माजी महापौरांना हवं विरोधी पक्षनेता पद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

माजी महापौरांना हवं विरोधी पक्षनेता पद.

 माजी महापौरांना हवं विरोधी पक्षनेता पद.

महेंद्र गंधे, मनोज कोतकर, मालनतााई ढोणे, स्वप्नील शिंदे इच्छुक. प्रदेश कडून हस्तक्षेप
भाजपा पक्षश्रेष्ठींपुढे पेच प्रसंग...; शनिवारी मुंबईत बैठक...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिकेच्या राजकारणात सध्या महाविकासआघाडी सत्तेत असली तरी भाजपा राष्ट्रवादीची पूर्वाश्रमीची युती संपुष्टात आली नाही असेच म्हणावे लागेल. महापौर पदावरून बाबासाहेब वाकळे पायउतार झाले असले, तरी त्यांनी विरोधी पक्षनेत्यासाठी लावलेल्या फिल्डिंगला भाजपा पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून सुरुंग लावला.विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपा नगरसेवकांत रणकंदन सुरू असून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांसह अनेक भाजपा नगरसेवकांचा वाकळे यांना पाठिंबा असल्याचे दिसत आहे.
महापालिकेच्या विरोधी पक्षनेता पदावरून भाजपामध्ये धुसफूस सुरू झाली असल्याचे दिसत आहे. माजी उपमहापौर मालन ढोणे महापालिकेत भाजपाच्या गटनेत्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदी गटनेत्याचीच वर्णी लावली जाते, पण काल विरोधी पक्षनेतेपदी बाबासाहेब वाकळे यांची नियुक्ती करावी असे भाजपा नगरसेवकांच्या सह्या असणारे पत्र महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे देण्यात आल्यावर अन्य इच्छुक भाजपा नगरसेवक व महेंद्र गंधे यांनी पक्षश्रेष्ठींना याची कल्पना दिल्यावर पक्षश्रेष्ठींनी याबाबत हस्तक्षेप केला आहे. या हस्तक्षेपामुळे वाकळे यांची विरोधी पक्षनेते पदाची निवड लांबली जात असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेतील अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महापौरपदावर कार्यरत असणार्‍या बाबासाहेब वाकळे यांनी भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस नगरसेवकांशी सलोख्याचे संबंध ठेवून कोणतेही वाद-प्रतिवाद होऊ नये याची दक्षता घेतली असल्यामुळे या सर्वच पक्षाच्या नगरसेवकांचा वाकळे यांना पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. आमदार संग्राम जगताप यांचे पाठबळही वाकळे यांची जमेची बाजू असून भाजपा पक्षश्रेष्ठी भाजपा नगरसेवकांचा कल पाहून निर्णय घेतील कि अन्य कोणाला संधी देतात हे शनिवारी मुंबईत होणार्‍या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

माजी उपमहापौर मालन ढोणे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, स्वप्नील शिंदे यांची नावे विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत असताना माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना विरोधी पक्षनेते पद हवं आहे. वाकळे व महेंद्र गंधे या दोघांमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू असून भाजपा पक्षश्रेष्ठी या दोघांपैकी एक किंवा अन्य नावाची शिफारस करण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण केंद्रात विरोधी पक्ष नेते पदाबाबत चर्चा होणार असून खा. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका यात महत्त्वपूर्ण असणार आहे.

भाजपा गटनेत्या मालनताई ढोणे यांनी पत्र देऊन भाजपाला विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी केली आहे,पण पत्रात त्यांनी कोणाचे नाव दिले नाही. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे असे सह्या असणारे भाजपा नगरसेवकांचे पत्र मला मिळाले आहे पण अजून त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.महिला बालकल्याण व  सभागृहनेता या पदांवर कोणाची वर्णी लावायची याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांना विचारून घेण्यात येणार आहे - महापौर, रोहिणी शेंडगे

No comments:

Post a Comment