विकेंड लॉकडाउन रद्द करा; दुकानांची वेळ बदला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

विकेंड लॉकडाउन रद्द करा; दुकानांची वेळ बदला.

 विकेंड लॉकडाउन रद्द करा; दुकानांची वेळ बदला. 

नगर मधील व्यापारी व सराफांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
शासनाच्या निर्बंधातील सकाळी 7 ते सायंकाळी 4 ही वेळ ग्राहक व दुकानदार यांच्या दृष्टीकोनातून अडचणीची आहे. ही वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत करून शनिवार व रविवारचा वीकेंड लॉकडाउन रद्द करावा अशी मागणी व्यापारी व सुवर्णकार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
एम.जी. रोड अहमदनगर स्थित किरकोळ दुकानांच्या मालकांची नोंदणीकृत संघटना व सराफ सुवर्णकार संघटनांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकाळी 7ते संध्याकाळी 4ही वेळ  ग्राहकांना आणि दुकानदारांना गैर-व्यावहारिक आणि गैरसोयीचे वाटते. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 किंवा सकाळी 10 ते 7 पर्यंत  ही वेळ करण्यात यावी कारण ग्राहक हे सकाळी 10 वाजे नंतर  येतात. तसेच  कामकाजाचे  तास वाढविल्यास शेवटी गर्दी होणार नाही. आपण संध्याकाळी 7 वाजता दुकान बंद करण्याची वेळ दिली तर  तर बहुतेक दुकानदार विदेशी देशांप्रमाणे हे धोरण कायम स्वरूपी अमलात आणतील.
सध्या सर्व सिझन संपल्यामुळे दुकानात कोठे ही गर्दी नाही  त्या मुळे कोरोना अनावश्यक दुकानांमुळे पसरतो असे नाही. देशातील आरोग्य तज्ञांची तिसरे लाटे बाबत विविध मतांतरे आहेत. तिसरी लाट कधी येईल याचा अंदाज टास्क फोर्स किंवा कोणालाही सांगता येणार नाही. प्रत्यक्षात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा लॉकडाउन लादणे फारच अवघड होइल . आता कोविड रूग्ण संख्या नियंत्रणाखाली आली असताना शासन व्यवसायाचे मौल्यवान कालावधी का वाया घालवित आहे? शनिवार व रविवार लॉकडाऊन दरम्यान लोक घरात राहत नाहीत. पूर्वी सर्व रुग्णालये भरली होती आता आठवड्याच्या शेवटी सर्व हिल स्टेशन आणि पिकनिक स्पॉट्स फुल आहेत. दुकाने बंद असताना  कर्मचारी शहरात फिरतात आणि दुकाने बंद असूनही रस्त्यावर गर्दी असते म्हणून शनिवार व रविवार लॉकडाउनचा उपयोग होत नाही. म्हणूनच, हे अयोग्य,अव्यावहारिक आहे तरी  शनिवार व रविवारचे लॉकडाउन त्वरित रद्द करण्याची आवश्यकता आहे. महानगरपालिका क्षेत्र- जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागांच्या तुलनेत शहर भागात रुग्ण संख्या कमी आहे. म्हणून, लोकसंख्येची कोणतीही अट न घालता उर्वरित जिल्ह्यापासून शहर भाग स्वतंत्र करावा. लॉकडाउन आणि प्रचंड महागाई  या दोन्हीचा एकाचवेळी सामना लोक करू शकत नाहीत. अर्थव्यवस्था  सुधारण्यासाठी लॉकडाउन शिथिल करून गरिबांना मदत करा असेही निवेदनात म्हटले आहे.
निरर्थक लॉकडाऊनमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी सरकारने लसीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लॉकडाउनच्या अंमलबजावणी साठी कर्मचारी नेमणूक करण्याऐवजी लसीकरण  सुरळीत होण्यासठी प्रशासनाने अधिक कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत. वेळेची मर्यादा घालण्याऐवजी शासनाने अर्थव्यवस्था खुली करुन त्या पैशाचा उपयोग वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी करायला हवा. लॉकडाउननंतर व्यवसाय चांगला होता परंतु सरकारने वेळ कमी करुन अर्थव्यवस्थेला ब्रेक लावले. लोकांना झालेले नुकसान भरपाई साठी संधी भेटली होती ती पण गेली आहे. शासनाने सर्व मुद्यांचा काळजीपूर्वक विचार करून त्वरित वेळ न घालवता सकाळी 9ते संध्याकाळी 6 किंवा सकाळी 10 ते सायंकाळी 7  या वेळेत दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी व त्वरित शनिवार व रविवारचा लॉकडाउन रद्द करावा असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर किरण व्होरा, श्यामराव हरिभाऊ देडगावंकर (महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन, अहमदनगर), सुभाषसेठ मुथा (महाराष्ट्र राज्य  सराफ सुवर्णकार संघटना), नीलकंठराव देशमुख (अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटना), सुभाषसेठ कायगावकर (अखिल भारतीय लाड सुवर्णकार संघटना) यांच्या सह्या आहेत. उपमुख्य मंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री, अहमदनगर, मदत व पुनर्वसन मंत्री, मुख्य सचिव आपत्ती व्यवस्थापन, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आ. संग्राम भैय्या जगताप यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment