बँक प्रशासन दबावापोटी झालीय हत्या. शेवगाव अर्बन बँक व्यवस्थापक आत्महत्या प्रकरण.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 12, 2021

बँक प्रशासन दबावापोटी झालीय हत्या. शेवगाव अर्बन बँक व्यवस्थापक आत्महत्या प्रकरण..

 बँक प्रशासन दबावापोटी झालीय हत्या. शेवगाव अर्बन बँक व्यवस्थापक आत्महत्या प्रकरण..

सीआयडी चौकशीची चर्मकार विकास संघ व कुटुंबीयांची मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शेवगाव अर्बन बँकेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनी केलेली आत्महत्या ही बँक प्रशासनाच्या दाबावापोटी झालेली हत्या असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी चर्मकार विकास संघ व शिंदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली असून निवासी उपजिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याबाबत चे निवेदन देण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव ता.शेवगाव) व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मृत्यू दि. 27 जुलै रोजी विषारी औषध घेऊन झाला. गोरक्षनाथ शिंदे अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून सर्वांना परिचित होते. तीन महिन्यापूर्वी त्यांची बँकेतून सेवानिवृत्ती झालेली होती. परंतु बँक प्रशासनाने त्यांना पुढील तीन महिने बढती दिली होती. नगर अर्बन बँकेत मागील अनेक वर्षापासून विविध गैरप्रकार भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आली आहे. शेवगाव शाखेत सुद्धा खोट्या सोन्यावर अनेकांना संगनमताने कर्ज वितरित करण्याचे समोर आले आहे. यासंबंधी गोरक्षनाथ शिंदे यांनी 2018 मध्ये बँकेच्या गैरकारभार व भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती पुराव्यासह बँक प्रशासनास दिली होती. परंतु बँक प्रशासनाने या गैरकारभार व भ्रष्टाचार प्रकरणी कुठलीही ठोस कारवाई केली नाही. उलटपक्षी गोरक्षनाथ शिंदे यांना याविषयी गप्प राहण्याच्या सूचना बँक प्रशासनातील काही अधिकारी देत होते. पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड .संदर्भात धमक्या देऊन भ्रष्टाचाराची वाच्यता न करता मुकाट्याने काम करण्यास सांगितले जात होते. शिंदे यांना मानसिक त्रास देऊन खच्चीकरण सुरू होते. परंतु चुकीचे काम करणार नाही या भूमिकेवर ते ठाम होते. वेळोवेळी त्यांनी पोलिस प्रशासनास त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय व दबावाची माहिती दिली होती. परंतु पोलिस प्रशासनाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. शिंदे सेवा निवृत्तीनंतरची पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटीची रक्कम मिळावी म्हणून बँक प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. परंतु बँक प्रशासनाने चालढकल करून त्यांना अपमानित केले. बँक प्रशासनाने शिंदे यांच्यावर दबाव टाकून जवळपास पंचवीस लाख बँकेत ठेवी म्हणून ठेवण्यास भाग पाडले. शिंदे यांच्याकडून बँकेच्या गैरकारभार व भ्रष्टाचार उघड होऊ नये व प्रशासनाच्या मनाप्रमाणे काम करावे म्हणून मोठा दबाव बँक प्रशासनातील काही अधिकारी यांनी टाकल्याचा आरोप शिंदे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे.
शिंदे यांना शेवटी बँक प्रशासनावर विश्वास राहिला नाही. त्यांच्या स्वतःचे पैसे पण मिळणार नाही व बँक प्रशासन चुकीचे काम करायला लावेल अशी धारणा निर्माण झाली होती. तर बँक प्रशासन फसवून खोट्या प्रकरणात अडकवणार असल्याची खात्री त्यांना पटली होती. या सर्व दबावातून शिंदे यांनी स्वतःची स्वतःला संपविले. ही आत्महत्या नसून बँक प्रशासनाने वेळोवेळी शिंदे यांच्यावर अत्याचार करुन त्यांचा बळी घेतला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी संगिता गोरक्षनाथ शिंदे, विशाल शिंदे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रतिक शिंदे, प्रियांका शेंडे, किरण शेंडे, कारभारी शिंदे, कचरु शिंदे, दिपक शिंदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment