कोरोनाने निसर्ग व पर्यावरणाचे महत्त्व पटवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

कोरोनाने निसर्ग व पर्यावरणाचे महत्त्व पटवले

                                                 कोरोनाने निसर्ग व पर्यावरणाचे महत्त्व पटवले
निसर्ग व पर्यावरण ही मनुष्यासाठी लाभलेली अनमोल देणगी आहे. भूतलावरचा सगळ्यात बुद्धिमान म्हणजे मनुष्य. मनुष्याने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर केला. पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र परतफेड करण्यास साफ विसरला. परिणामी निसर्ग व पर्यावरणाचा मोठा र्हास झाला. मागील वर्षापासून कोरोना महामारीचे संकट संपुर्ण जगापुढे असताना या संकाटातून मनुष्याला निसर्ग व पर्यावरणाचे महत्त्व पटले. मनुष्य पर्यावरणाप्रती कधीही कृतज्ञ राहिला नाही. अशा बेजबाबदार वागणुकीमुळे स्वत: मनुष्यच त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे.


मनुष्य हा पर्यावरणाचाच एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. ज्याप्रकारे एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबाचा घटक असल्याचे भान ठेऊन वागतो. कुटुंबातील एक व्यक्ती जरी बेजबाबदारपणे वागत असल्यास त्या कुटुंबाची सुख, समृध्दी तळास जाते. पर्यावरणाचे पण असेच आहे. पर्यावरणाने मला खुप काही दिले आहे. त्याची परतफेड म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे, झाडे लावणे, प्रदुषण कसे कमी होईल या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. मनुष्याने निसर्ग व पर्यावरणाप्रती ओरबडून खाण्याची प्रवृत्ती नेहमीच दाखवली आहे. तर निसर्गाने उदार मनाने मनुष्याला भरभरुन दिले. मात्र त्याची परतफेडची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रासह देशाला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासली. अनेक रुग्णालयात कोरोना रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यू ओढवला. हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन हॉस्पिटल बाहेर रस्त्यावर ऑक्सिजन घेताना रुग्ण दिसून आले. या ऑक्सिजनची निर्मिती करणार्या वृक्षांचीच कत्तल मानवाने मोठ्या प्रमाणात केली आहे. मनुष्याने आपल्या हव्यासाला थोडे लगाम लावले पाहिजे. मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले असून याबाबत वेळीच जागृक न झाल्यास येणारा काळ महाविनाशाकडे घेऊन जाणारा असेल.

कोरोना सारख्या एका छोट्या विषाणूने अख्खे जग बंद पाडले. अनेक मृत्यूमुखी पडले. मात्र निसर्गाने प्रकोपाची सुरुवात केल्यास भूतळावर मनुष्य शोधणे देखील कठीण होईल. निसर्गाशी मनुष्याचे जीवन जोडले गेलेले आहे. अश्मयुगापासून ते 21 व्या शतका पर्यंत मनुष्य हा निसर्गाचा अविभाज्य घटक राहिला आहे. पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने आपल्या बरोबर इतर सजीव घटकांचा विचार करून केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही. भविष्यात येणार्या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकांचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. ही सामाजिक जबाबदारी प्रत्येकाने कर्तव्य म्हणून पार पाडली पाहिजे. नैसर्गिक पर्यावरणात चांगला किंवा वाईट बदल घडविण्याची क्षमता केवळ मनुष्याकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. शहरात देखील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली गेली पाहिजे. शहराचे विस्तारीकरण होत असताना मोठ्या प्रमाणात झाडे नष्ट होत आहे. तर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापली जातात. शासनाने कायदे केले असले तरी पुन्हा झाडे लावली जात नाही.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र वृक्षरोपण बरोबर त्याचे संवर्धन तेवढेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील संकट टाळण्यासाठी मनुष्याने निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची वेळ आहे. पावसाळ्यात ज्या उत्साहाने झाडे लावली जातात, त्या उत्साहाने उन्हाळ्यात त्यांची निगा राखली जात नाही. झाडे ही एकप्रकारे मनुष्याची संपत्ती आहे. झाडांमुळे प्रदुषणावर नियंत्रण तर राहते व शुध्द हवा देखील मिळत असते. दिल्ली सारखी शहरे एवढी प्रदुषित झाली आहे की, शुध्द हवा मिळणे देखील कठिण झाले आहे. दिल्लीत तर चहा स्टॉल सारखे ऑक्सिजन स्टॉल लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. पर्यावरणाच्या या अमुल्य देणगीची निगा न राखल्यास शुध्द हवेसाठी प्रत्येक नागरिकाला भविष्यात पैसे मोजावे लागतील. प्रदूषणाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वृक्षांची संख्या वाढली पाहिजे. एकीकडे जंगले नष्ट होत आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरण संवर्धन ही लोक चळवळ होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिल्यास भविष्यात जागृक नागरिक घडणार आहे. एका घरात किती वाहने असावी यावर देखील मर्यादा आनण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच अधिक प्रदुषण करणार्या कारखाण्यांवर बंधने लादली गेली पाहिजे. वाढत्या प्रदूषणाने ओझोन वायू ला छिद्र पडून अतिनील किरणे पृथ्वीवर येण्याचा धोका वाढला आहे. अशाच पद्धतीने प्रदूषण सुरू राहिल्यास एक दिवस विनाश अटळ असून, मनुष्याने पर्यावरणाप्रती कृतज्ञ राहून त्याचे संरक्षण केले पाहिजे. पर्यावरण संवर्धन एक दिवसात होणारी गोष्ट नसून, सर्वांच्या सहभागाने ते साध्य होणार आहे. यासाठी कायद्याचा बडगा नको तर नियोजनबध्द आराखड्याची व जनजागृतीची गरज आहे.

- निमगाव वाघा (ता. जि. अहमदनगर)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here