ऑलिम्पिकवीर प्रवीण जाधवचा प्रेरणादायी प्रवास - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

ऑलिम्पिकवीर प्रवीण जाधवचा प्रेरणादायी प्रवास

 ऑलिम्पिकवीर प्रवीण जाधवचा प्रेरणादायी प्रवास


हाराष्ट्राचा  उत्कृष्ट तिरंदाज प्रवीण जाधव याने बिकट परिस्थितीवर मात करून ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. प्रवीण जाधव हा ऑलिम्पिकला पात्र ठरल्याने भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. देशाला कुस्तीचे पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, धावपटू ललिता बाबर यांच्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्याचा ऑलिम्पिकमध्ये झेंडा रोवणारा  प्रवीण जाधव हा  तिसरा ऑलिंपिकपटु ठरला आहे. नेदरलँड येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत  प्रवीण जाधव याने भारतीय संघातील सहकारी अतानू दास, तरुणदीप राय यांच्यासह उत्तम कामगिरी करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. 6 जुलै 1996 रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या छोट्याशा गावात जन्मलेल्या प्रवीण याचा ऑलिंपिक पर्यंतचा प्रवास जितका रंजक आहे तितकाच तो प्रेरणादायी आहे. प्रवीणची घरची परिस्थिती अतिशय बेताची. राहायला नीटसे घर नाही. उदरनिर्वाहासाठी त्याचे आई वडील रोजंदारीवर कामाला जात. दोघांच्या मजुरीवर घर चालत नसे म्हणून प्रविणही आई वडिलांसोबत रोजंदारीवर कामाला जाऊ लागला. प्रवीणला लहानपणापासून खेळाची खूप आवड होती. घरी अठरा विश्व दारिद्र्य असले तरी प्रवीणच्या वडिलांनी त्याला खेळासाठी प्रोत्साहन दिले. जिल्हास्तरीय 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रवीणने भाग घेतला पण शारीरिक क्षमता कमी असल्याने त्याला त्यात यश मिळाले नाही. त्याच्या शाळेतील भुजबळ सरांनी त्याच्या प्रशिक्षणाची आणि आहाराची जबाबदारी स्वीकारली. त्याचा परिणाम म्हणून त्याची कामगिरी सुधारली आणि त्याची क्रीडा प्रबोधणीत निवड झाली. पुण्यातील बालेवाडी येथे एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर तो तिरंदाजीच्या प्रशिक्षणासाठी अमरावतीला गेला. तेथे देखील शारीरिक निकषांवर त्याची कमी पडणारी ताकद यामुळे त्याची  समाधानकारक कामगिरी होत नव्हती. भुजबळ सरांनी क्रीडा अधिकारी महेश पालकर यांना  शेवटची संधी देण्याची विनंती केली. 5 शॉटची संधी मिळालेल्या प्रवीणने त्यात 45 गुणांची कमाई करत आपले प्रशिक्षण संस्थेतील स्थान पक्के केले. तिथेच त्याने तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांना प्रफुल्ल डांगे या तिरंदाज प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सहा ते सात वर्ष कठोर सराव केला. खूप मेहनत घेतली. 2016 मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशिआई चषक स्टेज 1 स्पर्धेत त्याने भारताचे प्रथम  प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये पुरुषाच्या सांघिक संघातून त्याने रिकर्व्ह गटात कांस्यपदक मिळवले. त्याच वर्षी त्याने जगतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारतीय ब संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर राज्य सरकारने सन 2017- 18 चे शिवछत्रपती पुरस्काराने त्याला गौरवले. तिरंदाजीतील कौशल्याच्या जोरावर त्याने सैन्यदलात हवालदार पदावर नेमणूक मिळवली. सध्या तो घोरपडी येथील आर्मी ट्रेंनिग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. नेदरलँड येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करून ऑलिम्पिकला प्रवेश मिळवला आहे. आता ऑलम्पिकमध्येही अशीच कामगिरी करुन देशासाठी त्याने पदक आणावे हीच देशवासीयांची त्याच्याकडून अपेक्षा आहे. एका गरीब कुटुंबातील मुलगा ते ऑलिम्पिकवीर हा प्रवीणचा प्रवास थक्क करणारा आहे. मनात जिद्द, चिकाटी आणि करून दाखवण्याची धमक असेल तर जगात काहीही अशक्य नाही हेच प्रवीणने दाखवून दिले आहे. त्याच्या याच कामगिरीची दखल घेऊन भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या कार्यक्रमात त्याचे  जाहीर कौतुक केले आहे. मोलमजुरी करून घर चालवणार्‍या कष्टकर्‍याच्या  मुलगा भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे ही केवळ प्रवीण जाधव याच्या आईवडिलांसाठीच नव्हे तर प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ऑलम्पिकसाठी प्रवीणला खूप खूप शुभेच्छा!
- श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो. 9922546295

No comments:

Post a Comment