समृध्द गावांमधून कर्जत तालुक्यातील वीस गावांच्या कायापालटाला सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

समृध्द गावांमधून कर्जत तालुक्यातील वीस गावांच्या कायापालटाला सुरुवात

 समृध्द गावांमधून कर्जत तालुक्यातील वीस गावांच्या कायापालटाला सुरुवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत-जामखेड तालुक्यात समृद्ध गाव योजने अंतर्गत प्रत्येकी वीस गावे कायापालट करण्यासाठी जोमाने कामाला लागली असून विविध प्रश्नांना मार्गी लावत सक्रियपणे कामे केली जात असून गेली काही दिवसांपासून या गावात स्वच्छतेसाठी दररोज श्रमदान करण्यासाठी ही ग्रामस्थ सरसावले आहेत.
कर्जत तालुक्यातील वीस गावाची आ. रोहीत पवार यांच्या केजेडीएफ मार्फत समृध्द गाव योजनेसाठी निवड करून त्यांना विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू करण्यात आली आहेत. आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या  दररोज प्रत्येक गावाच्या छोट्या मोठ्या कामावर जातीने स्वतः लक्ष ठेऊन मार्गदर्शन करत या गावाच्या शाश्वत विकासासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.  तर त्याची संपूर्ण टीम प्रशासकीय पातळीची मदत घेत नियोजन करत आहेत. समृध्द गाव योजनेअंतर्गत सहभागी वीस गावामध्ये पावसाळ्या अगोदर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली,  तर सध्या वृक्षारोपण स्वच्छता अभियान याकडे लक्ष देऊन प्रत्येक गावाला विशेष प्रोत्साहन देत काम करून घेतले जात आहे. यासाठी सुनंदाताई या प्रत्येक गावाच्या कामाचे, कार्याची कृतीची दखल घेत त्यावर प्रतिक्रिया देत असल्याने काम करणार्‍या ग्रामस्थाचाही  उत्साह वाढत आहे.
कर्जत तालुक्यातील एकूण 11 गावांनी  श्रमदान करत स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये माळंगी, थेरगाव, कौडाणे, निंबोडी, पठारवाडी, परिटवाडी, सितपुर, करमनवाडी, राक्षसवाडी बु, थिटेवाडी, बेलगाव याचा समावेश असून ग्रामस्थांबरोबर महिलाही या कामात पुढे येऊ लागल्या आहेत.
समृद्ध गाव योजनेबाबत सौ सुनंदाताई पवार यांनी अनेकदा गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामसेवक यांच्या बैठका घेऊन आपल्या गावाचा विकास आराखडा तयार करणेबाबत चर्चा केली. यामध्ये गावातील प्राधान्याने करण्यात येणार्‍या कामाची यादी तयार करण्यात येणार असून विकास आराखड्यामध्ये प्रामुख्याने गावातील अंतर्गत रस्ते, गावाला जोडणारा मुख्य रस्ता, पिण्याच्या पाण्याची अडचण, विज, गावामध्ये आवश्यक ठिकाणी प्लेवर ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी व त्याअंतर्गत सुशोभीकरण, शाळा व अंगणवाडी व त्यातील साहित्य किंवा दुरुस्ती, रस्त्यावरचे दिवे, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत ऑफिस, दलित वस्ती व तांडा वस्ती सुधारित कामे यांचा समावेश करावयाचा असून  ग्रामस्वच्छतेच्या संदर्भातल्या महत्वाच्या कामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव ज्यामध्ये शौचालय, शोषखड्डे, नाडेप तयार करून पंचायत समिती मध्ये सादर करणे आदी बाबत पाठपुरावा केला जात आहे. या विविध प्रकारच्या कामामुळे या गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आ. रोहित पवार यांची संपूर्ण टीम यासाठी झटून काम करताना दिसत आहे. याकामात त्या त्या गावांना, ग्रामसेवकाना प्रोत्साहन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव व त्याचे सर्व अधिकारी ही या सर्व प्रक्रियेत सक्रिय होऊन सहभागी होत अत्यंत नेटाने काम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात या वीस गावाचा अभूतपूर्व शाश्वत विकास पहावयास मिळणार असून सहभागी न होणार्‍या गावांना हेवा वाटणार आहे. या वीस गावातील लोकांना मराठवाड्याचे उपायुक्त सुरेश बेदमुथ्था व टीम कडून यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, या वीस गावातील काही गावे मात्र अद्याप म्हणावे तसे सक्रिय झालेले नाहीत त्यांनी अजून ही वेळ न दवडता या अभियानात सहभागी होऊन आपले गाव समृद्ध करन्यासाठी  सक्रिय व्हावे असे आवाहन  सातत्याने केले जात आहे व त्यास या गावांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे.


झाड लावताना ते भविष्यात तोडावे लागणार नाही अशाच जागेत लावा. भिंतीच्या कडेला झाडे लावू नका, आपल्याला प्लास्टिक मुक्त व रोग मुक्त गाव करायची आहेत.बारीक गवताकडे लक्ष देवु नका. मोठी झुडप, गाजर गवत, प्लास्टिक, पडकी घरे याकडे दुर्लक्ष करु नका.

अशा सूचना बरोबरच आपण खूप सुंदर काम करत आहात, खुप छान, कितीजण आहात याचा विचार करु नका. मुठभर माणसच इतिहास घडवतात अशा प्रतिक्रिया देत आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार प्रत्येक कामाला शाबासकीस देत तर कधी सूचना देत असल्याने ग्रामस्थाचा उत्साह वाढत आहे.

No comments:

Post a Comment