महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कृषी सहाय्यक हिंगे आत्महत्या प्रकरणी वरिष्ठांवर कारवाई करावी - सोमनाथ बाचकर




नगरी दवंडी

नगर - राज्यात सर्वत्र कोविडची भयानक परिस्थिती आहे. या परिस्थितीचा विचार न करता कृषी विभागातील वरिष्ठांकडून सातत्याने क्षेत्रीय कामकाजाबाबत दैनंदिन तगादा चालू आहे. कोविडच्या अनुषंगाने कर्मचार्‍यांची कुठलीही सुरक्षात्मक तजवीज न करता सक्तीने दैनंदिन कामकाज करण्याची सक्ती केली जात आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सेवक विशाल हिंगे यांनी वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली. मालवण तालुका कृषी अधिकार्‍यांनी या प्रकरणाची वेळीच दखल घेतली असती, तर अनर्थ टळला असता. या आत्महत्येस जबाबदार वरिष्ठांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने कृषी उपसंचालक विलास नलगे यांना संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बाचकर यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, सोसायटीचे चेअरमन तुळशीराम पवार आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, कृषी सहाय्यक व सेवकांवर सद्य परिस्थितीत मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. वरिष्ठांकडून कामाबाबत अत्यंत हिन वागणूक दिली जात आहे. चारचौघांत अपमानित करण्याचे प्रकार होताहेत. प्रशासकीय कार्यवाहीचा धाक वेळोवेळी दाखविला जातो. अर्वाच्य भाषेत बोलणे, असे प्रकार वाढले आहेत. या प्रकारातूनच कै. हिंगे यांचे प्रकरण घडले. कमी अधिक प्रमाणात सर्वच कार्यालयांत ही परिस्थिती आहे. हिंगे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. असा प्रकार नगर जिल्ह्यात घडू नये, यासाठी अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना शासनाने कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बाचकर म्हणाले की, हिंगे आत्महत्या प्रकरणामुळे कृषी सहाय्यकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शासनाने व कृषी विभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. हिंगे प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई अपेक्षित आहे. राज्यात वन विभागातील दीपाली चव्हाण यांच प्रकरण ताजं असतानाच विशाल हंगे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याचा तातडीने तपास करून दोषींना कडक शासन व्हावे. हंगे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. अशा प्रकारांमुळे कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचेल. दीपाली चव्हाण प्रकरणात ज्याप्रमाणे कारवाई झाली, त्याच पद्धतीने हंगे प्रकरणाबाबत दखल घेत कार्यवाही व्हावी. वरिष्ठांकडून कर्मचार्‍यांना दिली जाणार्‍या हिन वागणुकीमुळे असे प्रकार होताहेत. अशा अधिकार्‍यांची शासन स्तरावरून कानउघाडणी व्हावी. अन्यथा नाईलाजास्तव कृषी सहाय्यक संघटनेला आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment