कर्नाटकातून आलेला रूग्ण भाळवणीमध्ये खडखडीत बरा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

कर्नाटकातून आलेला रूग्ण भाळवणीमध्ये खडखडीत बरा!

 कर्नाटकातून आलेला रूग्ण भाळवणीमध्ये खडखडीत बरा!

शुगर 780, स्कोअर 18 तरीही सामान्य उपचारांच्या जोरावर केली कोरोनावर मात !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
राज्याबरोबरच आता परराज्यातील रूग्णांनाही आ. नीलेश लंके यांचा आधार वाटू लागला आहे ! आ. लंके यांच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात हजारो रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहीती सोशल मिडियावर पाहिल्यानंतर भाळवणी येथे दाखल करण्यात आलेल्या कर्नाटक राज्यातील 65 वर्षीय आंबाजी विठोबा कारंडे या रूग्णाने सामान्य उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आ. लंके यांच्या रूपाने आम्हाला देव भेटल्याच्या भावना आंबाजी कारंडे यांचा मुलगा अर्जुन यांनी व्यक्त केली.
नगर जिल्हयाबरोबरच लगतच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड आदी जिल्हयाबरोबरच सोलापूर, फलटण, बार्शी, सांगली येथील शेकडो रूग्णांवर भाळवणीच्या आरोग्य मंदीरात उपचार करण्यात आले. आ. लंके यांच्या कोरोना रूग्णांसाठी सुरू असलेल्या कामाची देशपातळीवरील माध्यमांनी दखल घेतल्याने सर्वत्र आ. लंके यांच्याच नावाची सध्या चर्चा सुरू आहे. राज्याच्या विविध भागांतील रूग्ण आ. लंके यांच्याकडे अधार म्हणून भाळवणी येथे दाखल होत असताना तशाच अधारासाठी आंबाजी विठोबा कारंडे (वय 65 रा. शिराढोन, ता. परचड जि. विजापूर, कर्नाटक) यांना त्यांचा मुलगा अर्जुन कारंडे यांनी खाजगी वाहनातून थेट भाळवणी येथे उपचारासाठी  आले.
आंबाजी यांना 31 मे रोजी दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांना धड चालता येत होते ना बोलता येत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण 780 तर एचआरसीटी स्कोअर होता 18 ! अतिशय गंभीर स्थिती असलेल्या या रूग्णास दाखल करून उपचार सुरू करण्याच्या सुचना आ. लंके यांनी दिल्या. डॉक्टरांच्या चमूने उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारू लागली. लष्करात नोकरीस असलेल्या आंबाजी यांचा मुलगा अर्जुन यांनी सांगितले की वडीलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर मी सुटी काढून गावी आलो. आ. लंके यांच्या कामाविषयी सोशल मिडियावर अनेक व्हिडीओ पाहिले होते. कर्नाटक राज्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी कोठेही सुविधा उपलब्ध नव्हत्या. आ. लंके यांच्याप्रमाणे रूग्णांना आधार देणारा देवदूत नव्हता अथवा आरोग्य मंदीरात देण्यात येत असलेल्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे गंभीर आजारी असलेल्या वडीलांना खासगी वाहनामधून थेट भाळवणी येथे आणले. आ. लंके हे वडीलांवर उपचार करून त्यांना आजारातून बाहेर काढतील एवढाच विश्वास होता. तो विश्वास सार्थ ठरल्याची कृतज्ञता अर्जुन यांनी व्यक्त केली. चालता बोलता येत नसलेले वडील आता चालू लागले आहेत, बोलू लागले आहेेत. आ. लंके यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास दिसत आहे. खरोखरच त्यांच्या रूपाने आम्हाला देव माणूस भेटल्याचे ते म्हणाले.

मुंबईतील रूग्णांनाही आ. लंकेंचाच आधार !
  मुंबई, नवी मुंबई तसेच विविध औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणार्‍या कामगारांनाही आ. लंके यांचाच आधार मोलाचा वाटला. विविध भागातून मुंबई, नवी मुंबईत नोकरी धंद्यासाठी आलेल्या नागरीकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांनीही तडक भाळवणीची वाट धरली. असे शेकडो रूग्ण तेथून कोरोनावर मात करून घरी परतले. लगतच्या रांजणगांव गणपती, चाकण, नगर येथील औदयोगिक वसाहतींमधील परप्रांतीय कामगारांनाही भाळवणीच्या आरोग्य केंद्राचा अधार घेतला. त्या सर्वांनी उपचार करून घरी परतताना आ. लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

आ. लंकेही गहिवरले !
  रक्तातील शुगर वाढून एचआरसीटी स्कोअरही वाढलेला. चालता बोलताही येईना अशा गंभीर स्थितीत दाखल केलेल्या आंबाजी यांची प्रकृती अवघ्या दोन दिवसांत सुधारली. ते बोलू, चालू लागले. आठ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या शरीरातील प्राणवायूची पातळीही सामान्य झाली. साक्षात मृत्यूच्या दाठेतून बाहेर पडल्याची भावना व्यक्त करताना आंबाजी यांनी आ. लंके यांच्यासमोर हात जोडून आश्रूंना वाट मोकळी करून दिली.  पासष्ठ वर्षीय वृद्धाने व्यक्त केलेली ही कृतज्ञता पाहून आ. लंके यांनाही गहिवरून आले !


No comments:

Post a Comment