तारण ठेवून फायनांन्स कडून 5 लाखांचे कर्ज. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

तारण ठेवून फायनांन्स कडून 5 लाखांचे कर्ज.

 तारण ठेवून फायनांन्स कडून 5 लाखांचे कर्ज.

पोलीस कर्मचार्‍यावर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गुन्हात पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्याचे दागिने खाजगी फायनांन्सकडे तारण ठेवून 5 लाख 40 हजार रुपयांचे कर्ज घेणार्‍या नगर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक गणेश नामदेव शिंदे यांच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचे फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करून पोलिसांनी सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला होता. सदरचा मुद्देमाल हा जप्त केल्यानंतर तो पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकून यांच्याकडे ठेवण्यात येत असतो. तो जप्त केलेला मुद्देमाल हा न्यायालयामध्ये दाखल करायचा असतो. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचा ऐवज हा नगर तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात असतानाच पोलीस कर्मचारी गणेश शिंदे याने सदर सोन्याचा मुद्देमाल हा एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी 5 लाख  40 हजार 640 रुपये कर्ज घेतले व स्वतः या रकमेचा वापर केला. न्यायालयाचा विश्वासघात करुन फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
सपोनि राजेंद्र सानप यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये संबंधित पोलिस कर्मचार्याविरुद्ध कलम 406 ,408 409 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच संबंधित आरोपी याने अजून काही रकमेचा अपहार केलेला आहे, असेही समजते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे. या संदर्भामध्ये  कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख यांनी 29 जून रोजी या संदर्भात गुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment