाऊंच्या या आभाळाएवढ्या कार्यास माझे मरणोत्तर परमेश्वराजवळ एकच मागणे भाऊंना
शब्दांची शब्दांजली,
सुमनांची सुमनांजली,
स्वरांची स्वरांजली,
आदराची आदरांजली,
भावाची भावपूर्ण श्रध्दांजली.....

No comments:

Post a Comment