स्टेशन रोड परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

स्टेशन रोड परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन साजरा

 स्टेशन रोड परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आगरकर मळा, स्टेशन रोड परिसरातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक संघाची 18 वर्षांपूर्वी स्थापना केली. या संघाचा 18 वा वर्धापनदिन स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करून, तसेच कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करून संघाचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला. संघाची 2003मध्ये स्थापना झाली. सुरुवातील 15 सभासदांपासून सुरू झालेल्या संघाचे आज 275 सभासद आहेत. संघाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे भान जपले जाते. 18 वर्षांपासून संघाने अनेक प्रश्न सोडविले आहेत.
संघाच्या वर्धापनदिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करून कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे, सचिव शिवाजीराव ससे, उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी व नूरआलम शेख, सदस्य दत्तात्रय फुलसौंदर, अशोकराव आगरकर, ज्ञानेश्वर कविटकर, नानासाहेब दळवी, अ‍ॅड. विजयकुमार लुणे, श्रीकृष्ण लांडगे, बाळकृष्ण कपाले, श्रीधर नांगरे, सदस्या उषा फिरोदिया उपस्थित होत्या.
संघाने पुढाकार घेत महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ व सुंदर अभिमानात सहभाग घेतला. त्या अंतर्गत परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. सभासद निरोगी राहण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. ज्येष्ठांच्या आरोग्याची वेळोवेळी योग्य ती काळजी घेण्याच्या उद्देशाने आरोग्य शिबिर घेतले. ज्येष्ठ नागरिक दिन मातोश्री वृद्धाश्रमात दरवर्षी साजरा केला जातो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रुग्णालयांत जाऊन रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली जाते, तसेच गुणवंतांचा सत्कार केला जातो. परिसरातील समस्या सोडविण्यासाठी संघ नेहमी अग्रेसर असून, या भागातील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. संघाने कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी भरीव मदत करीत शालेय वस्तू थेट गावात जाऊन देण्यात आल्या. कोरोनासारखे भयानक संकट आज सर्व देशावर आहे. या काळातही संघ मागे राहिलेला नाही. संघाने मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. कोरोनात संघाचेही काहीजण मृत्युमुखी पडले. त्यांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, अशी माहिती संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे यांनी दिली.

No comments:

Post a Comment