अधिकार्‍यांचा पगार चालूच ! मग आमची दुकाने बंद का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

अधिकार्‍यांचा पगार चालूच ! मग आमची दुकाने बंद का?

 अधिकार्‍यांचा पगार चालूच ! मग आमची दुकाने बंद का?

ऑक्सीजन बेडस. कमी हे प्रशासनाचे अपयश.

पॉझिटिव्हिटी रेट कमी पण बेड निकषात जिल्हा फेल.
शहरातील व्यापारी वर्गात नाराज

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्य शासनाच्या पॉझिटिव्हिटी रेटच्या निकषांमध्ये अहमदनगर जिल्हा बसला असल्यामुळे पुण्याप्रमाणे नगर शहरातील दुकाने आज पासून सुरू होण्याच्या आशेला मात्र बेड व कोरोना बाधितांच्या निकषामुळे सुरुंग लागला. सर्व आस्थापने चालू होण्यास परवानगी न मिळाल्यामुळे व्यापारी नाराज झाले आहेत. बेड व कोरोना बाधितांच्या निकषात न बसणे हा प्रशासनाचा दोष असताना या निकषाचा फटका व्यापारी वर्गास बसला आहे. ऑक्सीजनबेडची उपलब्धता पुरेशी नाही हे प्रशासनाचे अपयश आहे. त्याचे खापर व्यापारी वर्गावर कसे? असा प्रश्न व्यापारी वर्गातून उपस्थित करण्यात आला आहे.अधिकार्‍यांचे पगार सुरू अन् दुकाने बंद.. व्यापारी वर्गाचा खर्च सुरू, असा उपरोधिक प्रश्न करत प्रशासनाची नेमके काय चालले असे म्हणत व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त झाली आहे.
आजमितीला जिल्ह्यामध्ये 10 हजार 884 कोरोनाग्रस्तांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यात नॉर्मल पेशंटची संख्या नगण्य आहे. तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा वापर असणार्‍या गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्येच्या तुलनेत 60 टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असले पाहिजेत. आणि पॉझिटिव्हिटी रेटही कमी असला पाहिजे. अहमदनगर जिल्हा पॉझिटिव्हिटी रेट कमी असण्याच्या निकषामध्ये बसला मात्र बेड आणि बाधितांचा निकष लागू झाला नाही. त्यामुळे सकाळी सात ते अकरा या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. बाकी सर्व खाजगी आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला काढावे लागले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी) दहा टक्के पेक्षा खाली असले तरी उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या आणि ऑक्सीजन बेड याचे प्रमाण न जुळल्याने निर्बंध कायम ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर ओढावली. त्या नुसार राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत काल दिवसभर चर्चा झाली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ग्रामीण क्षेत्र आणि महापालिका क्षेत्र असा एकच घटक घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा 10 टक्क्यांच्या खाली असला तरी ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या ही 40 टक्क्यांच्यावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध पूर्णपणे शिथिल करू नयेत, असे बैठकीत सर्वांचेच एकमत झाले. त्यामुळे कडक निर्बंध ‘जैसे थे’च ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांना ग्रामीण क्षेत्रात सकाळी 7 ते 11 परवानगी होती. मात्र, महापालिका क्षेत्रात त्यावर निर्बंध होते. तेवढेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. प्रत्येक आठवड्याला बेड आणि पॉझिटिव्हिटी या दोन्ही रेशोचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या आठवड्यात या दोन्ही रेशोमध्ये जिल्हा फिट्ट बसेल त्या आठवड्यात निर्बंध कमी केले जातील. त्यामुळेच पुढील आदेश येईपर्यंत असा शब्द प्रयोग आज (31 मे) काढलेल्या आदेशात जिल्हा प्रशासनाने केलेला आहे.

सुरु ः सकाळी 7 ते 11 या काळात ः किरकोळ किराणा दुकाने, दूध, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला विक्री (फक्त द्वार वितरण), फळे विक्री, कृषी उत्पन्न बाजार समित्या, अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री, कृषी संबंधित सर्व दुकाने, पशुखाद्य विक्री, पेट्रोल पंप. हॉटेल, रेस्टॉरंट, बार होम डिलिव्हरीसाठी चालू, दारूची होम डिलिव्हरी, सरकारी कार्यालयात 15 टक्के उपस्थिती, दूध संकलन, वाहतूक यांना पूर्ण परवानगी.

बंद ः  धार्मिकस्थळे, आठवडे बाजार, दारू दुकाने, खासगी कार्यालये, कटिंग, सलून दुकाने, शैक्षणिक संस्था, शिकवणी, विवाह समारंभ, चहाची टपरी, दुकाने, सिनेमा, सभागृह, सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, व्यायामशाळा, मॉर्निंग वॉक, बेकरी, मिठाई दुकाने, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने.

No comments:

Post a Comment