मनपा विरोधात काँग्रेसचा आसुड मोर्चा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

मनपा विरोधात काँग्रेसचा आसुड मोर्चा!

 मनपा विरोधात काँग्रेसचा आसुड मोर्चा!

अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीत फूट...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील सत्तेत असणारी महाविकासआघाडी नगर शहरातही महापौर निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आली असताना काँग्रेस पक्षाने मंगळवारी (6 जुलै) महापालिकेच्या विरोधात आसूड मोर्चा काढण्याचे ठरविले असून त्यामुळे शहरातील महाविकास आघाडीत फूट पडत असल्याचे दिसून येत आहे. महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी सहभाग घेतला असताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मात्र मनपाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.
आसूड मोर्चा विषयी माहिती देताना मनोज गुंदेचा म्हणाले की, शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरून शहरात वावरावे लागते. काँग्रेस ही नगर शहरातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. जिथे सामान्यांचे प्रश्न असतील तिथे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही नागरिकांच्या प्रश्नावर भूमिका घेण्यासाठी कायम पुढे असते. मंगळवारचा आसूड मोर्चा हा किरण काळे यांचे नेतृत्वाखाली महानगरपालिकेला रस्त्याच्या प्रश्नांवर जाब विचारासाठी काढला जाणार आहे.
महापालिकेत भाजपसह सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळत असताना काँग्रेसने मात्र नागरिकांच्या प्रश्नांवर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काळे यांनी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून अहमदनगर मनपाच्या राजकारणामध्ये काँग्रेस हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका बजावेल असे वारंवार जाहीर केले आहे. त्या पद्धतीने शहरातली काँग्रेस पक्ष संघटना आक्रमकपणे काम करताना पाहायला मिळत आहे.  महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र येत महापौर, उपमहापौर पदाची निवड केली आहे. त्यातच काँग्रेसच्या वतीने मागील अडीच वर्षांच्या भाजप, राष्ट्रवादीच्या सत्ता काळातील निष्क्रिय कारभाराची 24 मुद्द्यांची श्वेतपत्रिका प्रकाशित करत अनेक प्रलंबित प्रश्नांवर मनपा प्रशासन, सत्ताधारी आणि नागरिकांचे लक्ष वेधले आहे. मनपातील सत्तांतरानंतर काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे नगर शहरातील महाविकासआघाडीमध्ये संघर्ष पेटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नगर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. शहर खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या प्रश्नावर आवाज उठवत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या त्याचबरोबर नगर शहरातील रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्याची मागणी काँग्रेस आसूड मोर्चा द्वारे करणार आहे.

No comments:

Post a Comment