आपल्या देशात हसण्याला प्रतिष्ठा नाही ः कळमकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

आपल्या देशात हसण्याला प्रतिष्ठा नाही ः कळमकर

 आपल्या देशात हसण्याला प्रतिष्ठा नाही ः कळमकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः निकोप हसल्याने मन व शरीर ताजेतवाने राहते. पण गंभीर असणे हे प्रतिष्ठेचे, विद्ववत्तेचे, साधुत्वाचे लक्षण समजले जाते. अशा गैरसमजुतीमुळे आपली माणसे आनंदाने जगत नाहीत असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.
मराठा सेवा संघ व मराठा पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘ जगताना विनोदाचे महत्त्व ‘ या विषयावर ते बोलत होते. कळमकर पुढे म्हणाले, विनोद सत्याचा मित्र असतो .तो हसता हसवता असत्याचे बुरखे फाडतो. सर्व समाज सुखी व आनंदी रहावा असे ज्याला वाटते तोच विनोदनिर्मिती करून सर्वांना हसवू शकतो. लबाड व स्वार्थी माणसे दुसर्याचे वाटोळे झाले तरच हसतात. इतरांच्या बाबतीत चांगली गोष्ट घडली तर आनंदाने हसणारा मनुष्य खरा मानवतावादी असतो. वागण्यातील कोतेपणा, मुलांची अवास्तव काळजी, संपत्ती कमावण्याचा सोस, राजकीय स्पर्धा, आर्थिक, सामाजिक,जागतिक चिंता उराशी कवटाळून बसल्याने आपली माणसे कायम अस्वस्थ असतात. त्यामुळे भारतीय माणसांची हृदये, मेंदू त्याच्या शारीरिक वयापेक्षा पंधरावीस वर्षांनी जास्त म्हातारी असतात. यावर खळखळून हसवणारा विनोद हे एकमेव औषध आहे. हसण्याला प्रतिष्ठा नसल्याने माणसे नेहमी ताणतणावात राहतात.  दुखा:कडे गांभिर्याने पाहिली की ती वाढतात आणि खेळकरपणे पाहिले की कमी होतात. म्हणून माणसांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पहायला शिकले पाहिजे.कोल्हटकर गडकरींचे सकस विनोद सांगून कळमकर यांनी श्रोत्यांना विनोदाची सैर घडवली. यावेळेस मराठा पतसंस्थेचे संस्थापक इंजि.विजयकुमार ठुबे, संचालक सुरेश इथापे,संपूर्ण सावंत, राजेश्री शीतोळे ,शोभाताई जाधव, उदयन घुले, काशीनाथ डोंगरे, पोपट काळे, विश्वास करंजकर, अशोक मुठे, नाना मरकड, अशोक वारकड, राजेंद्र ढोणे, पुष्पाताई मरकड, जेष्ठ पत्रकार संजय वाघमारे, राजेंद्र ठणगे आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत ज्ञानदेव पांडुळे, सूत्रसंचालन किशोर मरकड तर आभार राजेंद्र इंगळे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment