संचालक मंडळाची मुदत संपल्याने शिक्षक बँकेवर प्रशासक नेमावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 17, 2021

संचालक मंडळाची मुदत संपल्याने शिक्षक बँकेवर प्रशासक नेमावा

 संचालक मंडळाची मुदत संपल्याने शिक्षक बँकेवर प्रशासक नेमावा

प्राथमिक शिक्षक समितीची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची मुदत पाच महिन्यांपूर्वी संपली आहे.मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे.बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी संबधितांकडे करण्यात आल्या आहेत.त्यामुळे बँकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राज्य शिक्षक समितीचे उपाध्यक्ष रा.या.औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, सुदर्शन शिंदे, नितिन काकडे, भास्कर नरसाळे, विजय महामुनी, सीताराम सावंत, संजय नळे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त सभासदांना भेट देण्यात आलेल्या घड्याळांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी वकील श्रीराम वाघ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. वाघ यांनी केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने आवश्यकतेपेक्षा जास्त घड्याळे खरेदी केली.त्यामुळे बँकेचे व पर्यायाने सभासदांचे 9 लाख 21 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले.तसा अहवाल चौकशी अधिकारी वाघ यांनी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला आहे.
संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराच्या व अनियमिततेचा अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत.यातील काही प्रकरणाची चौकशी सुरू आहे.काही प्रकरणांमध्ये चौकशी अधिकार्‍यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले आहेत.गैरव्यवहारांची चौकशी सुरू असताना मुदत संपलेले संचालक मंडळ सत्तेत राहणे उचित नाही. मुदतवाढ मिळालेल्या संचालकांकडून आणखी गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा प्रकार सभासदांच्या आणि बँकेच्या आर्थिक हितासाठी घातक आहे.त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी.शक्य असल्यास बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here