ओबीसी आरक्षणासाठी...भाजपाचा एल्गार! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

ओबीसी आरक्षणासाठी...भाजपाचा एल्गार!

 ओबीसी आरक्षणासाठी...भाजपाचा एल्गार!

नागपूरपासून औरंगाबादपर्यंत.. मुंबईपासून पुणे-अहमदनगर पर्यंत संपूर्ण राज्यात.

मोर्चा.. रस्ता रोको.. ठिय्या आंदोलनाने महाराष्ट्र दणाणला.
सोलापुरात कार्यकर्ते पोलिसात झटापट.. जोरदार घोषणाबाजी करत भाजपा कार्यकर्ते आक्रमक. 1 हजार ठिकाणी आंदोलन

मुंबई - ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज प्रचंड संतापला आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यात एक हजार ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील अनेक भागात मोर्चे, रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करत भाजपने निषेध नोंदवला आहे. ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपने संपूर्ण राज्यात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. ठाण्यापासून मुंबई-पुण्यापर्यंत आणि नागपूरपासून औरंगाबादपर्यंत भाजपचा एल्गार आज पाहायला मिळाला.
बावनकुळेंचं ठिय्या आंदोलन - नागपुरातील मानेवाडा चौकात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं. बावनकुळे यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडत ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ओबीसींचं आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
सोलापुरात भाजप कार्यकर्ते- पोलिसांत झटापट - सोलापुरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटपट झाली. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पुतळा जाळण्याचा आवाहन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही झटापट झाली.
पुण्यात जोरदार आंदोलन - पुण्यात भाजपचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आंदोलनात सहभागी झाले. भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी धरणे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
नाशिकमध्ये एल्गार - नाशिकमध्येही भाजपच्या नेतृत्वात ओबीसींचा एल्गार पाहायला मिळाला. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
औरंगाबादमध्ये शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर - औरंगाबाद शहरातील अमरप्रीत चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र जमून सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. आमदार अतुल सावे आणि संजय केनेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ठाण्यात जोरदार घोषणाबाजी - ठाण्यात भाजप आमदार निरंज डावखरे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. हातात फलक घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात स्त्रियांचा मोठा सहभाग होता. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
जळगावात कार्यकर्त्यांचं उत्सफुर्त आंदोलन - जळगावातही ओबीसी आरक्षणासाठी भाजपाने जोरदार आंदोलन केले. भाजपचे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला.
कोल्हापूरही दणाणले - कोल्हापूरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. महाविकास आघाडीविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झालं असा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारमधील मंत्रांमध्ये विकास कामांसाठी समन्वय नाही मात्र भ्रष्टाचार आणि अनैतिक कामांसाठी समन्वय असल्याची खोचक टीका यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केली.

No comments:

Post a Comment