आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये करोनावरील उपचारांना आता होमिओपॅथीची जोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये करोनावरील उपचारांना आता होमिओपॅथीची जोड

 आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये करोनावरील उपचारांना आता होमिओपॅथीची जोड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोना महामारीने जगभरात थैमान घातले असून भारताने नुकताच करोनाच्या दुसर्या लाटेचा सामना केला आहे. दुसर्या लाटेत रूग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळाले. करोनावर आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार (ऍलोपॅथी) उपचार केले जात आहेत. या उपचारांना आता होमिओपॅथीक उपचार पध्दतीचीही जोड देण्याचा निर्णय जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलने घेतला आहे. प्रचलित उपचारांना होमिओपॅथीची जोड दिल्यास रूग्ण लवकर बरे होतात, असा अनुभव आहे. याशिवाय म्युकरमायकोसीसवरही ही उपचार पध्दती प्रभावी ठरणारी आहे. त्यामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येत्या रविवारपासून (11 जुलै) होमिओपॅथी तज्ज्ञांमार्फत ही सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्यावतीने देण्यात आली आहे. दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत ही ओपीडी सेवा चालू असेल.
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथीक फोरमचे मुख्य संशोधक डॉ.सोमीनाथ गोपाळघरे, फोरमचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र श्रीमाळी, सचिव डॉ.प्रशांत गंगवाल, डॉ.प्रवीण बीडकर, डॉ.सचिन मुसमाडे, डॉ.रियाज पटेल, डॉ.सोनाली मुनोत, डॉ.सुनिता व्यवहारे, पुण्यातील प्रसिध्द होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.संजीव डौळे हे ही सेवा देणार आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटल आणि इंडियन होमिओपॅथिक फोरमच्या संयुक्त विद्यमान ही सेवा सुरु होत आहे. यात सौम्य, मध्यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्या करोना रूग्णांवर होमिओपॅथीक पध्दतीनेही उपचार केले जाणार आहेत. याशिवाय करोनापश्चात होणारा त्रास कमी करण्यासाठी होमिओपॅथी औषधे दिली जाणार आहेत. करोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, सांधेदुखी, खुबा खराब होणे, जुलाब, आतड्यांना सूज येणे, दम लागणे, फुफ्फुसातील फायब्रोसिस, रक्ताची कमतरता, नाडीचे ठोके वाढणे, डोळ्यांना अंधुक दिसणे, लैंगिक समस्या अशी लक्षणे आढळून येतात. त्यावरही होमिओपॅथीव्दारे परिणामकारक उपचार करणे शक्य आहे. करोनानंतर म्युकरमायकोसीस होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावरही प्रभावी औषधोपचार होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क - 0241-2320473/74/75

No comments:

Post a Comment