गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीत पालखी घेऊन येऊ नये.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 12, 2021

गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीत पालखी घेऊन येऊ नये..

 गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीत पालखी घेऊन येऊ नये..

शिर्डी संस्थानने केले भाविकांना आवाहन !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या कोवीड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 5 एप्रिल 2021 पासून पुढील आदेशापर्यंत साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 22 जुलै ते 24 जुलै या कालावधीत होणार्‍या गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त पालखी घेऊन पदयात्रींनी शिर्डी येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.
कान्हूराज बगाटे म्हणाले की, शिर्डी हे देशातील नामांकित देवस्थान असून साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता देशाच्या व जगाच्या कानाकोपर्‍यातून भक्त शिर्डी येथे येतात. तसेच श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षी रामनवमी, गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी आदी प्रमुख उत्सवांचे आयोजन करण्यात येते. पालखीसह येणारे पदयात्री या उत्सवांचे प्रमुख वैशिष्टये असते. त्यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून पालखीसह येणारे पदयात्रींची संख्या ही मोठया प्रमाणात असते. त्यामुळे मंदिर व मंदिर परिसरात मोठी वर्दळ होत असते. गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे 17 मार्च 2020 रोजी साईबाबांचे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासन आदेशान्वये 16 नोव्हेंबर 2020 पासून श्री.साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटीशर्तीवर खुले करण्यात आले होते. परंतु सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानच्या वतीने 5 एप्रिल 2021 पासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्तांना बंद ठेण्यात आले आहे. या दरम्यान समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम सुरु ठेवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे समाधी मंदिर बंद ठेवण्यात आल्यामुळे यापुर्वी झालेले सर्व उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले असून संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व पदयात्रींनी सहकार्य केले आहे. 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव येत असून याकालावधीत पदयात्री साईभक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये व संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन बगाटे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here