दारुड्या पतीची पत्नीला लाकडाने मारहाण बाळाला जन्म देवून आईने सोडला प्राण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

दारुड्या पतीची पत्नीला लाकडाने मारहाण बाळाला जन्म देवून आईने सोडला प्राण.

 विळद पिंपरी येथील ‘वर्षा’ या विवाहितेचा दुर्दैवी अंत.

बाळाला जन्म देवून आईने सोडला प्राण.
दारुड्या पतीची पत्नीला लाकडाने मारहाण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पोटातील आठ महिन्याच्या बाळासाठी तिने धार्मिक विधींचा धरलेला आग्रहच तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला.. नगर तालुक्यातील पिंपरी येथील आईचं बाळ मात्र जन्माला आलंय. बाळाला जन्म देऊन या मातेने जगाचा निरोप घेतला. पती-पत्नीतील वादांमुळे बाळ मातेला पारखं झालंय. पित्याला पोलिसांनी गजाआड केलं असून न्यायालयाने पित्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बाळासाठी धार्मिक विधी करायच्या मुद्यावरून पतीशी झालेला वाद विकोपाला गेला. पतीने दारूच्या नशेत पत्नीला लाकडाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत गंभीर झालेली माता कोमात गेली. तिच्या मेंदूस गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती सुधारत नव्हती, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी प्रसूती शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान मिळवून दिले. बाळाला जन्म दिल्यानंतर मातेने प्राण सोडले.
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील सुनील नबाब जाधव (वय 30) याचा वर्षा हिच्याबरोबर सुमारे एक-दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. सुनील व वर्षा या दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर सुनील सकाळी सात वाजता गावठी अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेला. दारूच्या नशेत त्याने वर्षा हिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोक्याला दांडके जोरात मारल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याची नशा उतरली. टोल फ्री क्रमांक असलेल्या 108 या क्रमांकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवून घेतली. वर्षा हिला उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यावेळेस सुनील याने रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याचे सांगितले. डॉक्टरांनी पाच-सहा तास उपचार केले.
ती शुद्धीवर येत नसल्याने अखेर पुण्याला ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराची शर्थत केली. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कोमातून ती बाहेर येण्याची शक्यता मावळत चालली होती. अशा परिस्थितीत पोटातील बाळाला वाचविण्यासाठी प्रसूती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली, वर्षाचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. परंतु, तिची प्राणज्योत मालवली. ससून रुग्णालयाने या मृत्यूप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून एमआयडीसी पोलिसांकडे पाठविली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संदीप विष्णू गायकवाड यांच्याकडे या आकस्मात मृत्यूचा तपास होता.
मयत वर्षाचा पती सुनील याच्याकडे अपघाताच्या अनुषंगाने विचारणा केली. त्यावर सुनीलने आपण पत्नीसह तिघे दुचाकीवरून येत असताना रस्त्याच्या कडेला गवत खात असलेला घोडा अचानक मध्ये आला. त्यामुळे दुचाकीवरून खाली पडल्याने वर्षाच्या डोक्याला दुखापत झाली, अशी बचावाची भूमिका घेतली. तपासी अधिकारी गायकवाड यांनी सुनील दुचाकीवरून खाली पडल्याने किती जखमा झाल्या, याची पाहणी केली. त्याला किरकोळ स्वरुपाची जखम होती. त्यामुळे संशय आला. गरोदर महिला दुचाकीवर असताना तिसरा व्यक्ती दुचाकीवर कसा बसला ? अशी शंका त्यांना आली. तिसरा व्यक्ती कोण होता? अशी विचारणा केल्यावर अनोळखी व्यक्तीने आपल्याला लिफ्ट मागितल्याने त्याचे नाव माहित नसल्याचे सांगितले. सुनीलचे हे म्हणणे विश्वासहार्य नसल्याने हे प्रकरण वेगळे असल्याची खूणगाठ गायकवाड यांची झाली. त्यांनी सुनील राहत असलेल्या विळद पिंप्री आणि त्याचे मूळ गाव असलेल्या वनकुटे या गावात जाऊन माहिती घेतली. शेजारील लोकांना विश्वासात घेतले. त्यांनी सुनील हा दारूच्या आहारी गेलेला असून पत्नीला सतत मारहाण करीत असल्याचे सांगितले.
सुनील हा दुचाकीवरून 20 जुलै रोजी वनकुटे गावाकडून येत होता. त्यावेळेस रस्त्याच्यामध्ये घोडा आल्याने तो पडला होता. त्यामध्ये तो किरकोळ जखमी झाला होता. त्यावेळेस त्याने वनकुटे गावात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. या खर्‍या अपघातावरून त्याने पत्नीचा खून करून खोट्या अपघाताचा बनाव रचला. तपासी अधिकार्‍यांनी वनकुटे येथे जाऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यावेळेस डॉक्टरांनी .20 जुलै रोजी उपचार केल्याचे सांगितले. तर सुनीलने या जखमा 25 जुलै रोजीच्या खोट्या अपघातातील असल्याचे भासविले होते.

No comments:

Post a Comment